गणपतीचे पूजन सर्वप्रथम का करतात ?

‘गणपति हे पृथ्वीतत्त्वाचे प्रतीक आहे. आदिमाया पार्वतीने आपल्या मळापासून, म्हणजेच पृथ्वीतत्त्वापासून त्याची निर्मिती केली आहे. आपल्याला हेही ठाऊक आहे की, या जगातील सर्वच जड गोष्टी पंचमहाभूतांपासून बनलेल्या आहेत. आकाश, वायु, अग्नी, जल आणि पृथ्वी ही ती महाभूते आहेत.

१. मानवी शरिरात मूलाधारचक्र हा पृथ्वीतत्त्वाचा केंद्रबिंदू असणे आणि पंचमहाभूते पृथ्वीतत्त्वाच्या आधारेच कार्य करत असणे

मानवी देह आणि जीवन यांचे निरीक्षण केल्यास तुम्हाला असे आढळून येईल की, ‘आकाश, वायु, अग्नी आणि जल’ ही तत्त्वे पृथ्वीतत्त्वाच्या आधारानेच कार्य करतात, उदा. मानवी शरीर. कुंडलिनी योगशास्त्रानुसार मज्जारज्जूंच्या खालच्या टोकाजवळ असलेले मूलाधारचक्र हे पृथ्वीतत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. सर्वसाधारण माणसात याच चक्रापाशी कुंडलिनी शक्ती सुप्तावस्थेत असते. कुंडलिनी शक्ती जागृतीच्या दृष्टीने ‘मूलाधारचक्र’ हे पुष्कळ महत्त्वाचे आहे.

२. श्री गणेश हा कुंडलिनी शक्तीचा रक्षणकर्ता असून मूलाधारचक्राच्या जागृतीविना कुंडलिनी शक्ती वरच्या चक्रावर जाऊ न शकणे

महाबंध, महामुद्रा, मधबंद, मूलबंध यांसारख्या मुद्रा मूलाधारचक्राच्या जागृतीचे कार्य करतात. या चक्रापाशी पृथ्वीत्त्वाचे आधिक्य असल्याने तेथे श्री गणेशाचे अधिष्ठान मानले गेले आहे. जोपर्यंत हे चक्र जागृत होत नाही, तोपर्यंत कुंडलिनी शक्ती वरच्या चक्रावर जाऊ शकत नाही. श्री गणेश या कुंडलिनी शक्तीचा रक्षणकर्ता आहे. श्री गणेशाला, म्हणजे पर्यायाने मूलाधारचक्राला प्रसन्न केल्याविना कुंडलिनी शक्ती जागृत कशी करता येईल ? श्री गणेशपूजन सर्वप्रथम करण्यामागे हे खरे कारण आहे.’

– डॉ. नितीन स. प्रभुतेंडोलकर (संदर्भ : ‘श्रीमत् पूर्णानंद’, माघी गणेशोत्सव २०१४)