वैशाली (बिहार) येथे ट्रकने चिरडल्यामुळे ८ जणांचा मृत्यू, अनेक जण घायाळ !

पिंपळाच्या झाडाखाली पूजा करतांना चिरडण्यात आले !

वैशाली (बिहार) – येथील सुलतानपूर भागात ताशी १२० किलोमीटर वेगाने आलेल्या ट्रकने चिरडल्याने ८ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य काही जण घायाळ झाले. मृतांमध्ये ६ मुलांचा समावेश आहे. हे सर्वजण येथे पिंपळाच्या झाडाखाली उभे राहून पूजा करत असतांना ही घटना घडली. ट्रकचा चालक मद्यपान करून ट्रक चालवत होता, असे समोर आले आहे. विशेष म्हणजे बिहारमध्ये दारुबंदी आहे. (दारुबंदी असतांना अशा प्रकारची घटना घडते, हे राज्य सरकारला लज्जास्पद ! या अपघाताला सरकारलाही दोषी ठरवले पाहिजे ! – संपादक)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या नातेवाइकांना २ लाख रुपयांचे साहाय्य घोषित केले आहे, तर घायाळांना ५० सहस्र रुपये  रुपये देण्यात येणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही शोक व्यक्त केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचे साहाय्य देण्याचे घोषित केले आहे.