देशात कोरोनाचा धोका : जगातील पहिल्या ‘नेझल व्हॅक्सिन’ला सरकारची मान्यता

नेझल व्हॅक्सिन

नवी देहली – आरोग्य मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी कोरोनाविषयीची मार्गदर्शक तत्त्वे प्रसारित केली आहेत. यामध्ये विमानतळावर कोरोनाविषयीच्या सूचनांचे पालन करण्यास सांगितले आहे. भारत सरकारने जगातील पहिल्या ‘नेझल व्हॅक्सिन’ला (अनुनासिक कोरोना लसीला) मान्यता दिली आहे. ‘भारत बायोटेक’ आस्थापनाची नाकातून दिली जाणारी ही लस वर्धक मात्र (बूस्टर डोस) म्हणून वापरली जाईल. ही लस सर्वप्रथम खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून दिली जाईल. या लसीचा कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमात समावेश करण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिलीे.

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी घेतली राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांची बैठक

भारतातील कोरोनाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांच्या आरोग्य मंत्र्यांची बैठक घेतली. देशात लवकरच नवीन मार्गदर्शक तत्त्वेही घोषित केली जाऊ शकतात.

गेल्या २४ घंट्यांत  देशात कोरोनाचे १६४ नवे रुग्ण

गेल्या २४ घंट्यांत देशात कोरोनाचे १६४ नवे रुग्ण आढळले आहेत, तर ९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांपैकी २ मृत्यू महाराष्ट्रात, १ मृत्यू देहलीत झाला, उर्वरित ६ मृत्यू केरळमध्ये झाले आहेत. देशातील कोरोनाचे एकूण रुग्ण ४ कोटी ४६ लाख ७७ सहस्र ९०३ वर पोहोचले आहेत, तर मृतांचा आकडा ५ लाख ३१ सहस्र ९२५ वर पोहोचला आहे. कोरोनातून आतापर्यंत ४ कोटी ४१ लाख ३० सहस्र २२३ जण बरे झाले आहेत.

भारतात दळणवळण बंदीची आवश्यकता भासणार नाही ! – डॉ. अनिल गोयल

दळणवळण बंदीची आवश्यकता भासणार नाही, असे भारतीय वैद्यकीय संघटनेचे (‘इंडियन मेडिकल असोसिएशन’चे) डॉ. अनिल गोयल यांनी सांगितले. संघटनेच्या मते भारतातील लोकांची प्रतिकारशक्ती चीनमधील नागरिकांपेक्षा अधिक आहे.