जिज्ञासूंना अध्यात्मात प्रगतीपथावर घेऊन जाणारे सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकर (वय ७६ वर्षे) !

सनातनचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकरकाका यांचा आश्विन शुक्ल चतुर्दशी (८.१०.२०२२) या दिवशी ७६ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त देवद आश्रमात वास्तव्यास असलेले श्री. कृष्णकुमार जामदार (वय ७० वर्षे) यांना जाणवलेली पू. काकांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

‘वर्ष १९९७ मध्ये गुजरातमधील कर्णावती (अहमदाबाद) या शहरात प्रथमच सनातन संस्थेची गुरुपौर्णिमा साजरी झाली होती. त्या वेळी कुतुहलापोटी मी त्या कार्यक्रमाला गेलो होतो. तिथे प.पू. डॉक्टरांची (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची) ‘साधना’ विषयक दृक्-श्राव्य चकती (सी.डी.) लावण्यात आली होती. प.पू. डॉक्टरांकडे बघताक्षणी ‘ते आपल्या ओळखीचे आहेत’, असे मला वाटले. साधना म्हणजे ‘कुलदेवीची उपासना, नामजप, सत्संग, सत्सेवा आणि त्याग करणे’, यांविषयी मला माहिती मिळाली.  

पुढे दीड-दोन मासांनंतर सहसाधकांसह पू. शिवाजी वटकरकाका माझ्या निवासस्थानी आले होते. तेव्हा पू. काकांचा आणि माझा परिचय झाला. त्यांनी मला प्रत्येक रविवारी होणार्‍या सत्संगाला येण्यास सांगितले. सत्संगाचे स्वरूप, विषयाची मांडणी, ‘त्याचे आकलन झाले का ?’, याची चौकशी आणि शंकानिरसन करणे इत्यादींनी मी प्रभावित झालो. सनातन संस्था आणि तिचे कार्य यांविषयी सर्व समजले. येथूनच आमचा साधनाप्रवास चालू झाला. त्या वेळी पू. वटकरकाका एस्.सी.आय. नावाच्या आस्थापनात उच्च पदावर कार्यरत होते. प्रत्येक आठवड्याच्या शेवटी शनिवार आणि रविवार असे दोन दिवस ते कर्णावती येथे प्रसार सेवेसाठी येत असत. पू. काकांच्या सहवासात त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

पू. शिवाजी वटकरकाका यांच्या चरणी ७६ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

१. पू. वटकरकाका यांच्या समवेत प्रसारकार्य करतांना त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

१ अ. पू. काकांच्या प्रेमभावाने प्रभावित होणे : पू. काकांच्या ठायी असलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या कार्यशैलीचा परिचय झाल्यावर मी अन् इतर साधक सनातन संस्थेच्या कार्यात सहभागी झालो. सत्संगात नेमकेपणाने विषय मांडणे, समजावणे, जिज्ञासूंना बोलण्यासाठी प्रोत्साहित करणे, शंकानिरसन करणे, चुका निदर्शनास आणून देणे, वेळेचा पूर्ण उपयोग करणे इत्यादी करतांना ‘साधकांना आणि जिज्ञासूंना काही अडचण येत नाही ना ?’, याकडेही त्यांचे लक्ष असे. अर्थात् यामागे त्यांच्या ठायी असलेला प्रेमभाव होता, जो साधकांना आणि जिज्ञासूंना प्रेरणा देत असे. प्रत्येक कृती वेळेवर आणि अनुशासनबद्ध रितीने करण्याचा त्यांचा आग्रह असे. त्यामुळे त्यांच्याविषयी साधकांना आदर आणि आधार वाटत असे.

१ आ. सेवेच्या तळमळीमुळे मुंबई ते कर्णावती हा प्रवास प्रत्येक आठवड्याला करणे : मुंबईमधील आस्थापनातील उच्च पदावर सोमवार ते शुक्रवार कार्यरत राहून शुक्रवारी रात्री कर्णावतीला जायचे. शनिवार-रविवार प्रसारसेवा करून पुन्हा रविवारी रात्री परतीचा प्रवास करायचा आणि सोमवारी त्यांच्या कार्यालयात उपस्थित रहायचे, असे पू. काका प्रत्येक सप्ताहात करायचे. ५०० कि.मी. प्रवासाचा शीण-थकवा त्यांच्या तोंडवळ्यावर कधी दिसला नाही. यावरून सेवेसाठीची त्यांची तळमळ आम्हा साधकांना झोकून देऊन सेवा करण्यासाठी प्रेरणादायी ठरली. आम्ही प्रत्येक शनिवार-रविवार त्यांची उत्सुकतेने वाट पहात असू. ‘मुंबईमधील कामाच्या व्यस्ततेतून कर्णावतीला यायला तुम्हाला कसे जमते ?’, असे विचारल्यावर ‘तुम्हालाही जमेल’, असे ते सांगायचे.

