प्रश्न : शाडूची मूर्ती बनवतांना त्यात बी ठेवावे आणि नंतर मूर्ती कुंडीत विसर्जित करावी हे शास्त्रसंमत आहे का ?
उत्तर : असे करणे धर्मशास्त्रसंमत नाही. खरेतर हा धर्म न मानणार्या पर्यावरणवाद्यांचा अपप्रचार आहे. तुम्हाला वृक्षारोपण करायचे असेल, तर वर्षातील ३६५ दिवस तुम्ही कधीही करू शकता. पर्यावरणप्रेमासाठी धर्माचरणात परिवर्तन करायची काहीही आवश्यकता नाही.
प्रश्न : दीड दिवसच गणपति बसवा, असा सल्ला दिला जात आहे. असे करावे का ?
उत्तर : सिद्धिविनायक व्रतानुसार भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मातीचा गणपति करतात. तो डाव्या हातावर ठेवून तेथेच त्याची ‘सिद्धविनायक’ या नावाने प्राणप्रतिष्ठा आणि पूजा करून लगेच विसर्जन करावे, असा शास्त्रविधी आहे; पण मनुष्य उत्सवप्रिय असल्याने तेवढ्याने त्याचे समाधान होईना; म्हणून दीड, पाच, सात किंवा दहा दिवस गणपति बसवून त्याचा उत्सव करू लागले. एखाद्याच्या कुलाचारात गणपति ५ दिवस असेल आणि त्याला तो दीड किंवा ७ दिवसांचा करायचा असेल, तर तो तसे करू शकतो. त्यासाठी अधिकारी व्यक्तीला विचारण्याची आवश्यकता नाही. पहिल्या, दुसर्या, तिसर्या, पाचव्या, सहाव्या, सातव्या, दहाव्या, अकराव्या दिवशी किंवा घरातील रूढीप्रमाणे श्री गणेशमूर्ती विसर्जन करावे.
प्रश्न : ‘ऑनलाईन’ पूजा योग्य कि अयोग्य आहे ?
उत्तर : कर्मकांडानुसार शास्त्रशुद्ध पूजा करणे योग्य आहे; परंतु आपत्काळात एकमेकांकडे जाणे शक्य नसल्यास ‘ऑनलाईन’ पूजा चांगला पर्याय आहे. कर्मकांडामध्ये मंत्रांच्या उच्चाराला आणि पूजकाच्या ईश्वराप्रतीच्या भावाला महत्त्व असते.
– श्री. दामोदर वझे (आध्यात्मिक पातळी ६० टक्के), संचालक, पुरोहित पाठशाळा, सनातन आश्रम, गोवा.