‘विद्युत् दीप असलेली प्लास्टिकची पणती’ आणि ‘मेणाची पणती’ लावल्याने वातावरणात नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे, याउलट ‘तिळाचे तेल अन् कापसाची वात घालून लावलेल्या मातीच्या पारंपरिक पणती’मुळे वातावरणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेली वैज्ञानिक चाचणी

‘अंधकाराला दूर सारून तेजाची उधळण करणारा सण म्हणजे ‘दिवाळी’ ! दिवाळीत घराघरांमध्ये पणत्या लावण्याची परंपरा फार पूर्वीपासून; म्हणजे त्रेतायुगात आरंभ झाली. लंकापती रावणावर विजय मिळवून प्रभु श्रीराम अयोध्येस परतले, तेव्हा प्रजेने दीपोत्सव करून त्यांचे स्वागत केले. सध्याच्या रज-तमप्रधान काळात विद्युत् दीप असलेल्या प्लास्टिकच्या ‘चिनी’ पणत्यांची पेठेत (बाजारात) रेलचेल दिसून येते. तसेच मेणाच्या पणत्या लावण्याची मानसिकताही आढळते. जुनीजाणती मंडळी मात्र तिळाचे तेल आणि हाताने वळलेली कापसाची वात घालून मातीच्या पारंपरिक पणत्या लावतात. ‘विद्युत् दीप असलेली प्लास्टिकची ‘चिनी’ पणती, मेणाची पणती अन् तिळाचे तेल आणि कापसाची वात असलेली पारंपरिक मातीची पणती लावल्यावर त्यांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा वातावरणावर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ५.१०.२०१७ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी)’ तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वस्तू आणि व्यक्ती यांच्या ऊर्जाक्षेत्राचा (‘ऑरा’चा) अभ्यास करता येतो. या चाचणीतील निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

१. वैज्ञानिक चाचणीतील घटकांविषयी माहिती

१ अ. विद्युत् दीप असलेली प्लास्टिकची ‘चिनी’ पणती : ही प्लास्टिकची पणती असून तिच्यामध्ये विद्युत् ऊर्जेवर पेटणारा विद्युत् दीप आहे. या पणत्या दिसायला आकर्षक असतात. यांची निर्मिती प्रामुख्याने चीन देशात केली जाते.

१ आ. मेणाची पणती : ही पणतीच्या आकारात मेणापासून बनवलेली मेणबत्ती आहे.

१ इ. पारंपरिक मातीची पणती : ही पेठेत मिळणारी मातीची सर्वसाधारण पणती आहे. तिच्यामध्ये तिळाचे तेल आणि कापसाची वात घालून ती लावतात.

सौ. मधुरा कर्वे

२. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

या चाचणीत एका पटलावर (टेबलावर) लहान पांढरा ठोकळा ठेवून (त्यापुढे पणत्या ठेवण्यापूर्वी) तेथील वातावरणाचे ‘पिप’ तंत्रज्ञानाद्वारे छायाचित्र घेतले. ही ‘मूलभूत नोंद’ होय. त्यानंतर विद्युत् दीप असलेली प्लास्टिकची ‘चिनी’ पणती, मेणाची पणती अन् तिळाचे तेल आणि कापसाची वात असलेली पारंपरिक मातीची पणती, या तिन्ही पणत्या लावून एकेक करून पटलावर (ठोकळ्यापुढे) ठेवून त्यांची ‘पिप’ छायाचित्रे घेतली. या छायाचित्रांचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर ‘तिन्ही प्रकारच्या पणत्यांतून प्रक्षेपित होत असलेल्या स्पंदनांचा वातावरणावर काय परिणाम होतो ?’, हे समजले.

पुढील सारणीत ‘मूलभूत नोंदी’च्या प्रभावळीतील (चाचणीतील घटक चाचणीसाठी ठेवण्यापूर्वीच्या वातावरणाच्या प्रभावळीतील) आणि चाचणीतील घटकांच्या प्रभावळीतील महत्त्वाची स्पंदने दर्शवणार्‍या रंगांचे प्रमाण दिले आहे. पुढे दिलेल्या विवेचनात चाचणीतील घटकांच्या प्रभावळींची तुलना ‘मूळ नोंदी’च्या प्रभावळीशी केली आहे.

२ अ. विद्युत् दीप असलेल्या प्लास्टिकच्या ‘चिनी’ पणतीमुळे वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण, तसेच चैतन्याच्या स्पंदनांचे प्रमाण न्यून होणे आणि नकारात्मक स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ वाढणे : विद्युत् चिनी पणतीच्या प्रभावळीच्या संदर्भात पुढील सूत्रे लक्षात आली.

१. प्रभावळीत ५४ टक्के सकारात्मक स्पंदने आणि ४६ टक्के नकारात्मक स्पंदने होती, म्हणजे ‘मूलभूत नोंदी’च्या (६१ टक्क्यांच्या) तुलनेत विद्युत् चिनी पणतीच्या प्रभावळीतील एकूण सकारात्मक स्पंदने ७ टक्के घटली.

