१. व्यष्टी साधना करतांना करावयाचे प्रयत्न
१ अ. समष्टी साधना करणे शक्य नसल्यास व्यष्टी साधना करतांना घरीच स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवावी ! : ‘काही शारीरिक आणि कौटुंबिक अडचणी, तसेच आजारपण यांमुळे ज्यांना समष्टी साधना करणे शक्य नसेल, त्यांनी संतांनी सांगितल्याप्रमाणे घरच्या घरीच साधना आणि सेवा करावी. घरातील नित्य कर्मे करतांना होणार्या चुका लिहून ठेवाव्यात आणि त्यासाठी प्रायश्चित्तही घ्यावे. रात्री झोपतांना घरातील कामांचा आढावा देवाला द्यावा. घरातच एक फलक ठेवून त्यावर नेहमी आपल्या चुका लिहाव्यात. घरातील माणसांनाच आपल्याकडे लक्ष ठेवण्यास सांगावे. त्यांचे साधनेत साहाय्य घ्यावे. त्यांच्या संदर्भात स्वतःच्या काही चुका लक्षात आल्या, तर स्वतःचे कान धरून त्यांच्याकडे क्षमायाचना करावी.
१ आ. साधनेमुळे आपल्या वागण्यात झालेले सकारात्मक पालट पाहून घरातील इतर सदस्यही साधना करू लागणे आणि घरातील वातावरण पालटणे ! : आपणच आपली शुद्धीकरण प्रक्रिया चालू केली, तर घरच्यांचा आपल्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटतो. सतत होणार्या चुकांवर लक्ष ठेवून त्यानुसार स्वयंसूचना घेतल्याने हळूहळू आपल्यातील स्वभावदोष न्यून होऊ लागतात आणि आपला तोंडवळा अन् मन आनंदी होऊ लागते. घरच्यांनाही आपल्यात झालेला पालट लक्षात येऊ लागतो. आपल्यापेक्षा घरातील सदस्य आपल्या वागण्याचे अधिक निरीक्षण करत असतात. साधनेने आपल्यात आलेली स्थिरता पाहून इतरांना आपला आधार वाटू लागतो. त्यांना वाटते, ‘अरे, पहिल्यांदा हे कसे होते आणि साधना करून यांच्यात किती सकारात्मक पालट झाले आहेत ?’ आपला आदर्श घेऊन हळूहळू घरातील इतर सदस्यही साधना करू लागतात. घरातील एकूण वातावरणच पालटते.
१ इ. ‘घरात आपल्या समवेत साक्षात् भगवंत आहे’, या दृढ श्रद्धेने साधना करावी ! : घरात एकटे राहून साधना करतांना घरात करता येतील, अशा सोप्या सोप्या सेवा कराव्यात. ‘मी घरात एकटी आहे, तर काय करणार ?’, असा विचार करू नये. ‘आपल्या समवेत साक्षात् भगवंत आहे. तो सार्या ब्रह्मांडाचा चालक आहे. तो आपल्या जीवनाचा सारथी होणार नाही का ?’, अशा दृढ श्रद्धेनेच साधना करावी.
२. साधनेतील प्रगतीसाठी समष्टी साधनेचे महत्त्व
२ अ. देव सहसाधकांच्या माध्यमातून आपल्यातील स्वभावदोष दाखवत असल्याने समष्टीत साधनेचा कस लागणे : एकट्याने राहून आपल्याला जेवढे शिकायला मिळणार नाही, तेवढे समष्टीत आल्यावर शिकण्याची संधी असते. समष्टीत राहिल्याने आपल्यातील गुण आणि दोष लगेच लक्षात येतात. आपल्या साधनेचा खरा कस हा समष्टीत गेल्यावरच लागतो. घरात एकटे बसून नामजपादी साधना करणे सोपे आहे; कारण तेथे आपल्याला कुणी आपल्यातील स्वभावदोष दाखवून देत नाही; परंतु समष्टी साधना करतांना मात्र देव सहस्रो डोळ्यांनी आपले गुण आणि दोष सहसाधकांच्या माध्यमातून पहात असतो.
२ आ. समष्टीत मनाने करण्याचा भाग न्यून होऊन अहं-निर्मूलन होण्यास साहाय्य होणे : एकटे असतांना आपले चूक आणि बरोबर सांगणारे स्थुलातून कुणी बरोबर नसते. एकटेपणातून बाहेर येऊन समष्टीच्या समवेत साधना केली, तर मनाने करण्याचा भाग न्यून होऊन इतरांचे ऐकण्याची वृत्ती वाढते. दुसर्यांना विचारून कृती करण्याचा संस्कार निर्माण होतो. त्यामुळे आपला अहं न्यून होण्यास साहाय्य होते.
२ इ. समष्टी साधना करतांना सहसाधकांनी सांगितलेल्या चुका स्वीकारल्याने देवाला आवडणार्या ‘नम्रता’ या गुणाचे संवर्धन होणे : समष्टी साधना करण्यास वातावरण अनुकूल असेल, तर मात्र सहसाधकांच्या सहवासात जाऊन सेवेलाच अधिक प्राधान्य द्यावे; कारण त्यामुळे आपली लवकर प्रगती होते. समष्टीमध्ये इतर साधकांच्या माध्यमातून ‘समष्टी-ईश्वर’ आपल्याला आपले गुण-अवगुण दाखवून साधनेत पुढे जाण्यास साहाय्य करत असतो. सहसाधकांनी आपल्या चुका सांगितल्यानंतर मात्र त्या मोठ्या मनाने स्वीकाराव्यात. यातच आपले भले असते. स्वीकारण्याची वृत्ती वाढल्याने आपल्यात ‘नम्रता’ या गुणाचे संवर्धन होते. नम्रतेमुळे आपण साधकांचे, संतांचे आणि शेवटी देवाचेही लाडके होतो.
२ ई. समष्टी सत्संगामुळे मनोलय आणि बुद्धीलय होऊन देवप्राप्ती होणे : समष्टीच्या सत्संगाचे महत्त्व पुष्कळ आहे. शक्य असेल, तेवढे समष्टीमधे राहून साधना आणि सेवा करण्याचा प्रयत्न करून स्वतःच्या चुकांकडे सतत लक्ष दिल्यास गुरुकृपा जलद संपादन करता येते. त्यामुळे मनोलय आणि बुद्धीलय झाल्याने लवकर देवप्राप्ती होते.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (२६.३.२०२०)