१ इ. प्रसारकार्यातील बारकावे शिकवणे : नवीन जिज्ञासूंना संपर्क करण्यासाठी जातांना ते आम्हाला प्रसारकार्यातील बारकावे समजावून सांगायचे. जिज्ञासू कोणती साधना करत आहे ? तिथे विषय कसा मांडायचा ? ‘कुलदेवीची उपासना आध्यात्मिक उन्नतीसाठी कशी उपयुक्त आहे ?’, हे कसे सांगायचे ? ग्रंथ समवेत घेऊन गेल्यास त्यांचा अभ्यास करून सूत्रे प्रभावीपणे कशी मांडायची ? इत्यादी पू. काकांनी आम्हाला शिकवले.

१ ई. वेळेचा सदुपयोग : ज्या साधकाकडे त्यांचा निवास असे, तेथील साधिकांना ते अगत्याने सांगत असत, ‘‘फार काही करू नका. खिचडी करा, म्हणजे तुम्हाला मार्गदर्शनाच्या वेळी उपस्थित रहाता येईल.’’

१ उ. साधकांना घडवण्याची तळमळ : कर्णावतीला आल्यानंतर ज्यांना मागील आठवड्यात काही कृती, उदा. नामजप, ग्रंथवाचन, प्रवचनाची सिद्धता इत्यादी सांगितल्या असतील, त्यांचा आढावा पू. काका घेत असत. विशेषतः प्रवचन पाठ म्हणून घेऊन त्यात सुधारणा सांगत असत. ‘हे त्यांच्यापुढे कसे मांडायचे ?’, याची भीती आम्हाला वाटत असे; परंतु ‘ते आपल्या पाठीशी आहेत’, हा भाव असल्यामुळे साधकांना धीर येत असे. त्यातून जिज्ञासूंचे रूपांतर साधकांमध्ये करून त्यांना घडवण्याची त्यांची तळमळ दिसून आली आणि त्यांचा प्रेमभाव अनुभवता आला. त्यांच्या या भगीरथ सेवेची पोचपावती म्हणून साधकवृंद निर्माण झाला आणि साधक उत्तरदायित्त्व घेऊन सेवा करू लागले. कर्णावती येथे लावलेले रोपटे पुढे मोठे होऊन बडोदा, वापी, उमरगाम, राजकोट इत्यादी ठिकाणी प्रसारकार्य वृद्धींगत झाले. निःसंशय हे सर्व प.पू. गुरुमाऊलींच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने आणि पू. काकांच्या अविरत प्रयत्नांनी झाले.

१ ऊ. अभ्यासू वृत्तीने कार्यक्रमाचे नियोजन करणे : एखादा कार्यक्रम, सभा किंवा मेळावा यांचे नियोजन करणे, पूर्णपणे अभ्यास करून त्यासाठी सभागृह बघणे, साहित्य गोळा करणे, साधकांचे संख्याबळ, प्रसारकार्य इत्यादींचे नियोजन करणे आणि ते कार्य पूर्णत्वाला नेणे, इत्यादींसाठी पू. काकांच्या ठायी असलेल्या अभ्यासू वृत्तीचा आम्हा साधकांना प्रत्यय आला.

पू. काकांनी श्री. संतोष आळशी यांच्याकडून वरील प्रकारच्या सेवा वेळेवर करून घेतल्या. साधकसंख्या आणि फलकसंख्या यांचे व्यवस्थित नियोजन करून थंडीचे दिवस असतांनाही सकाळची प्रसारफेरीची सेवा त्यांनी वेळेवर पूर्ण करून घेतली. त्यांचा हा गुण पुष्कळ शिकवून गेला.

