६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. प्रदीप चिटणीस आणि आध्यात्मिक पातळी ६१ टक्क्यांपेक्षा अल्प असलेला एक साधक यांनी सुगम संगीताच्या अंतर्गत गायलेल्या मराठी अन् हिंदी गाण्यांचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘२८.२.२०२२ या दिवशी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या अंतर्गत भारतीय शास्त्रीय संगीतात ‘विशारद’ असणारे आणि ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. प्रदीप चिटणीस यांनी ‘सुगम संगीत’ या अंतर्गत काही गाणी गायली. ३१.३.२०२२ या दिवशी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या अंतर्गत एका साधकाने सुगम संगीताच्या अंतर्गत श्री. चिटणीसकाका यांनी गायलेली गाणी गायली. सुगम संगीताच्या गायनाचा प्रयोग वाईट शक्तींचा त्रास असणार्‍या आणि नसणार्‍या साधकांच्या संदर्भात घेण्यात आला. तेव्हा देवाच्या कृपेने माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.

श्री. प्रदीप चिटणीस

१. श्री. प्रदीप चिटणीस आणि एक साधक यांनी सुगम संगीताच्या अंतर्गत गायलेली गाणी

टीप १ – श्री. प्रदीप चिटणीस यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के असल्यामुळे त्यांनी गायलेल्या गाण्यातून सत्त्वगुणाची स्पंदने रजोगुणाच्या स्पंदनांपेक्षा अधिक प्रमाणात प्रक्षेपित झाली.

टीप २- एक साधक यांना मंद त्रास असल्यामुळे आणि त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्क्यांपेक्षा अल्प असल्यामुळे त्यांनी गायलेल्या गाण्यातून रजोगुणाची स्पंदने सत्त्वगुणी स्पंदनांपेक्षा अधिक प्रमाणात प्रक्षेपित झाली.

टीप ३ – सुगम संगीतातील गाण्यांचा केंद्रबिंदू ‘माया’ आहे. या गाण्यांमध्ये प्रियकर आणि प्रेयसी एकमेकांना उद्देशून गात असतात. त्यामुळे या गाण्यांमध्ये ‘प्रेमभावना’ प्रबळ आहे. ‘प्रीती’ ही सत्त्व प्रधान , ‘प्रेमभाव’ सत्त्व-रज प्रधान आणि ‘प्रेमभावना’ रजोप्रधान आहे. सुगम संगीताच्या अंतर्गत गायलेल्या मराठी गाण्यांतून प्रेमभावना प्रगट होऊन या गाण्यांतून प्रामुख्याने रजोगुणी स्पंदने अधिक प्रमाणात प्रक्षेपित झाली. त्यामुळे ही गाणी गातांना आणि ऐकतांना राजसिक सुखाची अनुभूती आली.

टीप ४ – काही हिंदी गाण्यांमध्ये परकीय भाषेतील शब्दांचा वापर अधिक प्रमाणात झाला होता. परकीय भाषा तामसिक असून तिच्याकडे त्रासदायक शक्ती अधिक प्रमाणात आकृष्ट होऊन  परकीय भाषेतील शब्दांतून त्रासदायक शक्ती वातावरणात प्रक्षेपित होते. त्यामुळे अनेक गाण्यांतील परकीय भाषेतील शब्दांमुळे त्यांना त्रासदायक शक्ती प्रक्षेपित झाल्यामुळे ती गाणी ऐकल्यावर मायावी सुखाची अनुभूती अधिक प्रमाणात आली.

टीप ५ – सुगम संगीतामध्ये निवडलेल्या गाण्यांमध्ये प्रामुख्याने रजोगुण आणि काही गाण्यांमध्ये तमोगुणी त्रासदायक शक्ती पुष्कळ प्रमाणात कार्यरत झाली होती. श्री. चिटणीसकाका यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के असल्यामुळे त्यांच्यामध्ये सत्त्वगुण अधिक प्रमाणात कार्यरत झाला होता. त्यामुळे ते जेव्हा सुगम संगीताच्या अंतर्गत रजोगुणी गाणी गात होते, तेव्हा त्यांची सत्त्वगुणवर्धिनी असणारी सुषुम्नानाडी बंद होऊन रजोगुण न्यून करणारी चंद्रनाडी चालू होण्यासाठी वेळ लागत होता. त्यामुळे त्यांना सुगम संगीताच्या अंतर्गत गाणी गाण्यासाठी अधिक प्रमाणात प्रयत्न करावे लागत होते. या उलट एक साधक यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्क्यांपेक्षा न्यून असल्यामुळे आणि त्यांना वाईट शक्तींचा मंद स्वरूपाचा त्रास असल्यामुळे त्यांना विशेष प्रयत्न न करता सुगम संगीताच्या अंतर्गत मराठी आणि हिंदी भाषेतील गाणी म्हणणे सोपे गेले.