२. प्रभावळीत चैतन्याचा पिवळा रंगही ८ टक्के घटला.

३. प्रभावळीत नकारात्मक स्पंदने दर्शवणारा भगवा रंग १२ टक्क्यांनी वाढला.

थोडक्यात, ‘मूलभूत नोंदी’च्या तुलनेत विद्युत् दीप असलेल्या प्लास्टिकच्या ‘चिनी’ पणतीमुळे वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण, तसेच चैतन्याच्या स्पंदनांचे प्रमाण न्यून झाले आणि नकारात्मक स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ वाढले.

२ आ. मेणाच्या पणतीमुळे वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण, तसेच चैतन्याच्या स्पंदनांचे प्रमाण न्यून होणे आणि नकारात्मक स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ वाढणे : मेणाच्या पणतीच्या प्रभावळीच्या संदर्भात पुढील सूत्रे लक्षात आली.

१. प्रभावळीत ५६ टक्के सकारात्मक स्पंदने आणि ४४ टक्के नकारात्मक स्पंदने होती, म्हणजे ‘मूलभूत नोंदी’च्या (६१ टक्क्यांच्या) तुलनेत मेणाच्या पणतीच्या प्रभावळीतील सकारात्मक स्पंदने ५ टक्क्यांनी घटली.

२. प्रभावळीत चैतन्याचा पिवळा रंगही ५ टक्के घटला.

३. प्रभावळीत नकारात्मक स्पंदने दर्शवणारा भगवा रंग १० टक्क्यांनी वाढला.

थोडक्यात, ‘मूलभूत नोंदी’च्या तुलनेत मेणाच्या पणतीमुळे वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण, तसेच चैतन्याच्या स्पंदनांचे प्रमाण न्यून झाले आणि नकारात्मक स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ वाढले.

२ इ. पारंपरिक मातीच्या पणतीमुळे वातावरणातील चैतन्याच्या स्पंदनांचे प्रमाण पुष्कळ वाढणे आणि नकारात्मक स्पंदनांचे प्रमाण न्यून होणे : पारंपरिक मातीच्या पणतीच्या प्रभावळीतील सकारात्मक स्पंदनांच्या संदर्भात पुढील सूत्रे लक्षात आली.

१. प्रभावळीत ७२ टक्के सकारात्मक स्पंदने आणि २८ टक्के नकारात्मक स्पंदने होती, म्हणजे ‘मूलभूत नोंदी’च्या तुलनेत पारंपरिक मातीच्या पणतीच्या प्रभावळीतील सकारात्मक स्पंदने ११ टक्क्यांनी वाढली.

२. चैतन्याचा पिवळा रंग ३४ टक्के होता, म्हणजे ‘मूलभूत नोंदी’तील चैतन्याच्या पिवळ्या रंगाच्या (२१ टक्क्यांच्या) तुलनेत तो पुष्कळ वाढला.

३. प्रभावळीत चैतन्याच्या पिवळ्या रंगापेक्षा उच्च स्तरीय सकारात्मक स्पंदने (शुद्धता आणि पवित्रता) दर्शवणारा निळसर पांढरा रंगही (६ टक्के) थोडा वाढला.

थोडक्यात, ‘मूलभूत नोंदी’च्या तुलनेत पारंपरिक मातीच्या पणतीमुळे वातावरणातील सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण, तसेच चैतन्याचे प्रमाण पुष्कळ वाढले आणि नकारात्मक स्पंदनांचे प्रमाण न्यून झाले.

३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

३ अ. विद्युत् दीप असलेली पणती आणि मेणाची पणती यांमधील मानवनिर्मित तमोगुणी घटकांमुळे त्यांमधून नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे, याउलट तिळाचे तेल अन् कापसाची वात असलेली मातीची पणती या नैसर्गिक सत्त्वगुणी घटकांमुळे त्यांमधून सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे : विद्युत् ऊर्जा, प्लास्टिक आणि मेण हे घटक मानवनिर्मित आहेत, तर माती, तिळाचे तेल आणि कापूस हे घटक निसर्गदत्त आहेत. सर्वसामान्यतः नैसर्गिक घटकांत सत्त्वगुण प्रधान असतो, तर अनैसर्गिक (कृत्रिम) घटकांत तमोगुण प्रधान असतो. ज्या घटकात जो गुण प्रधान असतो, तशी स्पंदने त्या घटकातून वातावरणात प्रक्षेपित होतात. सात्त्विक घटकांमुळे मातीच्या पणतीमधून सकारात्मक स्पंदने अधिक प्रमाणात प्रक्षेपित झाली. याउलट मानवनिर्मित तमोगुणी घटकांमुळे विद्युत् पणती आणि मेणाची पणती यांमधून नकारात्मक स्पंदने अधिक प्रमाणात प्रक्षेपित झाली.

थोडक्यात, विद्युत् दीप असलेली पणती आणि मेणाची पणती यांचा वापर टाळून तिळाचे तेल आणि हाताने वळलेली कापसाची वात घालून मातीच्या पणत्या लावणे आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायी आहे.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२१.१०.२०१९)
ई-मेल : [email protected]