राहुल गांधींना बाँबने उडवण्याची धमकी !

मध्यप्रदेशच्या इंदूरमधील मिठाईच्या दुकानात आढळले धमकीचे पत्र

काँग्रेसचे नेते राहुल गांधी

इंदूर (मध्यप्रदेश) – सध्या ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी असलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे मध्यप्रदेशमधील इंदूर येथे पोचताच त्यांना बाँबने उडवण्याची धमकी एका पत्राद्वारे देण्यात आली आहे. हे पत्र इंदूरस्थित एका मिठाईच्या दुकानात आढळून आले. पोलिसांनी हे पत्र जप्त करून अन्वेषण चालू केले आहे. पोलीस संबंधित दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे चित्रीकरण पडताळत आहे.

पोलिसांच्या मते, धमकीचे हे पत्र अज्ञात व्यक्तीने दुकानात ठेवले आहे. त्यानंतर दुकानदाराने ते पोलिसांकडे सुपुर्द केले. यासंबंधीच्या माहितीनुसार, ‘राहुल गांधी हे इंदूर येथे खालसा महाविद्यालयात थांबतील. तेव्हा त्यांना बाँबने उडवण्यात येईल’, असा पत्रात उल्लेख आहे. पत्र लिहिणार्‍या व्यक्तीने तो शीख समुदायाचे असल्याचा दावा केला आहे. या पत्रात त्याने इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या शीखविरोधी दंगलीचाही उल्लेख केला आहे. पत्राच्या शेवटी एक दूरध्वनी क्रमांक देण्यात आला आहे. ‘त्या दिवशी संपूर्ण इंदूर शहर स्फोटांनी हादरेल’, अशी चेतावणीही त्याने या पत्रात दिली आहे.

राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा २३ नोव्हेंबरला मध्यप्रदेश राज्यात पोचणार आहे. तेथून ती उज्जैन आणि इंदूरमार्गे राजस्थानात जाईल.