जौनपूर, उत्तरप्रदेश येथील गोसावी (गुसाई) परंपरेचे शास्त्रीय गायक डॉ. श्यामरंग शुक्ल यांच्या गायनाविषयी जाणवलेली आध्यात्मिक वैशिष्ट्ये !

‘मूळ जौनपूर (उत्तरप्रदेश) येथील आणि सध्या मुंबईत वास्तव्यास असलेले गोसावी (गुसाई) परंपरेचे शास्त्रीय गायक डॉ. श्यामरंग शुक्ल यांचे १७.९.२०२२ या दिवशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने शास्त्रीय अन् उपशास्त्रीय गायनाचे विविध प्रकारचे संशोधनाचे प्रयोग आयोजित करण्यात आले होते. त्यांच्या प्रयोगातून लक्षात आलेली त्यांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये येथे दिली आहेत. डॉ. श्यामरंग शुक्ल हे ठाणे येथील गायक श्री. प्रदीप चिटणीस (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांच्या गुरूंचे पुत्र आहेत.

गायन सादर करतांना डॉ. श्यामरंग शुक्ल

१. सात्त्विक गायन परंपरा आत्मसात करून त्याचे जतन करणारे डॉ. शुक्ल !

डॉ. श्यामरंग शुक्ल यांनी गुसाई घराण्यातील संगीतकला आत्मसात् केली आहे. या घराण्यात ‘मंदिरांत देवासाठी संगीताची निर्मिती करणे आणि गायन करणे’ ही परंपरा आहे. सध्याच्या कलियुगात रज-तमप्रधान कला शिकणे, उदा. पाश्चात्त्य संगीत आणि नृत्य शिकणे किंवा सात्त्विक कलेला रज-तमात्मक करणे, उदा. ‘फ्यूजन’ संगीत (भारतीय आणि पाश्चात्त्य संगीत एकत्र करून बनवलेला संगीताचा प्रकार) निर्माण करणे सोपे असते; पण ‘सात्त्विक कलेतील सात्त्विकता टिकेल’, हे जपणे कठीण असते. डॉ. श्यामरंग शुक्ल यांनी गुसाई घराण्यातील सात्त्विक गायन परंपरा आत्मसात करून ती टिकवून ठेवली आहे. त्यांची गायनशैली सत्त्व-रज प्रधान आहे. ‘संगीताच्या माध्यमातून साधना करण्यासाठी आणि सात्त्विक कलाशैली टिकवण्यासाठीच देवाने त्यांना सात्त्विक संगीत असलेल्या कुटुंबात जन्म दिला आहे’, असे मला जाणवले.

श्री. निषाद देशमुख

२. डॉ. शुक्ल यांच्या वाणीत जाणवलेला गोडवा आणि शक्ती !

अन्य गायकांच्या वाणीत साधनेतील अनुसंधानामुळे केवळ गोडवा (सात्त्विकता) असतो किंवा त्यांच्या वाणीत संगीताच्या साधनेमुळे शक्ती (रजोगुण) जाणवते. डॉ. शुक्ल गायन करतांना त्यांच्या वाणीत गोडवा आणि शक्ती दोन्ही जाणवतात. गायन हीच त्यांची साधना असल्यामुळे आणि गायनातून त्यांचे मन निर्विचार होत असल्याने त्यांच्या गायनात गोडवा (सात्त्विकता) आहे, तर संगीत साधनेमुळे त्यांच्या गायनात शक्ती निर्माण होऊन एकाच वेळी दोन्हीची अनुभूती येते.

३. डॉ. शुक्ल यांना गातांना मणिपुरचक्रातून शक्ती मिळत असणे

डॉ. शुक्ल यांचे गायन ऐकतांना ‘त्यांची वाणी पुष्कळ खोल आणि शक्तीयुक्त आहे’, असे मला जाणवले. साधना नसलेले गायक गायनासाठी त्यांच्या गळ्याचा वापर करत असल्याने त्यांना स्वरेंद्रियातून शक्ती मिळते; याउलट साधक गायकांच्या गायनात भाव आणि ईश्वराशी अनुसंधान असल्याने त्यांना त्यांच्या अनाहतचक्रातून गायनासाठी शक्ती मिळते. ‘डॉ. शुक्ल यांना गायन करतांना त्यांच्या मणिपुरचक्रातून शक्तीचा पुरवठा होत आहे. संगीत साधनेमुळे त्यांना त्यांच्या मणिपुरचक्रात साठलेल्या प्राणशक्तीद्वारे गायनासाठी शक्ती आणि स्फूर्ती मिळते’, असे माझ्या लक्षात आले.

