१२.८.२०१९ या दिवशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, संगीत विशारद) यांनी पंडित हिमांशु नंदा यांची त्यांच्या पुणे येथील निवासस्थानी भेट घेतली. त्या वेळी सुश्री (कु.) तेजल यांनी त्यांच्या संगीत साधनेविषयी त्यांच्याशी संवाद साधला. पंडित हिमांशु नंदा यांनी केलेली संगीत आणि आध्यात्मिक साधना अन् त्यांचे त्यांविषयी असलेले विचार या संदर्भातील सूत्रे त्यांच्याच शब्दांत या लेखात दिली आहेत.
१. पंडित हिमांशु नंदा यांचा परिचय
पंडित हिमांशु नंदा हे मैहर घराण्याचे सुप्रसिद्ध बासरीवादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य आहेत. ते मूळचे ओडिशाचे असून सध्या पुणे येथे निवास करत आहेत. त्यांनी ‘चिन्मय मिशन’चे पू. स्वामी तेजोमयानंदजी यांच्या प्रेरणेने स्थापित झालेल्या ‘चिन्मय नादबिंदू गुरुकुला’चे संगीत निर्देशक (म्युझिक डायरेक्टर) म्हणून कार्य केले आहे. सध्या ते देश-विदेशांतील अनेक विद्यार्थ्यांना बासरीचे प्रशिक्षण देत आहेत.
२. सुप्रसिद्ध बासरीवादक पंडित हिमांशु नंदा यांच्या संगीतसाधनेचा आरंभ !
२ अ. पंडित हिमांशु नंदा यांचे आजोबा निसर्गावर कविता लिहून ती रात्री नातवंडांना झोपवतांना ऐकवत असल्याने त्यातूनच पंडित हिमांशु यांना संगीताची प्रेरणा मिळणे : पंडित हिमांशु नंदा म्हणाले, ‘‘माझे आजोबा निसर्गावर कविता लिहायचे आणि रात्री आम्हाला झोपवतांना ती म्हणून दाखवायचे. त्यातूनच मला संगीताविषयी प्रेरणा मिळाली. बालपणी मी शाळेत गायनात भाग घेत होतो. ओडिशा राज्यातील माझे गाव छोटे असल्याने त्या काळी तिथे संगीत शिकण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नव्हती.
२ आ. वयात येत असतांना आवाज घोगरा झाल्याने ‘गायन जमेल का ?’, अशी भीती वाटणे, त्याच वेळी गावात शास्त्रीय संगीताची शाळा चालू होऊन तिथे बासरीचे शिक्षण चालू होणे : मुले वयात येत असतांना त्यांचा आवाज घोगरा होतो. वर्ष १९९१ मध्ये साधारणपणे मी इयत्ता १० वीत असतांना माझा आवाज घोगरा होत होता. त्याचा परिणाम माझ्या आवाजावर होऊन माझे गायन पालटले. आवाजातील अशा परिवर्तनामुळे ‘मला गायन जमेल का ?’, अशी भीती वाटली; म्हणून मी संगीत शाळेच्या शोधात होतो. तेव्हा माझ्या एका मित्राकडून मला ‘आमच्याच गावात शास्त्रीय संगीताची एक शाळा चालू झाली आहे’, असे कळले. त्याच दिवशी मी त्या शाळेत गेलो. माझ्या सौभाग्याने तेथे बासरी शिकवण्याचे वर्ग चालू होते. तेव्हापासून माझ्या बासरीवादनाच्या शिक्षणाला आरंभ झाला.
२ इ. कलाहांडी येथील लेखक, कला परिषद संगीत विद्यालयात दोन गुरूंकडून संगीताचे प्राथमिक धडे मिळणे : कलाहांडी येथील लेखक, कला परिषद संगीत विद्यालयातील पंडित नरेंद्र पंडा आणि पंडित पद्मचरण पात्र यांच्याकडून मला बासरीचे धडे मिळाले. पंडित नरेंद्र पंडा यांनी मला प्राथमिक बासरीवादन शिकवले, तर पंडित पद्मचरण पात्र यांनी ‘संगीताचा आत्मा काय आहे ?’, याचा मला परिचय करवून दिला. ते स्वतः बासरी बनवत असत.
३. पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्याशी झालेली अविस्मरणीय भेट !
३ अ. ‘स्वतःचा आत्मा केवळ संगीतालाच समर्पित आहे’, असे जाणवणे : मधल्या काळात मी विविध स्पर्धांची सिद्धता केली. शाळेमध्ये गणित आणि विज्ञान हे विषयही शिकलो; पण तेव्हाही ‘माझा आत्मा हा संगीताला समर्पित आहे’, असे मला जाणवायचे.
३ आ. वडिलांच्या शस्त्रकर्मासाठी देहली येथे जाणे, तेथील एका वर्तमानपत्रात पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या कार्यक्रमाचे विज्ञापन वाचून तिथे जाणे, ‘पास’ नसल्याने बाहेर थांबल्यावर देवाच्या कृपेने एका व्यक्तीने ‘पास’ आणून देणे : या काळात माझ्या वडिलांचे स्वास्थ्य ठीक नसल्याने त्यांचे शस्त्रकर्म करण्यासाठी मी त्यांना देहली येथे घेऊन गेलो. देहली येथे वास्तव्याला असतांना माझ्या सौभाग्याने तेथील एका वर्तमानपत्रात पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या थेट कार्यक्रमाचे (‘लाईव्ह कॉन्सर्ट’चे) विज्ञापन छापून आले होते. ते वाचून मी त्या ठिकाणी गेलो. सर्व जण आत जात होते; मात्र माझ्याकडे आत जाण्यासाठी अनुमती असणारे पत्रक (पास) नसल्याने मी बाहेर थांबलो. काही क्षणांत एका व्यक्तीने माझ्याजवळ येऊन मला विचारले, ‘‘पास हवा का ?’’ हे ऐकल्यावर मला अत्यानंद झाला. ती माझ्या जीवनातील एक ईश्वरप्रेरित घटना होती. त्या वेळी ‘तुमचे भाग्य (प्रारब्ध) तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे घेऊन जातेच’, हे माझ्या लक्षात आले.
या कार्यक्रमात पंडित हरिप्रसादजींनी काही राग वाजवले. त्या वेळी मला माझा आतला आवाज ऐकू आला. मी स्वतःला म्हणालो, ‘हिमांशु, हे तर तुलाही करायला जमेल.’ हा आतला आवाज प्रबळ होता.
३ इ. कार्यक्रम संपल्यावर पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना भेटून ‘तुमच्याकडून बासरीवादन शिकायचे आहे’, अशी इच्छा व्यक्त करणे : कार्यक्रम संपल्यावर ते जात असतांना मीही त्यांच्या समवेत उद्वाहकामध्ये (लिफ्टमध्ये) गेलो आणि हात जोडून त्यांना म्हणालो, ‘‘मला तुमच्याकडून बासरीवादन शिकायचे आहे.’’ माझ्याकडे बघून स्मितहास्य करत ते मला म्हणाले, ‘‘मीही अजून शिकतच आहे. मी तुम्हाला वेगळे काय शिकवणार ?’’ असे म्हणत ते त्यांच्या वाहनाकडे गेले. मी चिकाटीने त्यांच्या मागे गेलो. त्यांना पुन्हा विनवणी केल्यावर ते मला म्हणाले, ‘‘मुंबईला ये.’’ तेव्हा क्षणभर मला वाटले, ‘त्यांना कितीतरी जण अशा प्रकारे विचारत असतील.’ तरीही माझ्या मनात विश्वास होता, ‘त्यांनी सांगितले आहे, तर ते मला निश्चित शिकवतील !’
४. ‘चिन्मय मिशन’च्या माध्यमातून आध्यात्मिक साधनेसह केलेली संगीत साधना !
