प्रेमभाव, प्रामाणिकपणा, गुरुकार्याची तळमळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती दृढ श्रद्धा असणारे श्री. यशवंत वसाने (वय ७४ वर्षे) !

१.९.२०२२ या दिवशी सनातनच्या देवद, पनवेल येथील आश्रमातील श्री. यशवंत वसाने (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांचा ७४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त पू. शिवाजी वटकर यांनी त्यांच्याविषयी जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

श्री. यशवंत वसाने

श्री. यशवंत वसाने यांना ७४ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने नमस्कार !

‘वर्ष १९९६ मध्ये आमच्या घरी (पू. शिवाजी वटकर यांच्या घरी) सनातनचा सत्संग चालू झाला. तेव्हा श्री. यशवंत वसाने त्या सत्संगाला येऊ लागले. श्री. वसाने आणि त्यांचे कुटुंबीय यांनी मला साधनेत मोलाचे साहाय्य केले आहे. २१.३.२०२२ या दिवशी ते देवद आश्रमात आले. तेव्हा मला आणि देवद आश्रमातील बर्‍याच साधकांना ‘त्यांची साधना चांगली चालू असून त्यांचा आध्यात्मिक स्तर वाढला आहे’, असे वाटले. १.८.२०२२ या दिवशी सद्गुरु स्वाती खाडये यांनी त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली असल्याचे घोषित केले.

१. प्रेमभाव

पू. शिवाजी वटकर

‘श्री. वसानेकाका यांना साधकांची सुख-दुःखे ऐकून घेऊन त्यांना साधनेत साहाय्य करायला आवडते. त्यांच्यातील प्रेमभावामुळे मला त्यांचा पुष्कळ आधार वाटतो. सणाच्या दिवशी किंवा आमच्या घरी काही अडचण असेल, तेव्हा ते मला त्यांच्या घरी जेवण आणि निवास यांसाठी बोलावत असत. ते मला आवडणारे पदार्थ करून खाऊ घालत असत.

२. प्रामाणिकपणा

आरंभी ते मला खोटी कारणे सांगून सत्संगाला येणे टाळायचे. काही मासानंतर ते मला म्हणाले, ‘‘काका, मी तुम्हाला खोटी कारणे सांगून सत्संगाला येत नव्हतो. ‘मला सत्संगाला जायला नको’, असे वाटायचे. तुम्ही माझा पाठपुरावा केल्यामुळे यापुढे मी सत्संग आणि सेवा यांसाठी येणार.’’ असे त्यांनी मला प्रांजळपणे सांगितले. त्यानंतर मानखुर्द, मुंबई येथे आणि बाहेरगावी प्रसारासाठी ते माझ्या समवेत असायचे. तेव्हापासून श्री. वसानेकाका व्यष्टी साधना आणि समष्टी सेवा प्रामाणिकपणे करत आहेत. ते त्यांच्या कुटुंबियांशीही प्रामाणिकपणे आणि मनमोकळेपणाने वागतात. ‘प्रामाणिकपणा’ आणि ‘मनाची निर्मळता’ हे चांगले सद्गुण काकांमध्ये आहेत.

३. साधेपणा

त्यांचे कपडे, रहाणीमान आणि आचार-विचार एकदम साधे आहेत. त्यांना त्यांची नोकरी, कुटुंबीय किंवा सुबत्ता यांचा गर्व नाही. त्यांना ‘बी.ए.आर्.सी.’ आस्थापनाची मोठी सदनिका रहाण्यासाठी मिळाली होती; मात्र त्या सदनिकेत त्यांनी सुखासन (सोफा), पटल, आसंद्या असे काहीच सुशोभिकरण केले नव्हते. स्थानिक प्रवासासाठी ते सायकलवर जायचे.

४. तत्त्वनिष्ठता

ते ‘भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर’, मुंबई येथे टेक्निशियन (बी.ए.आर्.सी.मधील ध्रूव अणूभट्टीमध्ये) म्हणून नोकरी करत होते. त्यांनी तेथे तत्त्वनिष्ठपणे आणि तेथील कार्यपद्धतींचे काटेकोर पालन करून नोकरी केली. ते सनातनशी जोडले गेल्यापासून गुरुतत्त्वाशी एकनिष्ठ आणि तत्त्वनिष्ठ राहून कार्यपद्धतीचे पालन आणि उत्तरदायी साधकांचे आज्ञापालन करत आहेत. सेवा करतांना ते कसलीही सवलत घेत नाहीत कि पाट्याटाकूपणे सेवा कशीतरी उरकून टाकत नाहीत.

५. परिस्थिती स्वीकारणे 

अ. श्री. वसानेकाकांच्या पत्नी (कै. (सौ.) हेमलता वसाने) नेहमी रुग्णाईत असायच्या. त्यांना काही मास रुग्णालयात ठेवावे लागायचे. काकांनी कठीण परिस्थिती स्वीकारून पत्नीची सेवा केली. त्यांनी त्यांचे आई-वडील आणि इतर कुटुंबीय यांचीही मनोभावे सेवा केली.

