रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर ‘सर्वही तीर्थे घडली देवा । सद्गुरुचरणासी ।।’ याची अनुभूती घेणारे अकोला येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. विनायक राजंदेकर (वय ८० वर्षे) !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात रहाणार्‍या सनातन संस्थेच्या ९५ व्या व्यष्टी संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारे आजी (वय ८३ वर्षे) यांचे भाऊ, फोंडा (गोवा) येथील श्री. अनिरुद्ध राजंदेकर (वय ३९ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६० टक्के) यांचे मोठे काका आणि अकोला येथील दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. विनायक राजंदेकर (वय ८० वर्षे) हे ४ ते ८.९.२०२२ या कालावधीत गोवा येथे आले होते. त्यांना गोवा येथे प्रथमच येतांना आणि रामनाथी आश्रमात आल्यानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

श्री. विनायक राजंदेकर

१. गोवा येथील रामनाथी आश्रमात जाण्यासाठी मनाची सिद्धता झाल्यावर अकस्मात् उद्भवलेल्या अडचणींवर संतांच्या कृपेमुळे मात करता येणे

१ अ. गोवा येथे पुतण्याकडे असलेल्या महालक्ष्मी सोहळ्याला गेल्यास त्या निमित्ताने ‘आश्रमदर्शन होईल’, असे वाटल्याने गोव्याला जाण्याचे नियोजन करणे :‘मी अनेक वर्षांपासून दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन, मनन आणि चिंतन करतो. त्यातील साधकांच्या अनुभूती वाचतांना त्यांविषयी कुतूहल निर्माण होऊन ‘हे कसे घडू शकते ?’, असा प्रश्न मला पडत असे. माझ्या मनात रामनाथी येथील सनातनचा आश्रम बघण्याची जिज्ञासाही होती. माझा गोवा येथील पुतण्या श्री. अनिरुद्ध राजंदेकर (वय ३९ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६० टक्के) आणि सूनबाई सौ. मानसी राजंदेकर (वय ३८ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांच्याकडे प्रतीवर्षी साजर्‍या होणार्‍या ‘महालक्ष्मी सोहळ्या’ला उपस्थित रहाण्याचा आग्रह दोघांनीही केल्यामुळे मी गोवा येथे जाण्याचे नियोजन केले. त्यामुळे ‘मला आश्रमदर्शन होईल’, असे वाटले.

१ आ. गोव्याला जातांना उद्भवलेल्या अडचणींवर संतांच्या मार्गदर्शनानुसार मात करता येणे : मी अकोला ते पुणे आणि पुणे ते गोवा असे रेल्वेचे आरक्षण एक मास आधीच केले होते; परंतु प्रवासाच्या आठ दिवस आधी मला अकस्मात् ताप येऊन पुष्कळ अशक्तपणा वाटू लागला. ‘वयोमानामुळे इतक्या दूरचा प्रवास होणार नाही. आपण जायला नको. आपली प्रकृती अधिक बिघडली, तर साधकांना आपले करावे लागेल’, असे नकारात्मक विचार माझ्या मनात चालू झाले. त्यातच अकोला ते पुणे प्रवासाची गाडी रहित (रद्द) झाल्याचा संदेश माझ्या भ्रमणभाषवर आला. ‘आता आश्रमात जाण्याचा योग नाही’, असे मला वाटायला लागले. माझी ही परिस्थिती माझ्या ज्येष्ठ भगिनी पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी यांना कळली. त्यांनी मला आश्रमात येण्याविषयी सकारात्मक राहून नामजप करण्यास सांगितले. पू. आजींच्या चैतन्यामुळे माझ्या मनातील नकारात्मक विचार निघून गेले.

१ इ. रहित झालेली रेल्वे गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेनेच नियमित धावणार असल्याचे कळणे : सर्वसाधारण असा अनुभव आहे की, एकदा रहित झालेली रेल्वेगाडी सहसा धावत नाही; परंतु ‘अकोला ते पुणे या प्रवासाची गाडी रहित झाली नसून, ती नियमितपणे धावेल’, असा रेल्वेकडून माझ्या भ्रमणभाषवर पुन्हा संदेश आला. ही माझ्यावर गुरुदेवांची कृपा असल्याची अनुभूतीच आहे.

२. भावजागृती करणारा रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम !

गोवा येथील सनातनचा रामनाथी आश्रम

२ अ. आश्रमात प्रवेश करताच वेगळे वातावरण जाणवणे : ६.९.२०२२ या दिवशी रामनाथी आश्रमाच्या दर्शनाचे नियोजन झाल्याचा निरोप आला. तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला. तसे गोव्यात आल्यापासूनच सौ. मानसीकडे (सौ. मानसी राजंदेकर यांच्याकडे) संतांची मांदियाळीच पहायला मिळाली. प्रत्यक्ष आश्रमात प्रवेश करतांनाच मला वेगळ्या वातावरणात प्रवेश करत असल्याचे जाणवले. स्वागतकक्षात असलेल्या भगवान श्रीकृष्ण आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमा, म्हणजे त्यांचे सजीव दर्शनच होते.

२ आ. भावावस्थेत असणारे आश्रमातील साधक पाहून आपोआप भावजागृती होणे : आश्रमातील सर्व साधक हसतमुख आणि आनंदी दिसत होते. आश्रम दाखवणारे श्री. नाईककाका प्रत्येक ठिकाण दाखवतांना इतके भावावस्थेत जात होते की, माझीही भावजागृती आपोआप होत होती. ‘भावजागृती म्हणजे नेमके काय ?’, हे मला आश्रम पहातांनाच कळले. आश्रमातील प्रत्येक सेवा करतांना साधक ‘स्वत:ला विसरून सेवा करतात’, असे जाणवले.

सर्वांत शेवटी भोजनकक्षातील चुकांच्या फलकाद्वारे ‘साधक चुकांचे निरीक्षण किती बारीक करतात’, हे शिकायला मिळाले.

प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनाप्रमाणे ‘सर्वही तीर्थे घडली देवा । सद्गुरुचरणासी ॥’ याप्रकारे शेवटचा क्षण गोड झाला. हे सर्व देवाच्या कृपेनेच घडले, यासाठी परात्पर गुरुमाऊलींच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. विनायक राजंदेकर (वय ८० वर्षे), अकोला (१६.९.२०२२) 

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार धर्मप्रेमींच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक