श्री गणेशाच्या जीवनातील प्रसंग आणि लीला यांच्यामागील कार्यकारणभाव !

#Ganeshotsav #Ganeshotsav2022 #GaneshChaturthi #GaneshChaturthi2022 Ganesh Chaturthi गणेशचतुर्थी #गणेशचतुर्थी गणेश चतुर्थी #Ganapati #गणपती #गणेशमूर्ती #Ganeshmurti #Ganesh #गणेश गणेश Ganesh


‘२.९.२०२१ या दिवशी मी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी श्री गणेशाच्या संदर्भात घेतलेला ‘ऑनलाईन’ भावसत्संग ऐकला. तेव्हा श्री गणेशाची वैशिष्ट्ये आणि त्याची कृपा यांचे महत्त्व माझ्या मनावर कोरले गेले. त्यानंतर मला श्री गणेशाच्या संदर्भातील विविध घटना आठवल्या आणि देवाच्या कृपेमुळे या घटनांमागील आध्यात्मिक कार्यकारणभावही उमजला. श्री गणेशाच्याच कृपेने त्याच्या जीवनातील घटना आणि त्यातून शिकायला मिळालेली सूत्रे मी लेखबद्ध करून ही शब्दसुमने श्री गणेशाच्या चरणी अर्पण करत आहे.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/610023.html

श्री गणेशमूर्ती

१ अ. पार्वतीने तिच्या अंगाच्या मळापासून श्री गणेशाची मूर्ती बनवून तिची प्राणप्रतिष्ठा करणे : एकदा पार्वतीच्या मनात पुत्रप्राप्तीची इच्छा जागृत झाली. त्यामुळे तिने तप केले आणि त्यानंतर स्वत:च्या देहाच्या मळापासून एका लहान मुलाची मूर्ती बनवली. त्यानंतर तिने या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आणि त्याचे ‘गणेश’ हे नाव ठेवले.

१ आ. प्रसंगातून शिकायला मिळालेले सूत्र : ‘अंगावरचा मळ’ हा पृथ्वीतत्त्वदर्शक आहे. पार्वतीने केलेल्या तपामुळे तिचे तेज वाढले. अशा प्रकारे पार्वतीने पृथ्वी आणि तेज यांनी युक्त असणार्‍या बालकाची मूर्ती बनवली. त्यानंतर तिने या मूर्तीमध्ये प्राणतत्त्वरूपी वायूचा संचार केला. अशा प्रकारे पृथ्वी आणि तेज यांनी बनलेल्या मूर्तीमध्ये जेव्हा वायूचा संचार होतो, तेव्हा ती मूर्ती निर्जीव न रहाता सजीव होते. यावरून आपल्याला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचे महत्त्व लक्षात येते.

२ अ. श्री गणेशाने शिवाला पार्वतीच्या कक्षात प्रवेश न देणे : एकदा पार्वती स्नानाला गेली. तेव्हा ‘तिच्या कक्षात कुणीही येऊ नये’, यासाठी तिने बालक श्री गणेशाला दंड (सोट्याप्रमाणे असणारे एक प्रकारचे शस्त्र) देऊन दाराजवळ पहारेकरी म्हणून नेमले. तेव्हा तिच्या कक्षात प्रवेश करण्यासाठी शिव आला. तेव्हा बालक गणेशाने त्याला आत जाऊ दिले नाही. शिवाने त्याला पुष्कळ समजावण्याचा प्रयत्न केला; परंतु बालक श्री गणेशाने त्याला आत जाऊ दिले नाही. त्यानंतर शिव तिथून निघून गेला.

कु. मधुरा भोसले

२ आ. प्रसंगातून शिकायला मिळालेले सूत्र : श्री गणेशाने आज्ञापालन कसे करायचे, हे या उदाहरणातून शिकवले.

३ अ. शिवाने श्री गणेशाकडे प्रथम शिवगण, नंतर देवगण आणि इंद्रादी देव यांना बालक श्री गणेशाची समजूत काढण्यासाठी पाठवणे : शिवाने बालक श्री गणेशाची समजूत काढण्यासाठी शिवगणांना पाठवले. शिवगणांच्या समजवण्यानेही बालक श्री गणेशाने शिवाला पार्वतीच्या कक्षात जाण्याची अनुमती दिली नाही. तेव्हा श्री गणेशाने प्रथम शिवगण आणि नंतर नंदी यांच्याशी युद्ध केले. या युद्धात श्री गणेशाने शिवगण आणि नंदी यांना पराभूत केले. त्यानंतर देवगण आणि इंद्रादी देव यांनी श्री गणेशाला समजावण्याचा प्रयत्न केला ; परंतु बालक श्री गणेश ऐकत नसल्याचे लक्षात येताच प्रथम देवगण आणि नंतर इंद्रादी (यक्षराज कुबेर, वरुणदेव, अग्निदेव, सूर्यदेव, पवनदेव इत्यादी) देवतांनी बालक श्री गणेशाशी युद्ध केले. बालक श्री गणेशाने सर्व देवांना पराभूत केले.