टीप ६ – श्री. प्रदीप चिटणीस यांची पातळी ६१ टक्के असल्यामुळे त्यांनी गायलेल्या सुगम संगीतातून त्रासदायक शक्ती अल्प प्रमाणात आणि सात्त्विक स्पंदने अधिक प्रमाणात प्रक्षेपित झाली. त्यामुळे श्री. प्रदीप चिटणीस यांनी गायलेल्या सुगम संगीतामुळे श्रोत्या साधकांवर नकारात्मक परिणाम अल्प प्रमाणात आणि सकारात्मक परिणाम अधिक प्रमाणात झाला. याउलट एक साधक यांची पातळी ६१ टक्क्यांपेक्षा न्यून असल्यामुळे आणि त्यांना वाईट शक्तींचा मंद स्वरूपाचा त्रास असल्यामुळे त्यांनी गायलेल्या सुगम संगीतातून सकारात्मक स्पंदने अल्प प्रमाणात आणि नकारात्मक स्पंदने अधिक प्रमाणात प्रक्षेपित झाली.

टीप ७ – वाईट शक्तींचा त्रास नसणार्‍या साधकांवर सुगम संगीताचा परिणाम अल्प काळ टिकून राहिला. याउलट वाईट शक्तींचा तीव्र त्रास असणार्‍या साधकांतील वाईट शक्तींनी साधकांचा रजोगुण वाढवल्यामुळे आणि त्रासदायक शक्ती अधिक प्रमाणात ग्रहण केल्यामुळे त्यांच्यावर सुगम संगीताच्या प्रयोगाचा परिणाम दीर्घ काळ टिकून राहिला.

टीप ८ – श्री. प्रदीप चिटणीस आणि एक साधक यांची तौलनिक आध्यात्मिक वैशिष्ट्ये

टीप : प्रदोष : शुद्ध आणि कृष्ण पक्षांच्या दोन्ही त्रयोदशींना सूर्य मावळल्यानंतर तीन घटकांच्या काळाला ‘प्रदोष’ म्हणतात. सोमवारी येणार्‍या त्रयोदशीला ‘सोमप्रदोष’ म्हणतात.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ : ‘व्रते’ ) प्रदोषच्या दिवशी शिवाची उपासना करतात. त्यामुळे ही तिथी सात्त्विक असते.

निष्कर्ष

दोन्ही गायकांच्या संदर्भात गाण्याचे स्थळ एकच असून गायकांची पातळी, त्यांना असलेला आध्यात्मिक त्रास आणि तिथी निराळी असल्यामुळे त्यांच्या प्रयोगांचा स्वत:वर अन् प्रयोगाला उपस्थित असणार्‍या साधकांवर परस्पर विरोधी परिणाम झाल्याचे दिसून आले. यावरून ‘स्थळ म्हणजे ठिकाण, व्यक्ती म्हणजे गायक आणि काळ म्हणजे तिथी या तिन्ही घटकांचा संगीताचा प्रयोग, धार्मिक विधी इत्यादी घटनांवर कशा प्रकारे होतो’, हे सूत्र शिकायला मिळाले.

२. दोन्ही गायकांच्या सुगम संगीताच्या प्रयोगाच्या वेळी वाईट शक्तींचा त्रास असणार्‍या श्रोत्या साधकांतील वाईट शक्तींनी प्रकट होऊन केलेल्या सामाईक कृती

कु. मधुरा भोसले

प्रयोगाचा परिणाम प्रयोगाच्या आधीपासून चालू झाल्यामुळे प्रयोगाला उपस्थित असणार्‍या साधकांतील वाईट शक्ती प्रयोगाच्या आधीपासून प्रकट होऊन बोलत होत्या आणि विनोद करत होत्या. वाईट शक्तींचा तीव्र त्रास असणार्‍या श्रोत्या साधकांतील वाईट शक्तींनी सुगम संगीतातील मराठी गाणी ऐकत असतांना राजसिक सुखाची आणि हिंदी भाषेतील गाणी ऐकत असतांना मायेतल्या सुखाची अनुभूती अधिक प्रमाणात आली. त्यामुळे त्यांनी सुगम संगीताच्या प्रयोगांच्या वेळी पुढील कृती केल्या.

