सहस्रार्जुन महाराजांच्या आशीर्वादाने भारताला परत हिंदु राष्ट्र बनवण्याचा संकल्प करूया ! – चेतन गाडी, हिंदु जनजागृती समिती

भाग्यनगर (तेलंगाणा) येथे सहस्रार्जुन महाराज जयंतीनिमित्त एस्.एस्.के. समाजाच्या भव्य शोभायात्रेत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

सहस्रार्जुन महाराजांच्या आशीर्वादाने सहस्रो बाहूंनी भारताला परत हिंदु राष्ट्र बनवण्याचा संकल्प करूया – हिंदु जनजागृती समितीचे आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा राज्य समन्वयक श्री. चेतन गाडी

भाग्यनगर (तेलंगाणा) – सहस्रार्जुन महाराज हे सोमवंशीय क्षत्रिय होते. त्यांनी अधर्मियांच्या नाशासाठी पृथ्वीवर अवतार धारण केला होता. आपण सर्व या महापुरुषाचे वंशज आहोत. आपणही आपल्यात क्षात्रतेज निर्माण करून हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांच्या विरोधात वैध मार्गाने लढा देऊया. तसेच सहस्रार्जुन महाराजांच्या आशीर्वादाने सहस्रो बाहूंनी भारताला परत हिंदु राष्ट्र बनवण्याचा संकल्प करूया, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा राज्य समन्वयक श्री. चेतन गाडी यांनी केले. राजराजेश्वर सोमवंशी सहस्रार्जुन महाराज यांच्या जयंतीनिमित्त एस्.एस्.के. समाजाच्या वतीने येथील बेगम बाजार भागात एका भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेला संबोधित करतांना ते बोलत होते.

श्री. चेतन गाडी

श्री. गाडी पुढे म्हणाले,

‘‘सहस्रार्जुन महाराजांवर स्वयं भगवान दत्तात्रेयांनी प्रसन्न होऊन ५ वरदाने दिली होती. त्यातील एका आशीर्वादाप्रमाणे त्यांना सहस्र बाहू आणि शस्त्र प्रदान करण्यात आले होते. त्यामुळे त्यांना सहस्रार्जुन नावाने संबोधले जाते. ते मध्यप्रदेशातील नर्मदा नदीजवळील महिष्मती भागाचे अधिपती होते. त्यांचे राज्य १ सहस्र वर्षे चालले. एका पुराणकथेनुसार ते साक्षात् भगवान श्रीविष्णूच्या सुदर्शनचक्राचे अवतार होते.’’