‘तलाक-ए-हसन’ प्रथा अयोग्य नाही ! – सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

नवी देहली – मुसलमान पुरुषांनी पत्नीला मासातून एकदा असे सलग ३ मास  ‘तलाक’ म्हणत घटस्फोटासाठी अनुसरलेली ‘तलाक-ए-हसन’ ही प्रथा इतकी अयोग्य नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने या वेळी या प्रकरणी वरिष्ठ अधिवक्त्यांशी विचार विनीमय करणार असल्याचे म्हटले. २९ ऑगस्टला या प्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे.

१. न्यायालयाने म्हटले की, तिहेरी तलाक नसून प्रथमदर्शनी हे (तलाक-ए-हसन) इतके अयोग्य नाही. जर दोन लोक एकत्र राहू शकत नसतील, तर न्यायालय तोडगा निघत नसल्याच्या कारणावरून घटस्फोट संमत करते.

२. पत्रकार असणार्‍या बेनझीर हिना यांनी याचिकेत दिलेल्या माहितीनुसार, २५ डिसेंबर २०२० ला इस्लामी पद्धतीने त्यांचा विवाह झाला. त्यांना एक मुलगाही आहे. सासरची मंडळी आणि पती वारंवार हुंड्यासाठी तिचा छळ करत होते. यामुळे ती २१ डिसेंबर २०२१ ला तिच्या माहेरी निघून गेली. ५ एप्रिल २०२२ ला पोलिसांत तक्रार केली असता पोलिसांनी, ‘शरीयत कायद्यानुसार ‘तलाक-ए-हसन’ला अनुमती आहे’, असे सांगितले.