संभाजीनगर येथे मनसेच्या कार्यकर्त्यांकडून ‘पी.एफ्.आय.’ संघटनेचे कार्यालय फोडण्याचा प्रयत्न !

पी.एफ्.आय.च्या कार्यकर्त्यांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोेषणा दिल्याचे प्रकरण

संभाजीनगर – देशविघातक कृत्ये करणार्‍या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) या संघटनेवर देशातील विविध शहरांत कारवाई करण्यात आली. २४ सप्टेंबर या दिवशी पुणे येथे ‘पी.एफ्.आय.’च्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करतांना ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या होत्या. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला होता. त्यानुसार या घोषणांच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शहरातील किराडपुरा भागातील ‘पी.एफ्.आय.’ संघटनेचे कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला.

पुणे येथील ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणांचे राज्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याविषयी आक्रमक भूमिका घेतली आहे. येथील मनसेच्या कार्यकर्त्यांनी ‘पी.एफ्.आय.’च्या कार्यालयावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. या वेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. या वेळी पोलिसांनी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याकडून झेंडे आणि अन्य साहित्य जप्त करून कार्यकर्त्यांना कह्यात घेतले.

मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या प्रतिक्रिया

१. शिवरायांच्या भूमीत असल्या घोषणा अजिबात सहन केल्या जाणार नाहीत ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ट्वीट करत म्हणाले, ‘‘पुण्यात ज्या समाजकंटकांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या त्या प्रवृत्तीचा करावा तेवढा निषेध अल्पच आहे. पोलीसयंत्रणा त्यांच्या विरोधात योग्य ती कारवाई करेलच; पण शिवरायांच्या भूमीत असल्या घोषणा अजिबात सहन केल्या जाणार नाहीत.

२. ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍यांना सोडणार नाही, कारवाई करू !’ – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे पोलिसांनी प्रविष्ट केलेल्या प्रथम दर्शनी अहवालामध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशा प्रकारच्या घोषणा दिल्याचा उल्लेखच नाही !

सामाजिक माध्यमांवर पी.एफ्.आय.च्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील आंदोलनात ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्याचा दावा करण्यात आला आहे. सामाजिक माध्यमांवरही ही ध्वनीचित्रफीत प्रसारित झाली आहे; मात्र पुणे पोलिसांनी प्रविष्ट केलेल्या प्रथमदर्शनी अहवालामध्ये अशा प्रकारच्या घोषणेचा उल्लेख नाही. ‘ईडी, एन.आय.ए.मुर्दाबाद’, ‘पी.एफ.आय. झिंदाबाद’, ‘भाजप मुर्दाबाद’, अशा घोषणा केल्याचे पोलिसांनी प्रथमदर्शनी अहवालामध्ये म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

असे पोलीस भारताचे कि पाकचे ?