२. मुंबई येथे ‘हिंदु जनजागृती समिती’च्या अंतर्गत पू. काकांनी केलेल्या कार्याने राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळणे

पू. काकांनी पुढे धर्मरक्षणाच्या विविध सेवा करण्यासाठी स्वतःला झोकून दिले. ‘हिंदु धर्म, देवता, सण-उत्सव इत्यादींवर होणार्‍या विडंबनात्मक आघातांचा वैध मार्गाने विरोध करणे, ते अपप्रकार शासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी लेखी निवेदने देणे, पत्रकार परिषदा घेऊन सुस्पष्ट शब्दांत आपले विचार मांडणे’, असे कार्य ते करत असत. ‘गणेशोत्सवात ‘प्लास्टर ऑफ पॅरीस’च्या मूर्ती बनवण्यावर शासनाने प्रतिबंध आणावा, १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या राष्ट्रीय उत्सवांच्या दिवशी प्लास्टिकच्या तिरंग्या ध्वजाची विक्री अन् उत्पादन यांना प्रतिबंधित करावे’, यासाठी  समविचारी संघटनांना स्वत:समवेत घेऊन आंदोलन (मोहिम) करणे इत्यादी अनेक सेवा ते अत्यंत तळमळीने, उत्साहाने आणि स्वतः पुढाकार घेऊन करत असत. त्यांच्या या कृतीतून राष्ट्र आणि धर्म यांसाठी सेवा करण्याची प्रेरणा मलाही मिळाली अन् तिचा लाभ कर्णावती येथे धर्मजागृती आणि राष्ट्ररक्षण यांसंबंधीच्या सेवांमध्ये सहभागी होण्यासाठी मला झाला.

श्री. कृष्णकुमार जामदार

३. पू. वटकरकाका यांच्याकडून मिळालेली शिकवण

पू. काका कर्णावतीला येत असत, त्या काळात आणि आता संतपदी विराजमान झाल्यानंतरही त्यांच्याकडून काही गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांपैकी काही सूत्रे पुढे दिली आहेत.

अ. आपले व्यक्तीमत्त्व प्रेमळ असावे.

आ. आपल्या बोलण्यात मृदुता आणि नम्रता असावी.

इ. कुठलीही कृती केल्यानंतर ती श्रीगुरुचरणी समर्पित करावी.

ई. कुठल्याही गोष्टीचा कर्तेपणा स्वतःकडे घेऊ नये.

उ. कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त न करता आज्ञापालन करावे.

ऊ. सेवा नेहमी शरणागतभावाने करावी.

ए. चुकांकडे लक्ष देऊन त्या उणावण्यासाठी स्वभावदोष आणि अहं यांची निर्मूलन प्रक्रिया कठोरपणे राबवावी.

ऐ. कधीही अल्पसंतुष्ट नसावे.

ओ. श्रीगुरुसेवेसाठी प्रसंगी स्वतःकडे न्यूनपणा घ्यावा.

औ. सहसाधकांकडून एखादी सेवा अपूर्ण राहिली, तर ती स्वतःची समजून पूर्ण करावी.

४. पू. वटकरकाकांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव

मी पूर्णवेळ साधना करण्यासाठी देवद, पनवेल येथील आश्रमात आलो. तिथे पू. काका यांच्या खोलीत माझी निवासव्यवस्था करण्यात आली होती. ‘त्यांचे सान्निध्य लाभणे’, हे मी माझे भाग्यच समजतो. ते पहाटे लवकर उठून स्नानादी उरकून दैनंदिन साधना चालू करायचे. त्यामुळे आम्ही इतर साधकही लवकर उठून त्यांच्यासह प्रार्थनेला बसायचो. त्यांच्यासह प्रार्थना झाल्यावर ते प.पू. गुरुमाऊलीच्या चरणी संपूर्ण शरणागतभावाने गुरुकृपेसाठी याचना करायचे. ते अशा काही भावभरल्या शब्दांनी प.पू. गुरुदेवांची आळवणी करायचे की, त्यामुळे आम्हा सर्वांची भावजागृती होत असे. त्यांच्या मुखातून बाहेर पडणार्‍या ‘हे गुरुदेवा !’ या आर्त शब्दांनी आमचे डोळे पाणावयाचे. आजही ते शब्द आठवले की, पू. काकांप्रती कृतज्ञता वाटते.

‘पू. काकांचे कर्णावती येथे प्रसारसेवेसाठी येणे आम्हा साधकांच्या उन्नतीसाठीच होते’, हे आमच्या प्रत्ययास आले. जरी त्यांचे कर्णावती येथील सेवाकार्य अल्प कालावधीचे असले, तरी ते आमच्यासाठी बहुमूल्य ठरले. यासाठी पू. काकांच्या चरणी वंदन आणि कृतज्ञता व्यक्त करतो.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने हे लिखाण पूर्ण झाले, यासाठी त्यांच्या सुकोमल चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करून ते त्यांच्याच चरणी समर्पित करत आहे.’

– श्री. कृष्णकुमार जामदार (वय ७० वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२४.८.२०२२)