३ आ. प्रसंगातून शिकायला मिळालेले सूत्र : शिवगण, देवगण आणि इंद्रादी देव यांच्यातील दैवी शक्तीचा त्यांना अहंकार झाला होता. तो न्यून करण्यासाठी शिवाने त्यांना बालक श्री गणेशाकडे त्याला समजावण्यासाठी पाठवले. बालक श्री गणेशाने त्यांना पराभूत केल्यामुळे त्यांचा अहं न्यून झाला आणि ते शिवाला शरण आले.

४. शिवाने बालक श्री गणेशाचा शिरच्छेद करण्यामागील अध्यात्मशास्त्र

४ अ. शिवाने बालक श्री गणेशाशी युद्ध करतांना त्याच्यावर त्रिशूळ फेकून त्याचा शिरच्छेद करणे : बालक श्री गणेशाने ब्रह्मा आणि विष्णु यांना पराभूत केल्यानंतर अंतत: शिव बालक श्री गणेशाशी युद्ध करण्यासाठी येतो. तेव्हा शिव बालक श्री गणेशावर त्रिशूळ फेकून त्याचा शिरच्छेद करतो.

४ आ. प्रसंगातून शिकायला मिळालेले सूत्र : बालक श्री गणेश हा पार्वतीमातेपासून बनला होता. त्यामुळे त्याच्यामध्ये अमर्याद शक्ती होती. ही शक्ती अनियंत्रित असल्यामुळे ती अत्यंत विध्वंसक बनली. तिच्यापुढे ब्रह्मा आणि विष्णु यांचेही बळ अपुरे पडले. बालक श्री गणेशाच्या अनियंत्रित विध्वंसक शक्तीला नियंत्रित केले नसते, तर तिने संपूर्ण ब्रह्मांडाचा नाश केला असता. या शक्तीला नियंत्रित करण्यासाठी प्रथम त्या शक्तीतील दूषितपणा नष्ट करणे आवश्यक होते. ‘शक्तीला नियंत्रित ठेवण्यासाठी तिच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया आवश्यक असते’, ही शिकवण संपूर्ण जगाला देण्यासाठी शिवाने त्रिशूळ फेकून बालक श्री गणेशाचा शिरच्छेद केला.

५ अ. बालक श्री गणेशाच्या वधामुळे माता पार्वती क्रोधित होऊन अक्राळ रूप धारण करणे आणि शिवाने बालक गणेशाला पुनर्जीवित करण्याचे वचन देणे : पार्वती स्नान करून आल्यावर तिला बालक श्री गणेशाचा वध झाल्याचे समजले. तेव्हा तिने अक्राळ – विक्राळ असे विराट रूप धारण केले अन् ती क्रोधित होऊन ब्रह्मांडाचा नाश करू लागली. तिला शांत करण्यासाठी सर्व देवता तिला शरण गेल्या आणि तिची विनवणी करू लागल्या. त्या वेळी शिवाने पार्वतीला बालक श्री गणेशाला पुनर्जीवित करण्याचे वचन दिले. तेव्हा पार्वतीमाता शांत झाली.

५ आ. प्रसंगातून शिकायला मिळालेले सूत्र : ‘मातेचे तिचा पुत्र किंवा पुत्री यांच्यावर किती प्रेम असते’, हे या उदाहरणावरून लक्षात येते. असेच प्रेम गुरूंचे त्यांच्या शिष्यांवर आणि भगवंताचे त्याच्या भक्तांवर असते; म्हणूनच ‘गुरूंना गुरुमाऊली, देवीला जगन्माता आणि देवाला जगत्पिता’, असे संबोधले जाते.

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/610880.html

(वाचकांना सूचना : ‘या लेखातील काही प्रसंगांशी संबंधित नावे आणि घटना संकेतस्थळावरून अन् ‘गणेशपुराण’ आणि अन्य काही ग्रंथातून घेतलेल्या आहेत.- कु. मधुरा)             

– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.९.२०२१)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.