वांद्रे (मुंबई) आणि बंगाल येथून संशयित जिहादी कह्यात

अटक करण्यात आलेले सद्दाम हुसेन खान आणि समीर हुसेन शेख

मुंबई – बंगाल स्पेशल टास्क फोर्स एस्.टी.एफ्. पोलिसांनी मुंबई आतंकवादविरोधी पथकाच्या साहाय्याने केलेल्या कारवाईत ३ ऑक्टोबर या दिवशी सकाळी सद्दाम हुसेन खान (वय ३४ वर्षे) याला मुंबईतील निर्मलनगर, वांद्रे परिसरातून आणि समीर हुसेन शेख (वय ३० वर्षे) याला बंगालमधून अटक केली. हे बंदी घातलेल्या आतंकवादी संघटनेच्या संपर्कात होते. जिहादी कारवायांत यांचा सहभाग होता. दोघांनाही पुढील अन्वेषणासाठी न्यायालयात पाठवण्यात आले आहे. अत्यंत कट्टरवादी गुप्त कारवायांच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतून संशयित आतंकवाद्याची अटक होणे, हे गंभीर आहे. नुकतेच रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्याच्या हरिहरेश्वर समुद्रकिनार्‍यावर संशयास्पद बोट सापडली होती.  त्यात ३ ‘एके ४७’ रायफल, काडतूसे, असा शस्त्रसाठा सापडला होता, तसेच मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला पाकिस्तानातील एका क्रमांकावरून ‘२६/११’ सारखे भीषण आक्रमण करण्याची धमकी देणारे संदेश होते. त्यामुळे मुंबई पोलिसांसह अन्वेषण यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.