आ. एकदा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे ‘जाहीर प्रवचन’ नूतन विद्यामंदिर, मानखुर्द येथील शाळेच्या पटांगणात होते. प्रवचन संपल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या महाप्रसादाचे नियोजन वसानेकाकांच्या घरी केले होते. या कालावधीमध्ये ३ – ४ दिवसांसाठी मी सेवेनिमित्त बाहेरगावी होतो. कार्यक्रम झाल्यावर काकांच्या घरासमोरील इमारतीत रहाणारे एक साधक काकांना म्हणाले, ‘‘तुम्ही कार्यक्रमस्थळी आवरण्याची सेवा करा. मी गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) घेऊन जातो.’’ त्या साधकाने गुरुदेवांना काकांच्या घरी घेऊन जाण्याऐवजी स्वतःच्या घरी नेले. त्या वेळी कार्यक्रमस्थळी सेवा करणार्‍या काही साधकांनी काकांना गुरुदेवांच्या सेवेसाठी घरी पाठवले. घरी आल्यावर काकांना कळले की, गुरुदेवांना दुसर्‍या साधकांनी त्यांच्या घरी नेले आहे. काका तेथे गेले. त्या साधकाने गुरुदेवांची मनानेच पाद्यपूजा करून त्यांना जेवण दिले. हा प्रसंग काकांनी शांतपणे स्वीकारला. ‘आपल्या गुरूंची दुसरे साधक मानसन्मान करून सेवा करत आहेत’, हे लक्षात घेऊन त्यात समाधान मानले.

६. गुरुकार्याची तळमळ 

अ. काकांनी अणूशक्तीनगर, मानखुर्द येथे रहात असतांना पुष्कळ चांगला अध्यात्मप्रसार केला. त्यांनी अनेक जिज्ञासू, साधक आणि धर्माभिमानी यांना धर्मकार्यासाठी जोडून ठेवले होते.

आ. मुंबई येथे दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू झाल्यावर त्यांनी सायकलवर दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण केले. नंतर त्यांना दुचाकी देण्यात आली. त्यांनी सलग १० वर्षे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची अविरत भावपूर्ण सेवा केली.

इ. श्री. वसानेकाका आणि मी नर्मदेश्वर महादेव मंदिर, मानखुर्द येथे प्रत्येक महाशिवरात्रीला सनातनच्या ग्रंथाचे प्रदर्शन लावत असू आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळत असे. काका सकाळी ६ वाजल्यापासून रात्री १ वाजेपर्यंत प्रदर्शनस्थळी थांबायचे.

ई. काकांनी मानखुर्द केंद्रातील मंदिराचे पदाधिकारी आणि स्थानिक लोकनेते यांच्याशी चांगले संबंध ठेवून धर्मकार्यासाठी जोडून ठेवले होते. त्यामुळे प्रसारात कसलीही अडचण येत नसे.

७. गुरूंप्रती भाव 

अ. काकांचे मूळ गाव सासवड आहे. तेथे संत सोपानकाका यांची समाधी आहे. काकांचे वडील (कै. दौलतराव धनाजी वसाने) समाधी मंदिरात कीर्तन करायचे आणि वारकरी संप्रदायानुसार साधना करत असत. काकांवर वारकरी संप्रदायाचे संस्कार घट्ट बिंबले होते, तरीही गुरुदेवांनी त्यांना सांप्रदायिक साधनेतून बाहेर काढून त्यांच्याकडून गुरुकृपायोगानुसार साधना करवून घेतली. काकांची सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती श्रद्धा आणि भाव असल्यामुळे हे शक्य झाले.

आ. जानेवारी १९९८ मध्ये त्यांच्या मुलीचे कु. शिल्पा यशवंत वसाने (आताच्या सौ. शिल्पा श्रीराम बोरसे) लग्न ठरले होते. ‘गुरुदेवांनी लग्नाला यावे’, अशी वसाने कुटुंबियांची तीव्र इच्छा होती. मी काकांना सांगितले, ‘‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले प्रसार दौर्‍यासाठी बाहेरगावी जाणार असतील, तो दिनांक आणि ती वेळ लग्नाचा मुहुर्त ठेवा.’’ त्यानंतर काकांनी गुरुदेव मानखुर्दमार्गे बाहेरगावी जाणार होते, तेव्हाची तिथी आणि लग्नाची मुहुर्त वेळ ठरवली. त्यांचा भाव पाहून गुरुदेव लग्नाच्या वेळी आले अन् त्यांनी भोजनही केले. काकांकडे जे अहेराचे पैसे होते ते आणि काही पैसे त्यांनी गुरुदेवांना अर्पण केले; परंतु तेव्हा गुरुदेव त्यांना म्हणाले, ‘‘हे पैसे सध्या तुमच्याकडेच ठेवा. वेळ आल्यावर मी अध्यात्मप्रसारासाठी घेईन.’’

८. जाणवलेला पालट

ते पूर्वी नोकरी करत असतांना त्यांना प्रतिक्रिया येत असत आणि कुटुंबियांकडून अपेक्षा करत असत. साधना चालू केल्यावर त्यांनी स्वतःमध्ये चांगले पालट केले आहेत. आता त्यांचे बोलणे आणि वागणे नम्रपणे अन् अपेक्षाविरहित असते. त्यामुळे ते सर्व साधकांना आवडतात.

गुणरत्नांची खाण असलेले आणि मला साधनेत सर्वतोपरी साहाय्य करणारे श्री. यशवंत वसानेकाका यांचा मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सत्संग मिळवून दिला. त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘श्री. वसानेकाकांची आध्यात्मिक प्रगती करून घ्यावी’, अशी मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी प्रार्थना करतो.

– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.८.२०२२)