‘हिंदु जनजागृती समिती’च्या ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षणवर्गाचे लाभ …
‘हिंदु जनजागृती समिती’च्या वतीने हिंदूंना धर्मशिक्षण मिळावे, यासाठी कोरोना महामारीच्या काळात समाजासाठी ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षणवर्गाचे आयोजन करण्यात आले होते. पूर्वी इतर संप्रदायानुसार साधना करणार्या अनेक धर्मप्रेमींना यातून खरी साधना समजल्याने त्यांच्या जीवनात आमूलाग्र पालट झाले आणि त्यांना अनेक अनुभूतीही आल्या. खोपोली (जिल्हा रायगड) येथील धर्मप्रेमी श्री. जनार्दन जाधव यांना आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. कोरोना महामारीच्या काळात उपाहारगृह बंद पडल्यामुळे पुष्कळ ताण येणे आणि कठीण परिस्थितीत ‘हिंदु जनजागृती समिती’च्या ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षण वर्गाच्या माध्यमातून देव भेटल्याचे अनुभवणे
‘कोरोना महामारीच्या काळात बरेच उद्योगधंदे बंद झाले होते. या काळात माझा उपाहारगृहाचा व्यवसायही पूर्णपणे बंद झाला होता. मी उपाहारगृहासाठी ऋण (कर्ज) काढले होते. त्याचा हप्ता प्रतिमास लाखो रुपये होता, तसेच माझ्याकडे ४० कामगार कामाला होते. ‘त्यांचे वेतन आणि जेवण हे सर्व मी कसे हाताळू ?’, या विचाराने माझ्या मनावर ताण येत असे. व्यवसाय बंद झाल्याने माझे मन अस्थिर झाले होते. काही मास मी हे सर्व सहन केले; पण जसजशी दळणवळण बंदी वाढत गेली, तसतशी माझ्या मनाची स्थिती पुष्कळ अस्थिर होत गेली. ‘यातून मार्ग कसा काढायचा ?’, हे मला कळत नव्हते. अशा कठीण परिस्थितीत देवाने ‘हिंदु जनजागृती समिती’च्या ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षणवर्गाला जोडून घेतल्याने ‘या वर्गाच्या माध्यमातून देवच भेटला’, असे मला वाटले.
२. धर्मशिक्षणवर्गात योग्य साधना समजल्यावर पूर्वी करत असलेल्या साधनेचा अहं गळून पडणे
मागील १५ वर्षे मी एका संप्रदायानुसार साधना करत होतो. ‘मी करतो, तीच साधना पुष्कळ श्रेष्ठ आहे’, असा मला अहं होता; पण त्या साधनेमुळे मला कठीण प्रसंगात स्थिर रहाता आले नव्हते. ‘मी देवाचे एवढे करतो, तर मी कठीण प्रसंगात अस्थिर का आहे ?’, असा प्रश्न मी स्वतःला विचारत होतो. या विचारांवरील उपाय मला कुणीच सांगत नव्हते. धर्मशिक्षणवर्गात ‘अध्यात्मशास्त्रानुसार नेमकी कोणती साधना करावी ?’, हे मला समजले. त्यामुळे ‘मी करत असलेलीच साधना सर्वश्रेष्ठ आहे’, हा माझा अहं गळून पडला.
३. धर्मशिक्षणवर्गातून ‘गुरुकृपायोगा’नुसार साधना समजल्याने झालेले लाभ
३ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने धर्मशिक्षण वर्गातून ‘गुरुकृपायोगा’नुसार साधना आणि मनुष्यजन्माचे ध्येय समजणे : ‘गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) सांगितलेली ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ कशी करावी ? ‘ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तीयोग या तीन योगांच्या संगमाने आपण शीघ्र गतीने गुरुकृपा कशी संपादन करू शकतो ?’, हे मला धर्मशिक्षणवर्गातून शिकायला मिळाले. त्यामुळे माझ्यातील पूर्वीच्या साधनेचा अहं गुरुदेवांनी दाखवून दिला. त्यातून ‘मनुष्यजन्म केवळ ऐश्वर्य जमा करण्यासाठी नसून खर्या अर्थाने मनुष्यजन्माचे ध्येय काय आहे ?’, हे मला उमगले. मला योग्य साधना सांगितल्याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञ आहे.
३ आ. कुलदेवता आणि दत्त यांचा नामजप चालू केल्याने आध्यात्मिक बळ मिळून मनावरील ताण दूर होणे : पूर्वी मी कुलदेवतेचा नामजप कधीच केला नव्हता. धर्मशिक्षणवर्गातून ‘कुलदेवता आपल्या कुळाची आई असून तिच्या नामजपाने आपल्याला आध्यात्मिक बळ मिळते. कुलदेवतेच्या नामजपाने संसारातील अडचणी दूर होतात’, हे मला समजले. तेव्हापासून गुरुदेवांच्या कृपेने मी सकाळ-संध्याकाळ कुलदेवतेचा, तसेच पितृदोष दूर करण्यासाठी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हे नामजप करू लागलो. या नामजपांमुळे माझ्या मनावरील ताण आणि अस्थिरता दूर होऊन मला आनंदाची अनुभूती येऊ लागली.
