राज्यातील मंदिरांतील १० क्विंटल सोने आणि १६० क्विंटल चांदी यांची नाणी बनवून विकणार !

हिमाचल प्रदेशातील भाजप सरकारचा निर्णय !

सिमला (हिमाचल प्रदेश) – हिमाचल प्रदेशातील ३३ प्रमुख मंदिरांमध्ये १० क्विंटल सोने आणि १६० क्विंटलपेक्षा अधिक चांदी आहे. त्यांतील ५० टक्क्यांची नाणी बनवून विकण्याचा निर्णय राज्याच्या भाजप सरकारने घेतला आहे. यासाठी केंद्र सरकारच्या खनिज संपत्ती व्यापार महामंडळाशी परस्पर सहमती करार करावा लागणार आहे. पुढील ५-६ मासांत ही नाणी उपलब्ध होतील, असे राज्य सरकारने सांगितले आहे.

१. उना येथील चिंतपूर्णी मंदिरात सर्वाधिक १.९८ क्विंटल सोने आहे, तर सर्वाधिक ७२.९२ क्विंटल चांदी नैना देवी मंदिरात आहे.

२. मंदिरांत असलेल्या ५० टक्के सोने आणि चांदी यांची नाणी बनवली जाणार आहेत. २० टक्के सोने-चांदी धार्मिक स्थळांच्या ट्रस्ट, तसेच मंदिराच्या विकास कामांसाठी खर्च केला जाणार आहे. उर्वरित सोने-चांदी राखीव ठेवली जाणार आहे, असे भाषा आणि संस्कृती विभागाचे सचिव राकेश कंवर यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर असेच घडणार !