संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्वाला अमेरिकेचे समर्थन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (उजवीकडे)

वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भारत, जपान आणि जर्मनी यांना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य बनवण्यासाठी पाठिंबा दर्शवला आहे. बायडेन प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने ही माहिती दिली. बायडेन यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या अधिवेशनाला संबोधित करतांना सुरक्षा परिषदेत सुधारणा करण्याच्या आवश्यकतेचाही पुनरुच्चार केला.

बायडेन म्हणाले की, सुरक्षा परिषद अधिक सर्वसमावेशक बनवण्याची वेळी आली आहे. तसे केल्याने ती आजच्या युगाच्या आवश्यकता चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकेल. सुरक्षा परिषदेची विश्‍वासार्हता आणि परिणामकारकता टिकवून ठेवण्यासाठी ‘व्हीटो’चा वापर केवळ विशेष परिस्थितीतच केला जावा. अमेरिकेने सुरक्षा परिषदेच्या स्थायी आणि अस्थायी सदस्यांची संख्या वाढविण्यासाठी नेहमीच आग्रह धरला आहे, असेही बायडेन या वेळी म्हणाले.