३ इ. धर्मशिक्षणवर्गात ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलना’ची प्रक्रिया शिकायला मिळणे आणि ‘अपेक्षा करणे’ या अहंच्या पैलूवर स्वयंसूचना घेतल्याने चिडचिड न्यून होणे : पूर्वी माझी छोट्या छोट्या प्रसंगांत चिडचिड होत असे. धर्मशिक्षणवर्गातून मला स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिकायला मिळाली. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेच्या अंतर्गत मी माझ्या मनाचा अभ्यास केल्यावर ‘अपेक्षा करणे’ या अहंच्या पैलूमुळे माझ्या मनाची चिडचिड होत असल्याचे मला जाणवले. ‘अपेक्षा करणे’ या अहंच्या पैलूवर स्वयंसूचना सत्रे घेतल्यावर माझ्या मनाची शुद्धी होऊन माझी चिडचिड न्यून झाली. केवळ गुरुकृपेनेच मला माझ्यातील स्वभावदोषांची जाणीव होत असून आता माझ्या जीवनात कोणत्याही भौतिक अपेक्षा राहिल्या नाहीत.
३ ई. गुरुकृपेने साधनेत सतर्कता आणि सातत्य वाढल्यामुळे नकारात्मक विचारांवर मात करता येणे : मी आता योग्य साधना करत असल्यामुळे माझे मन आनंदी असते. मनात नकारात्मक विचार येऊ लागले, तर गुरुकृपेने त्याची लगेच जाणीव होऊन मला त्यावर मात करता येते. एखाद्या दिवशी नामजप चांगला होतो आणि त्याच्या दुसर्याच दिवशी ‘नामजप करू नये’, असे विचार येऊ लागतात. तेव्हा श्री गुरुदेव मला ‘माझे अंतर्मन मला फसवत आहे’, याची जाणीव करून देतात. त्यामुळे साधनेत सतर्कता वाढून सातत्य टिकून रहाते.
३ उ. अनेक वर्षांपासून दोन-अडीच लाख रुपये व्यय करूनही बरा न होणारा त्वचारोग नामजपादी उपायाने बरा होणे : मला मागील २५ – ३० वर्षांपासून त्वचारोग होता. अनुमाने दोन-अडीच लाख रुपये व्यय करूनही त्वचारोग बरा होत नव्हता. प्रत्येक वेळी मला तेवढ्यापुरते बरे वाटायचे. हा त्रास आध्यात्मिक स्वरूपाचा असल्याचे मला धर्मशिक्षणवर्गात समजले. त्यावर मी नामजपादी उपाय केल्याने ‘त्वचारोग कधी बरा झाला ?’, हे मला समजलेच नाही. आता मी त्यासाठी कोणत्याही प्रकारचे औषध घेत नाही.
४. समष्टी साधनेचे महत्त्व समजल्यावर स्वतःला आणि इतरांना झालेले लाभ
४ अ. इतरांना साधना सांगतांना आनंद मिळणे : धर्मशिक्षणवर्गात मला समष्टी साधनेचे महत्त्व समजले. तेव्हापासून मी माझे नातेवाईक आणि संपर्कातील प्रत्येक व्यक्ती यांना साधना सांगण्याचा प्रयत्न करत आहे. इतरांना कुलदेवता आणि दत्त यांची उपासना सांगतांना मला आनंद मिळतो.
४ आ. कठीण परिस्थितीत असलेल्या मित्राला नामजप करण्यास सांगणे आणि त्याने नामजप केल्यावर त्याच्यावर आलेले संकट दूर होऊन त्याचे आयुष्य पालटणे : माझ्या एका मित्राची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्याची मनःस्थिती ठीक नसल्याचे मला कळले. मी आणि माझी पत्नी त्याच्या घरी गेलो. त्याच्याशी बोलतांना ‘त्याला लाखो रुपयांचे ऋण (कर्ज) झाले आहे’, हे मला समजले. त्या वेळी भगवंतानेच माझ्या माध्यमातून त्याला कुलदेवता आणि दत्त या नामजपांचे महत्त्व सांगितले. मी त्याला म्हटले, ‘‘हे नामजप तू सकाळ-संध्याकाळ कर. तुला एक मासात नक्कीच प्रचीती येईल.’’ सहा मासांनंतर मी त्याला भ्रमणध्वनी केल्यावर तो फार आनंदी असल्याचे मला कळले. त्याने मला कुलदेवता आणि दत्त यांच्या नामजपामुळे त्याला आलेली अनुभूती सांगितली. नामजप चालू केल्यावर त्याच्या जीवनामध्ये असणारे अडथळे दूर होऊन त्याची आर्थिक स्थिती सुधारली. तो मला म्हणाला, ‘‘ज्या दिवशी तुम्ही आम्हाला नामजप सांगितले, त्या दिवसापासून आमचे आयुष्यच पालटून गेले. त्यापूर्वी माझी ‘आत्महत्या करावी’, अशी स्थिती होती. कुलदेवतेच्या नामजपाने सर्व संकटे दूर झाली आहेत.’’ हे ऐकून मला आनंद झाला.
गुरुदेवांनी सांगितलेल्या समष्टी साधनेचे महत्त्व किती आहे ? याविषयी मला अनुभूती आली. गुरुदेवांनी ही समष्टी साधना माझ्याकडून करून घेतली. त्याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– श्री. जनार्दन सखाराम जाधव, धर्मप्रेमी, खोपोली, जिल्हा रायगड. (२८.३.२०२२)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |