गुजरात दंगलीतील बिल्किस बानो प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या ११ जणांची सुटका

गुजरात सरकारने माफीद्वारे केली सुटका

गोध्रा (गुजरात) – येथे वर्ष २००२ च्या दंगलीच्या काळात बिल्किस बानो सामूहिक बलात्कार आणि त्या परिवारातील ७ जणांची हत्या, यांप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या ११ जणांची सुटका करण्यात आली. गुजरातमधील भाजप सरकारने त्यांच्या ‘क्षमा धोरणा’च्या अंतर्गत या ११ जणांच्या सुटकेला संमती दिली.

२१ जानेवारी २००८ या दिवशी मुंबईतील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. आतापर्यंत या दोषींनी १५ वर्षांची शिक्षा भोगली आहे. यातील एका आरोपीने सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या सर्वांच्या सुटकेसाठी याचिका प्रविष्ट केली होती. त्यावर न्यायालयाने गुजरात सरकारला त्यांची शिक्षा माफ करण्याविषयी विचार करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर सरकारने एक समिती स्थापन केली. या समितीने या दोषींना माफ करण्याचा अहवाल सादर केला होता. त्या आधारे सरकारने वरील निर्णय घेतला.