मुंबई, १४ सप्टेंबर (वार्ता.) – ‘वेदांता आणि फॉक्सकॉन’ आस्थापनाचा प्रकल्प महाराष्ट्रात येण्यासाठी भाजपने अनेक वर्षे प्रयत्न केले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्यात प्रकल्प राबवण्याविषयी चर्चा चालू होती; मात्र सत्तापरिवर्तन झाल्यानंतर महाविकास आघाडीने हा प्रकल्प राज्यात राबवण्याविषयी नव्हे, तर अडीच वर्षे आस्थापनाच्या ‘वाटाघाटी’साठी प्रयत्न चालू केले. तथापि त्यांना यातून ‘वाटा’ नव्हे, तर ‘घाटा’ मिळाला. ‘वाटाघाटी’ केल्यामुळेच हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला आहे, असा घणाघात भाजपचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी १४ सप्टेंबर या दिवशी येथील भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालय येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला.
वेदांता फॉक्सकॉन महाराष्ट्राबाहेर जायला मविआ जबाबदार – भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारीhttps://t.co/4KTQVBxsNl
— Current Maharashtra (@Current_MH) September 14, 2022
माधव भांडारी म्हणाले की,
१. शिंदे गट आणि भाजप सरकार सत्तेवर येऊन केवळ अडीच मास झाले आहेत, तर महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी अडीच वर्षांच्या कालावधीत ‘वेदांता आणि फॉक्सकॉन’ प्रकल्पाविषयी काम पूर्ण केले नाही.
२. हा प्रकल्प बाहेर जाण्याला महाविकास आघाडीचे सरकार उत्तरदायी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचा असा अनुभव नवीन नाही.
३. यापूर्वी राज्यात आणि केंद्रात काँग्रेसचे सरकार असतांनाही टाटा आस्थापनाचा ‘नॅनो’ वाहन बनवण्याचा प्रकल्प गुजरात येथे गेला होता.
४. हे तिन्ही पक्ष उद्योगधंद्यांच्या विरोधात धोरण घेत असल्यामुळे त्याचा प्रकल्पांवर परिणाम होऊन हे प्रकल्प इतर राज्यांत स्थलांतरीत होत आहेत. ‘फॉक्सकॉन’ प्रकल्पही अशाच पद्धतीने महाराष्ट्राबाहेर जाऊ दिला.
५. गेल्या अडीच वर्षांत किती उद्योगधंदे राज्याबाहेर गेले, त्याची माहिती महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी जनतेला द्यावी.
६. ‘हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार नाही’, असे तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीच वर्ष २०२० मध्ये सांगितले होते. त्यामुळे इतरांना दोष देण्यापेक्षा विरोधकांची सरकार म्हणून काय भूमिका होती, ते त्यांनी स्पष्ट केले पाहिजे.
७. या प्रकल्पाच्या संचालकांशी, तसेच केंद्र सरकारशी चर्चा करून हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्याविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माहिती देऊ शकतील.