कराड, ११ डिसेंबर (वार्ता.) – येथील दत्त चौकातील दत्त मंदिरात समर्थ रामदासस्वामींच्या चरणपादुकांचे आगमन झाल्यानंतर शहराच्या मुख्य बाजारपेठेतून अखंड रामनामासहित मिरवणूक काढण्यात आली. या वेळी ठिकठिकाणी रांगोळ्या काढून पालखीचे स्वागत भक्तीभावाने करण्यात आले.
‘श्री रामदासस्वामी संस्थान सज्जनगड, सातारा’ यांच्या वतीने ‘श्री समर्थ चरणपादुका आणि भिक्षा दौरा’ निमित्ताने कराड येथील जुने श्री कृष्णामाई मंगल कार्यालय येथे १३ डिसेंबरपर्यंत श्री समर्थ चरणपादुका आणि समर्थांच्या नित्यपूजेतील मारुतीची मूर्ती भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आलेली आहे. या ठिकाणी नियमित काकड आरती ते शेजारती, प्रवचन, कीर्तन, भजन इत्यादी धार्मिक कार्यक्रमांचे, तसेच शहराच्या विविध भागांत सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत भिक्षाफेरीचे आयोजन केले असून भाविकांनी या सत्संगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.