३० नोव्हेंबर या दिवशी किल्ले प्रतापगडावर दिमाखात साजरा होणार ‘शिवप्रतापदिन’ !

मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती

सातारा, २३ नोव्हेंबर (वार्ता.) – येत्या ३० नोव्हेंबर या दिवशी किल्ले प्रतापगड येथे मोठ्या दिमाखात ‘शिवप्रतापदिन’ साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्ण सिद्धता केली असून या सोहळ्यासाठी सातारा जिल्ह्याचे सुपुत्र तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.

किल्ले प्रतापगड येथे अफझलखानवधाची तिथी म्हणजे मार्गशीर्ष शु. सप्तमी ही ‘शिवप्रतापदिन’ म्हणून साजरी करण्यात येते. या वर्षी ही तिथी ३० नोव्हेंबर या दिवशी  आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठक घेतली. यामध्ये जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह विविध विभागांतील शासकीय अधिकारी उपस्थित होते.