अ. साधकांतील वाईट शक्ती प्रकट झाल्यामुळे त्यांचे मन चंचल झाले. त्यामुळे त्यांच्यावर गाण्यातील रजोगुणी आणि तमोगुणी स्पंदनांचा परिणाम अधिक प्रमाणात झाल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रयोगाला आरंभ होताच त्यांची मान आणि शरीर गाण्याच्या चालींवर डोलत होती.

आ. काही साधकांमध्ये प्रकट झालेल्या वाईट शक्तींनी गायकासमवेत गाणी म्हटली.

इ. काही साधकांमध्ये प्रकट झालेल्या वाईट शक्ती गाण्यांच्या चालीवर हाताने आसंदीवर आपटून ताल धरत होत्या. एक साधक यांनी हिंदी चित्रपटातील एक गाणे गायल्यावर दोन साधिकांमधील वाईट शक्तींनी प्रकट होऊन नृत्य केले.

ई. गाणी आवडल्यावर आणि प्रयोग संपल्यावर टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला अन् ‘प्रयोग पुष्कळच छान झाल्याचे आणि पुन्हा प्रयोग हवा’, असा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद वाईट शक्तींचा त्रास असणार्‍या श्रोत्या साधकांनी दिला.

३. वाईट शक्तींचा त्रास नसणार्‍या साधकांवर झालेला परिणाम

दोन्ही वेळा प्रयोगाला उपस्थित असणार्‍या वाईट शक्तींचा त्रास नसणार्‍या आणि आध्यात्मिक पातळी ६१ टक्क्यांहून अधिक असणार्‍या साधकांच्या भोवती सात्त्विकतेचे संरक्षककवच कार्यरत होते. त्यामुळे सुगम संगीताच्या गाण्यांतून प्रक्षेपित झालेल्या स्पंदनांचा केवळ १० टक्केच परिणाम त्यांच्यावर झाला. त्याचप्रमाणे हा परिणाम अल्पावधीसाठी टिकून होता. प्रयोगाला उपस्थित असणारे सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळकाका यांच्याभोवती चैतन्यमय संरक्षककवच कार्यरत असल्यामुळे त्यांच्यावर प्रयोगाचा काहीच दुष्परिणाम न झाल्याचे जाणवले. त्यांच्या अस्तित्वामुळे प्रयोगाच्या ठिकाणी आधीपासूनच सात्त्विक लहरी कार्यरत असल्यामुळे प्रयोगातून प्रक्षेपित झालेल्या रजोगुणी आणि तमप्रधान लहरींचा दुष्परिणाम अल्प प्रमाणात झाल्याचे जाणवले. यावरून सुगम संगीताच्या अंतर्गत भावनिक किंवा मायावी संगीताचा परिणाम वाईट शक्तींचा त्रास नसणार्‍या साधकांवर मध्यम प्रमाणात, आध्यात्मिक पातळी ६१ टक्क्यांपेक्षा अधिक असणार्‍या साधकांवर मंद प्रमाणात होतो आणि संतांच्या मनावर काहीच परिणाम होत नाही, हे सूत्र शिकायला मिळाले. यावरून ‘वाईट शक्तींचा त्रास नसणारे आणि आध्यात्मिक पातळी चांगली असणारे साधक रज-तम प्रधान वातावरणातही चांगली साधना करू शकतात’, हे वरील प्रयोगांच्या निष्कर्षांतून शिकायला मिळाले.

४. गायक श्री. प्रदीप चिटणीस आणि एक साधक यांची जाणवलेली सामाईक गुणवैशिष्ट्ये

अ. सुगम संगीताच्या प्रयोगाच्या वेळी दोन्ही गायकांनी मनापासून गीते गायली.

आ. प्रयोगाला उपस्थित असणार्‍या वाईट शक्तींचा त्रास असणार्‍या साधकांमध्ये प्रकट झालेल्या वाईट शक्तींच्या कृती किंवा त्यांचे बोलणे यांच्याकडे लक्ष न देता दोन्ही गायकांनी एकाग्रपणे गाणी गायली.

कृतज्ञता : परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे सुगम संगीताच्या दोन्ही प्रयोगांच्या वेळी संगीतातील अनेक बारकावे आणि त्यांचा सूक्ष्म स्तरावर झालेला परिणाम अभ्यासता आला’, यासाठी मी श्रीगुरुचरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’

– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के)(सूक्ष्मातून मिळलेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.४.२०२२)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.