काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांचे काँग्रेसचे त्यागपत्र

राहुल गांधी पक्षाचे उपाध्यक्ष झाल्यामुळे काँग्रेस नष्ट झाल्याचा आरोप

राहुल गांधी व गुलाम नबी आझाद

नवी देहली – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचे आणि सदस्यत्वाचे त्यागपत्र दिले आहे. त्यांनी त्यांचे त्यागपत्र काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवले आहे. या वेळी त्यांनी ५ पानांचे एक पत्रही लिहिले आहे. यात त्यांनी पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. ‘राहुल गांधी पक्षाचे उपाध्यक्ष झाल्यानंतर काँग्रेस नष्ट झाली’, असा आरोप त्यांनी यात केला आहे.

१. गुलाम नबी आझाद यांनी या पत्रात लिहिले आहे की, राहुल गांधी यांच्या राजकारणातील प्रवेशानंतर पक्षाच्या सर्वच ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांना बाजूला करण्यात आले. पक्षात विनाअनुभवी विक्षिप्त लोकांचा एक नवा समुह सिद्ध झाला. त्यानंतर हेच लोक पक्ष चालवू लागले.

२. राहुल गांधी यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर आणि खासकरून जानेवारी २०१३ मध्ये त्यांच्यावर उपाध्यक्षपदाचे दायित्व सोपवल्यानंतर दुर्दैवाने याआधी पक्षात अस्तित्वात असलेली सल्लागार यंत्रणा पूर्णपणे नष्ट करण्यात आली.

३. दोषी आमदार आणि खासदार यांचे सदस्यत्व रहित करण्याविषयचा तत्कालीन काँग्रेस सरकारचा अध्यादेश राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांसमोर फाडला, हे त्यांच्या अपरिपक्वतेचे उदाहरण होते.

४. राहुल गांधी यांच्या या बालीश वर्तवणुकीमुळे यंत्रणांनी तत्कालीन पंतप्रधान आणि केंद्र सरकार यांचे सर्व अधिकार झुगारले. वर्ष २०१४ मध्ये झालेल्या काँग्रेसप्रणीत आघाडी सरकारच्या पराभवात या कृतीचा सर्वांत मोठा वाटा होता.

५. वर्ष २०१४ मध्ये तुमच्या (सोनिया गांधी) आणि विशेषकरून राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा अत्यंत अपमानास्पदरित्या दोन लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. वर्ष २०१४ ते २०२२ या काळात झालेल्या ४९ पैकी ३९ विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाचा पराभव झाला. पक्षाने केवळ ४ विधानसभा निवडणुका जिंकल्या असून ६ ठिकाणी काँग्रेसने अन्य पक्षांशी युती केली होती. दुर्दैवाने आज काँग्रेस केवळ २ राज्यांमध्ये सत्तेत असून इतर २ राज्यांमध्ये काँग्रेस पक्ष युतीमधील अत्यंत किरकोळ भागीदार आहे.

मी स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करणार ! – गुलाम नबी आझाद

नवी देहली – मी जम्मू-काश्मीरला जाणार आहे. मी राज्यात माझा स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करणार आहे. त्यानंतर संबंधित पक्ष राष्ट्रीय स्तरावर आणण्याविषयी चाचपणी करू, असे त्यागपत्र दिल्यानंतर गुलाम नबी आझाद यांनी म्हटले आहे.