ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या पार्थिवावर १९ सप्टेंबर या दिवशी राजेशाही परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. विन्सडर कॅसल येथील सेंट जॉर्ज मेमोरियल चॅपलमध्ये महाराणीचे पार्थिव पुरण्यात आले. ८ सप्टेंबर या दिवशी वयाच्या ९६ व्या वर्षी महाराणीचे निधन झाले होते. राजेशाही परंपरेनुसार महाराणीचा अंत्यसंस्कार तिच्या मृत्यूनंतर १० दिवसांनी केला जातो. अंत्यसंस्कार झाल्यानंतर देशभरात २ मिनिटांचे मौन पाळण्यात आले. या अंत्यसंस्काराला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आदी जगभरातील ५०० हून अधिक मान्यवर सहभागी झाले होते.

ब्रिटनने उघुर मुसलमानांवर अत्याचार करणार्‍या चीनला वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये येण्याची अनुमती नाकारली !

एकीकडे जगभरातील ५०० मान्यवरांना अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आले असले, तरी चीनच्या उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळाला वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये येण्याची अनुमती नाकारण्यात आली आहे. यामागे खासदार लिंडसे हॉयल यांनी ‘चीन हा उघुर मुसलमानांवर अत्याचार करत असल्याचा आरोप ५ ब्रिटीश खासदारांनी केल्यावर चीनने त्यांच्यावर प्रतिबंध लादला. त्यामुळे चिनी प्रतिनिधी मंडळावरही ब्रिटनकडून निर्बंध लादण्यात आले आहेत’, असे कारण दिले आहे, असे बीबीसी आणि अन्य ब्रिटीश वृत्तसंस्थांकडून सांगण्यात येत आहे.