हॅलोवीन आणि पितृपक्ष !

पाश्चात्यांचे अंधानुकरण करणारे भारतीय !

पाश्चात्त्य संस्कृती आणि परंपरा यांचे अनुकरण करण्याची चढाओढ सध्या भारतियांमध्ये पहायला मिळते. त्यामुळे आपण आपले सण हे भारतीय परंपरेला अनुसरून साजरे न करता पाश्चात्त्यांचे अनुकरण करून साजरे करत आहोत. याचे उदाहरण म्हणजे नुकतेच पार पडलेले दहीहंडी आणि गणेशोत्सव ! या सर्व सणांमागील हिंदु धर्मशास्त्र न अभ्यासता मनोरंजनाचे एक साधन म्हणून उत्सव साजरे केल्याने त्या उत्सवांचा आध्यात्मिक स्तरावर लाभ होत नाही, हे लक्षात घ्यायला हवे. सण, उत्सव हे मनोरंजनासाठी नसून आपल्यातील आंतरिक शक्ती जागृत करण्यासाठीची उपासना आहे, हे समजून घ्यायला हवे.

आता पितृपक्ष चालू झाला आहे. पितृपक्षात आपण आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्राद्धविधी करतो आणि भगवान दत्तगुरूंना ‘पूर्वजांना लवकर सद्गती प्राप्त व्हावी’, यासाठी प्रार्थना करतो. मृत्यूनंतरही आपल्या पूर्वजांच्या पुढील गतीचा विचार करायला शिकवणारा आपला हिंदु धर्म कुठे ?, तर आपल्या पूर्वजांनी आपल्याला ओळखू नये; म्हणून ‘हॅलोवीन’ला भयावह भुताटकीसारखी वेशभूषा करून फिरणारे पाश्चात्त्य कुठे ?

पितृपक्ष विशेष

भारतामध्ये ज्याप्रमाणे पितृपक्ष असतो, त्याचप्रमाणे पाश्चात्त्य देशांमध्ये हॅलोवीन साजरा करतात. या दिवशी मृतात्मे पृथ्वीवर येतात आणि मानवी देहामध्ये संचार करतात, अशी तेथे मान्यता आहे. मानव कोण ? हे आत्म्यांना ओळखता येऊ नये; म्हणून पाश्चात्त्य लोक भयावह वेशभूषा करतात. सध्या श्राद्धविधीची खिल्ली उडवणारे व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून फिरत आहेत आणि आपली तरुण पिढीही ते आनंदाने पाहून त्याची खिल्ली उडवतांना दिसते; पण हीच भारतीय तरुण पिढी हॅलोवीनच्या दिवशी चित्र-विचित्र मुखवटे अंगावर सजवून किंवा भुताटकीवाले कपडे घालून रस्त्याने सर्रास फिरतांना दिसते. स्वतःच्या धर्माच्या सणांची खिल्ली उडवणार्‍या या पिढीला देवतरी क्षमा करील का ? सूक्ष्म शक्तींना चकवा देण्याचा हा प्रकार हास्यास्पदच म्हणावा लागेल. एरव्ही हिंदूंच्या श्रद्धांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे बुद्धीप्रामाण्यवादी असले प्रकार भारतात होत असतांना गप्प का ?

समाजाला धर्मशिक्षण न दिल्यामुळे सण, उत्सव कसे साजरे करायचे ? किंवा पितृपक्षाचे महत्त्व समजून पूर्वजांना गती देण्यासाठीचे विधी का करायचे ? हे कळू शकत नाही. हिंदु राष्ट्रात सर्वांना धर्मशिक्षण प्रदान केले जाणार असल्याने असे प्रकार नसतील.

– श्री. जयेश बोरसे, पुणे