४ अ. ‘चिन्मय मिशन’चे अध्यक्ष पू. स्वामी तेजोमयानंद यांच्या कृपेमुळे मुंबईत ‘चिन्मय मिशन’च्या आश्रमात रहाण्याची सोय होणे : मधल्या काळात मी ‘चिन्मय मिशन’ या आध्यात्मिक संस्थेशी जोडला गेलो होतो. ‘चिन्मय मिशन’चे तत्कालीन अध्यक्ष पू. स्वामी तेजोमयानंदजी संगीतप्रेमी होते. मला कोईम्बतूर येथे साक्षात् त्यांच्यासमोर बासरी वाजवण्याची सुवर्णसंधीही मिळाली होती.
मी त्यांना पत्र लिहून त्या पत्रात ‘पंडित हरिप्रसादजींनी मला बासरी शिकण्यासाठी मुंबईला बोलावले आहे, तर मी तिथे कसा जाऊ ?’, अशी माझी व्यथा व्यक्त केली. त्यांनी मला मुंबई येथील ‘चिन्मय मिशन’च्या आश्रमात रहाण्यास सांगितले. केवढी ही त्यांची कृपा ! स्वामी तेजोमयानंदजी यांच्या कृपेने माझी मुंबई येथे रहाण्याची सोय झाली.
४ आ. उपनिषदातील महावाक्य ऐकतांना मनाला आतून आनंद जाणवणे आणि मित्राने ‘क्रियायोगा’विषयी सुचवल्यावर ‘क्रियायोगा’ची दीक्षा घेणे : मुंबई येथील सांदिपनी साधनालयात २ वर्षांचा वेदांत पाठ्यक्रम (कोर्स) असतो. मी तिथे गेलो, त्या वेळी स्वामी चिदानंद उपनिषदातील महावाक्य (४ वेदांमधील सार सांगणार्या ४ प्रातिनिधिक वाक्यांना ‘महावाक्य’, असे म्हणतात.) शिकवत होते. मला तिथे बसून शिकण्याची संधी मिळाली. ते या महावाक्यांविषयी सांगत असतांना ‘मला जे हवे आहे, ते आज ऐकायला मिळत आहे’, असे वाटून मला आतून पुष्कळ आनंद जाणवत होता. याच कालावधीत माझ्या मित्रांनी मला ‘क्रियायोगा’विषयी सुचवले. वर्ष १९९५ मध्ये मी राऊरकेला (ओडिशा) येथे जाऊन स्वामी आत्मानंद यांच्याकडून ‘क्रियायोगा’ची दीक्षा घेतली.
५. संगीत साधना, ‘क्रियायोगा’ची ध्यानसाधना आणि ‘चिन्मय मिशन’ची ज्ञानसाधना, या सर्व साधना केल्यामुळे आयुष्य पालटून गेल्याचे जाणवून हे तीन गुरु आणि स्वतःची आई यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे : बासरीवादनाची साधना, ‘क्रियायोगा’ची ध्यानसाधना शिकल्यावर ‘चिन्मय मिशन’मध्ये मला या सर्वांचे तत्त्वज्ञान शिकायला मिळाले. या तिन्ही साधना एकत्रित केल्यामुळे माझे आयुष्यच पालटून गेले. अनेक ठिकाणी मी बघतो, ‘कोणी योग करतो; पण त्याला त्यातील शास्त्र (तत्त्वज्ञान) ठाऊक नसते. काही लोक संगीत शिकतात; परंतु त्यांना आध्यात्मिक पाया नसतो. त्यामुळे त्या व्यक्तीला यशाचे मोठे शिखर गवसले, तरी त्याला ‘स्व’चा शोध लागत नाही.
मी माझ्या आईप्रतीही कृतज्ञ आहे. तिने मला या तिन्ही गुरूंच्या समवेत रहाण्याची अनुमती दिली. माझे बासरीवादनातील गुरु पंडित हरिप्रसाद चौरसिया, ‘क्रियायोगा’तील गुरु स्वामी आत्मानंद आणि ‘चिन्मय मिशन’मधील माझे गुरु पू. स्वामी तेजोमयानंदजी यांच्याप्रती मी कृतज्ञ आहे !’’
(क्रमश:)
– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, संगीत विशारद) संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.