(म्हणे) ‘भारताला केवळ मुसलमान आणि काँग्रेस हेच वाचवू शकतात !’

  • गुजरातमधील काँग्रेसचे उमेदवार चंदन ठाकोर यांचे विधान असलेला व्हिडिओ

  • ३ वर्षांपूर्वीचे विधान असलेल्या व्हिडिओमध्ये जाणीवपूर्वक पालट करून तो विरोधकांकडून प्रसारित करण्यात आल्याचा काँग्रेसचा दावा

गुजरातमधील काँग्रेसचे उमेदवार चंदन ठाकोर

कर्णावती (गुजरात) – आम्ही काहीतरी नवीन करण्यासाठी म्हणून यांना (भाजपला) मते दिली; मात्र त्यांनी राज्यातील जनतेला धोका दिला. एकाला धोका दिला, तर ठीक होते; मात्र यांनी संपूर्ण देशाला खड्ड्यात ढकलले आहे. आता जर कुणी देशाला वाचवू शकतो, तर ते मुसलमान आणि काँग्रेस हेच आहेत, असे विधान सिद्धपूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार चंदन ठाकोर यांनी केल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. यावरून भाजपने ठाकोर यांच्यावर टीका केली आहे. याविषयी काँग्रेसने स्पष्टीकरण दिले आहे.

१. चंदन ठाकोर या व्हिडिओत पुढे म्हणत आहेत की, या देशात मुसलमानांविषयी बोलणारे अनेक पक्ष आहेत; मात्र मुसलमानांच्या बाजूने काँग्रेस सोडून अन्य कुणीही आलेला नाही. यातून लक्षात घेतले पाहिजे की, काँग्रेसच मुसलमानांचे रक्षण करू शकते. भाजपने मुसलमानांना सर्वप्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न केला. तीन तलाक, ‘हज’ला अनुदान आणि मुसलमान विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे यांवर भाजपने बंदी घातली आहे.(काँग्रेस हिंदूंच्या बाजूने नाही, हे ठाकोर स्पष्ट करत आहेत, हे हिंदूंनी लक्षात ठेवले पाहिजे ! काँग्रेस म्हणजे दुसरी मुस्लिम लीग आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक)

सौजन्य :Republic World

२. काँग्रेसने स्पष्टीकरणात म्हटले आहे की, हा व्हिडिओ ३ वर्षांपूर्वीचा आहे. सिद्धपूर येथेच एका बैठकीत ठाकोर देशाच्या प्रगतीसाठी हिंदु आणि मुसलमान यांच्या एकतेविषयी बोलत होते. व्हिडिओतून हा भाग वगळून तो प्रसारित करण्यात आला आहे.

३. या व्हिडिओवर भाजप सरकारचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी ट्वीट करत म्हटले की, निवडणुकीतील पराभवामुळे काँग्रेस अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करण्याचे तुच्छ राजकारण करत आहे; मात्र काँग्रेसने हे लक्षात घेतले पाहिजे की, तिला आता पराभवापासून कुणीही वाचवू शकणार नाही.

 

संपादकीय भूमिका

  • ‘भारताच्या साधन संपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे’, असे विधान काँग्रेसचे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी केले होते. त्याचाच हा दुसरा भाग आहे !
  • काँग्रेसमध्ये मोहनदास गांधी यांचा उदय झाल्यापासून तिची अशीच मानसिकता राहिल्याने भारताची फाळणी करून मुसलमानांना पाकिस्तान देण्यात आल्यानंतरही उर्वरित भारतही त्यांना आंदण देण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होत राहिला. हिंदूंनी यामुळेच तिला सत्तेवरून दूर केल्यानंतरही काँग्रेसला अद्याप सुबुद्धी झालेली नाही. यावरून तिचा विनाशकाळ आला आहे, हेच लक्षात येते !