महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’विरोधी आणि धर्मांतरबंदी कायदा तातडीने लागू करा ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

माहीम (मुंबई), ठाणे आणि पेण (रायगड) येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन !

मुंबई, १६ डिसेंबर (वार्ता.) – महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ आणि हिंदूंचे धर्मांतर यांविषयीच्या वाढत्या घटना पहाता राज्यात तातडीने लव्ह जिहादविरोधी आणि धर्मांतरबंदी कायदा लागू करावा या मागण्यांसाठी मुंबईत माहीम (प) येथील मच्छिमारनगर येथे, ठाणे (प) रेल्वे स्थानकाबाहेर आणि रायगड जिल्ह्यातील पेण येथील हुतात्मा कोतवाल चौक येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले.

पेण येथील आंदोलनानंतर आमदार रविशेठ पाटील यांना वरील मागण्यांसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.

या तिन्ही ठिकाणी झालेल्या आंदोलनात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आणि धर्मप्रेमी हिंदू सहभागी झाले होते. या प्रसंगी आंदोलनात सहभागी झालेल्या धर्मप्रेमी हिंदूंनी हातात प्रबोधनपर फलक धरले होते आणि घोषणाही देण्यात आल्या. या वेळी शासनाला देण्यात येणार्‍या निवेदनावर नागरिकांच्या स्वाक्षर्‍या घेण्यात आल्या.

मुंबई येथे झालेल्या आंदोलनात तरुण मित्र मंडळ (माहीम), राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदु जनजागृती समितीची रणरागिणी शाखा यांच्या प्रतिनिधींसह धर्मप्रेमी हिंदू सहभागी झाले होते.

ठाणे येथे १५ डिसेंबर या दिवशी झालेल्या आंदोलनात हिंदू महासभा, श्रीराम प्रतिष्ठान हिंदुस्थान, वन्दे मातरम् प्रतिष्ठान, श्रीराम हिंदूसंघटन, अखिल भारतीय कोरी समाज आणि हिंदु जनजागृती समितीची रणरागिणी शाखा यांच्या प्रतिनिधींसह धर्मप्रेमी हिंदू, तर पेण येथे झालेल्या आंदोलनात सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, सकल हिंदू समाज आणि हिंदु जनजागृती समितीची रणरागिणी शाखा यांच्या प्रतिनिधींसह धर्मप्रेमी हिंदू सहभागी झाले होते.

राज्यात दिवसेंदिवस ‘लव्ह जिहाद’ची समस्या गंभीर रूप धारण करत आहे. अनेक माध्यमांतून हिंदु युवतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करून त्यांच्याशी ‘निकाह’ केला जातो. यामध्ये हिंदु युवतींचे भयंकर शोषण केले जाते. वसई येथील श्रद्धा वालकर हिची लव्ह-जिहादी आफताबने केलेली निघृण हत्या, तसेच मुंबईतील टिळकनगर येथे रहाणारी रूपाली चंदनशिवे या युवतीने बुरखा घालण्यास नकार दिला; म्हणून तिचा पती इक्बाल महंमद शेखने केलेली हत्या यांसह ‘लव्ह जिहाद’ विषयची अनेक गंभीर प्रकरणे आता उघड होत आहेत आणि जनतेमध्येही ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाविषयी रोष व्यक्त होत आहे. अशा घटना रोखण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यायला हवा, अशी मागणीही हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केली.

स्वा. सावरकरांनी ‘धर्मांतर हे राष्ट्रांतरच’ असे म्हटले होते. पुन्हा भारताचे तुकडे होऊ द्यायचे नसतील, तर धर्मांतरबंदी व्हायलाच हवी; म्हणूनच गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आदी राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही धर्मांतरबंदी कायदा तातडीने लागू करावा, अशी मागणी या आंदोलनात करण्यात आली

क्षणचित्र

ठाणे येथे अनेक जण स्वतः थांबून आंदोलन बघत होते आणि स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होत होते, तसेच अनेक युवतींनी थांबून हा विषय समजून घेतला आणि त्या आंदोलनात सहभागी झाल्या.