क्रिकेट खेळाडू ऋषभ पंत यांच्याकडून शास्त्रीय संगीताचा अवमान

शास्त्रीय गायक आणि वादक यांच्याकडून टीका

(डावीकडून) सतारवादक पूरबायन चॅटर्जी, भारतीय क्रिकेट संघाचे यष्टीरक्षक ऋषभ पंत, प्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवर्ती

नवी देहली – भारतीय क्रिकेट संघाचे यष्टीरक्षक ऋषभ पंत यांनी ‘ड्रीम ११’ या विज्ञापनाद्वारे शास्त्रीय संगीताची थट्टा केल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. या विज्ञापनात ऋषभ पंत यांना शास्त्रीय गायक दाखवण्यात आले आहे. सर्व वादक बसलेले दिसत असून ऋषभ पंत गाण्यासाठी येतात. त्या वेळी ते विचित्र आवाजात गात यष्टीरक्षण करत असल्याप्रमाणे हात हलवत असल्याचे दाखवण्यात आले आहे. या वेळी ऋषभ यांनी ‘देवाचे आभार, मी माझे स्वप्न पाहिले. मी क्रिकेटपटू झालो हे चांगले झाले’, असे सांगत शास्त्रीय गायनाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला.

यष्टीरक्षक ऋषभ पंत यांनी ‘ड्रीम ११’ या विज्ञापनाद्वारे केलेली शास्त्रीय संगीताची थट्टा –

 (सौजन्य : Advertisement King)

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)

१. या विज्ञापनावर प्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवर्ती यांनी ट्वीट करून ऋषभ पंत यांना म्हटले की, या विज्ञापनातील गलिच्छपणा व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. आपल्या वारशाचा अनादर केल्याने तुम्ही मूर्ख दिसत आहात. हे पंडित रविशंकर, उस्ताद झाकीर हुसेन, पंडित भीमसेन जोशी आदींचे संगीत आहे. मला निश्‍चिती आहे की, तुम्ही हे करून नशीब मिळवाल; पण ते योग्य आहे का ?, मी भारतीय शास्त्रीय संगीताचा सराव करते. मी क्रिकेट पहात नाही; पण कधीही तुमच्या खेळाचा अपमान केलेला नाही. जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट समजून घेण्याचे प्रशिक्षण दिलेले नसेल, तेव्हा किमान त्याविषयी आदर बाळगण्याइतके समजूतदार व्हा.’

२. सतारवादक पूरबायन चॅटर्जी यांनी त्यांचे मत व्हिडिओद्वारे ट्वीट केले आहे. त्यात ते म्हणाले, ‘‘असे प्रथमच झालेले नाही. यासाठी क्षमा केली जाऊ शकत नाही.’’

संपादकीय भूमिका

भारतीय संगीताचा अवमान करणार्‍यांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून अन्य कुणीही असा अवमान करण्याचे धाडस करणार नाही !