|
मुंबई, ३० ऑक्टोबर (वार्ता.) – चर्चगेट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आलेल्या दाभोलकर कला प्रदर्शनाच्या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पाकिस्तानचे निर्माते महंमद अली जिना यांच्याशी तुलना करणार्या ‘हिंदु राष्ट्रासाठीचे तिसरे पाऊल’ या पुस्तकाची विक्री चालू आहे. या पुस्तकामध्ये हिंदु राष्ट्राला धर्मांध आणि जातीयवादी, तर श्रीविष्णूच्या वामन अवताराला राज्यघटनाविरोधी दाखवण्याचा अश्लाघ्यपणा करण्यात आला आहे. तसेच हिंदु धर्माला प्रतिगामी ठरवणारी अनेक पुस्तके या ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम दाभोलकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी होता कि हिंदु धर्माची अपकीर्ती करण्यासाठी होता ? असा प्रश्न निर्माण होत आहे. हे प्रदर्शन १ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.
‘फ्रेंड्स ऑफ दाभोलकर’ यांच्या वतीने विक्रीसाठी ठेवण्यात आलेले ‘हिंदु राष्ट्रासाठीचे तिसरे पाऊल’ हे पुस्तक सुधीर पानसे नावाच्या व्यक्तीने लिहिले आहे. पुस्तकाच्या नावाखाली कंसात ‘सुधारित नागरिकत्व कायद्याचा खरा उद्देश काय’ असे लिहिले आहे, म्हणजे याआडून नागरिकत्व कायद्यालाही विरोध करण्याचा लेखकाचा उद्देश दिसतो.
१. या पुस्तकामध्ये ‘हिंदु राष्ट्र स्थापन करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा हिंदु आणि अन्य धर्मीय यांमध्ये दरी निर्माण करत आहे’, असे नमूद करत संघाला धर्मांध ठरवण्यात आले आहे.
२. या पुस्तकात संघाच्या स्वयंसेवकांची उपहासात्मक व्यंगचित्रे रेखाटण्यात आली आहेत.
३. या पुस्तकामध्ये राज्यघटना हातात असलेल्या एका व्यक्तीच्या डोक्यावर एक भव्य व्यक्ती पाऊल ठेवतांनाचे चित्र दाखवण्यात आले आहे. या ठिकाणी बळीराजा आणि वामन अवतार यांचा संदर्भ देण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी हे तिसरे पाऊल अहिंदु नागरिकांच्या डोक्यावर टाकत असल्याचे या चित्रातून सांगण्यात आले आहे.
४. ‘चोर्या-मार्या करणारे आणि भ्रष्टाचारी हे जन्माने हिंदू असतील, तर त्यांना हिंदु समाजातून अन् जातीतून बहिष्कृत करायचे का ? ज्यांचे पूर्वज भारतातून अमेरिकेत गेले आहेत, त्यांच्या अमेरिकेत जन्माला आलेली आणि वाढलेली पुढची पिढी हिंदू आहे का ? नेपाळमधील नागरिकांना हिंदु म्हणायचे का ?’ अशा प्रकारे पुस्तकात विचारलेल्या हास्यास्पद प्रश्नांतून लेखकाला हिंदु राष्ट्राविषयी काहीच ज्ञान नसल्याचे दिसून येते.
५. ‘वर्ष १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धाच्या वेळी ‘हिंदु राष्ट्र’ असे काही उद्दिष्ट नव्हते. फाळणीनंतर भारत हिंदु राष्ट्र न झाल्यामुळे एकसंध राहिला. ‘हिंदु राष्ट्र स्थापन करणे, म्हणजे जिना यांच्या द्विराष्ट्र सिद्धांताचा विजय आहे’, अशा प्रकारे हिंदु राष्ट्राची संकल्पना समजून न घेता लेखकाने अज्ञानमूलक लिखाण केले आहे.
६. ‘पुराणकाळात विमान होते, तर सायकल का नव्हती ?’ असे मूर्खपणाचे प्रश्न या पुस्तकात विचारण्यात आले आहेत. (काही प्राचीन मंदिरांवरील कोरीव कामांमध्ये सायकलसदृश चित्रेही आढळली आहेत, याकडे लेखक महाशय सोयीस्कररित्या डोळेझाक का करत आहेत ? – संपादक) ‘हिंदु राष्ट्र निर्माण करणे म्हणजे देशातील १३० कोटी नागरिकांना अडीच सहस्र वर्षे मागे ढकलण्यासारखे आहे’, असे अभ्यासहीन लिखाण या पुस्तकात करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकावर्ष २०४७ पर्यंत भारताला इस्लामिस्तान करण्याचे स्वप्न पहाणारे आणि त्यासाठी आतंकवादी कारवाया करणारे मुसलमान ‘धर्मांध’ नाहीत, तर लोककल्याणकारी हिंदु राष्ट्र ‘धर्मांध’ आहे, अशी विचारसरणी असणार्या पुरो (अधो)गाम्यांचा भारतद्वेषी दांभिकपणा जाणा ! |