गोवा : अमली पदार्थ तस्कराकडून लाच घेणारे २ पोलीस निलंबित

म्हापसा – अमली पदार्थ तस्करीच्या प्रकरणी अटकेत असलेल्या ब्रिटीश नागरिकाकडून लाच घेतल्याच्या आरोपाखाली पेडणे पोलीस स्थानकाचे हवालदार राजेश येसी आणि कॉन्स्टेबल आपा परब यांना सेवेतून निलंबित करण्यात आले. पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना यांनी प्राथमिक चौकशीअंती ही कारवाई केली.

अनेक विभागांतील पोलिसांना दिली लाच !

अमली पदार्थ प्रकरणी अटक केलेल्या ब्रिटीश नागरिकाकडून ५ सप्टेंबर या दिवशी कारवाई होण्याच्या काही दिवस आधी ‘अटक होऊ नये’, यासाठी लाच घेतल्याच्या आरोपाखाली २ पोलिसांना ५० सहस्र रुपयांची लाच दिली होती. ‘अनेकदा वेगवेगळ्या विभागांतील पोलिसांनाही लाच देत होतो. (लाच घेणार्‍यांना तातडीने शोधून त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई व्हायला हवी ! – संपादक) ५ सप्टेंबरला कारवाई करतांना सुमारे ३ लाखांचे विदेशी चलनही पोलिसांनी जप्त केले होते’, अशी माहिती अमली पदार्थांची तस्करी करणार्‍या ब्रिटीश नागरिकाने वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना दिली.

५ सप्टेंबर या दिवशी हरमल येथे छापा टाकून पेडणे पोलिसांनी स्टिफन स्लोटविनर (वय ७६ वर्षे) या ब्रिटीश अमली पदार्थ तस्कराला अटक केली होती. या कारवाईत त्याच्याकडून गांजा, एमडीएमए , एलएसडी पेपर्स, एलएसडी कॅप्सूल्स, एक्स्टसी आदी विविध प्रकारचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. त्यांची किंमत १५ लाख रुपये इतकी होती. यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी संशयिताची पणजी पोलीस मुख्यालयात आणून चौकशी केली होती. तेव्हा त्याने पोलीस कर्मचार्‍यांना लाच दिल्याचे सांगितले. या माहितीची निश्चिती करण्याचा आदेश वरिष्ठांनी पोलीस अधीक्षक आणि उपअधीक्षक यांना दिला होता. त्यानुसार चौकशीच्या वेळी पोलिसांनी लाचस्वरूपात घेतलेली पूर्ण रक्कम जप्त करण्यात आली.


(सौजन्य : ingoanews)  

_________________________

अमली पदार्थ बाळगल्याच्या प्रकरणी दोघांना अटक

मांद्रे – येथे २ ऑक्टोबर या दिवशी रशियाचा नागरिक वाटकोव्हस्किया या ३८ वर्षीय नागरिकाला अंदाजे ८५ सहस्र रुपयांचा चरस हा अमली पदार्थ बाळगल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. अन्य एका घटनेत बेतोडा, फोंडा येथे ओडिशातील युवक बिकाश चंद्र स्वेन याच्याकडून फोंडा पोलिसांनी २ किलो गांजा (किंमत अंदाजे २ लाख रुपये) जप्त केला असून त्याला अटक केली आहे.

संपादकीय भूमिका

  • गोव्यातील अमली पदार्थांचा व्यवसाय कारवाईनंतरही आटोक्यात का येत नाही ? हे पुन्हा एकदा उघड झाले ! कुंपणच शेत खात असेल, तर गोव्याला लागलेला ‘अमली पदार्थांचे ठिकाण’ हा ठपका कधीतरी पुसला जाईल का ?
  • अशा किती पोलिसांनी आतापर्यंत लाच घेतली असेल, त्याची चौकशी व्हायला पाहिजे ! या प्रकरणातील सर्व पोलिसांवर निलंबनाची नव्हे, तर बडतर्फीची कारवाई व्हायला हवी !