४. डॉ. शुक्ल यांच्या गायनातून उच्च स्वर्गलोकातील वायूमंडल निर्माण होणे

संगीताची साधना करणारे अन्य गायक गायन करतांना काही काळासाठी संगीताशी एकरूप होत असल्याने त्यांच्या गायनामुळे सूक्ष्मातून गंधर्वलोकाचे वातावरण निर्माण होते. देवतांविषयी भाव असलेल्या गायकाच्या गायनामुळे त्या-त्या देवतेचे सूक्ष्म लोक निर्माण होतात. मायेतील संगीतातून अध्यात्मातील संगीताकडे वळणार्‍या साधक गायकाच्या गाण्यामुळे सूक्ष्मातून स्वर्गलोकातील वातावरण निर्माण होते. तसे डॉ. शुक्ल यांच्या गायनामुळे उच्च स्वर्गलोकातील वायूमंडल निर्माण होते.

५. डॉ. शुक्ल यांच्या गायनामुळे ऐकणार्‍यांवरील अनिष्ट शक्तीचे आवरण नष्ट होऊन प्राणशक्ती आणि उत्साह यांत वाढ होणे

अन्य गायकांच्या गायनात सूर किंवा ताल चुकले, तर त्यातून कधी-कधी सहन न होणारी अशी अनियंत्रित शक्ती प्रक्षेपित होते. या अनियंत्रित शक्तीमुळे ऐकणार्‍यांना ‘जडपणा जाणवणे किंवा तोल जाणे’, अशा त्रासदायक अनुभूती येतात. डॉ. शुक्ल यांच्या संगीत साधनेमुळे त्यांच्या गायनात अनियंत्रित शक्ती नव्हती. ‘त्यांच्या गायनामुळे ऐकणार्‍यांवरील अनिष्ट शक्तीचे आवरण न्यून होऊन प्राणशक्ती आणि उत्साह यांच्यात वाढ होते’, अशी अनुभूती येते. थोडक्यात त्यांचे गायन प्राणशक्तीयुक्त आहे.

६. ‘आभामय’ गायन करणारे डॉ. शुक्ल !

डॉ. शुक्ल यांच्या गायनात शक्ती, चैतन्य आणि आनंद यांची संमिश्र स्पंदने आहेत. (शक्ती – ६५ टक्के, चैतन्य – २० टक्के आणि आनंद – १५ टक्के) अशा शक्ती, चैतन्य आणि आनंद यांच्या संमिश्र गायनाला ‘आभामय गायन’ असे म्हणतात. या प्रकारचे गायन जिवाच्या सगुण स्तरातून सगुण-निर्गुणाकडे म्हणजे ईश्वराकडे होणार्‍या प्रवासाचे सूचक असतात.

७. गायनाशी मन एकरूप झाल्यामुळे गातांना डॉ. शुक्ल यांचे रूप अधिक तरुण आणि तेजस्वी दिसणे

डॉ. शुक्ल यांचे वय ६८ वर्षे आहे. असे असतांनाही गायन करतांना ते अधिक तरुण, सुस्पष्ट आणि तेजस्वी दिसत होते. देहबुद्धी, मनातील असंख्य विचार आणि अनिष्ट शक्तींच्या आक्रमणांमुळे निर्माण झालेले आध्यात्मिक त्रास यांच्याशी लढण्यात जिवाची प्राणशक्ती व्यय झाल्यामुळे तो जीव त्याच्या प्रत्यक्ष वयाहून अधिक मोठा दिसतो. गायन करतांना डॉ. शुक्ल यांचे मन गायनाशी एकरूप झाल्यामुळे  त्यांचे रूप अधिक तरुण, सुस्पष्ट आणि तेजस्वी दिसते’, असे माझ्या लक्षात आले.

८. गायन करतांना मन निर्मळ झाल्याने डॉ. शुक्ल यांच्या गालांवर सूक्ष्मातून चकाकी दिसणे

‘डॉ. शुक्ल गायन करतांना अधून-मधून त्यांच्या गालावर चकाकी जाणवली. ही चकाकी आपतत्त्वाशी निगडित असून गालावर तेल लावल्याप्रमाणे दिसत होती. या संदर्भात मला जाणवले, ‘गायन करतांना काही काळासाठी डॉ. शुक्ल यांचे मन निर्मळ होऊन आनंद अनुभवते. त्यांच्या मनाच्या या निर्मळ स्थितीचे प्रकटीकरण त्यांच्या गालांच्या माध्यमातून होते. त्यामुळे गायन करतांना अधून-मधून डॉ. शुक्ल यांच्या गालांवर चकाकी दिसते.’

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), फोंडा, गोवा (१९.९.२०२२, सकाळी १०.५३)

  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.