अल् जवाहिरीच्या हत्येचा आतंकवादावर परिणाम !

‘अल् कायदा’ आतंकवादी संघटनेचा प्रमुख ओसामा बिन लादेननंतर या संघटनेचा नेता अयमान अल् जवाहिरी याला अमेरिकेने ड्रोनच्या साहाय्याने ठार केले आहे. हे आक्रमण अफगाणिस्तानच्या काबुलमध्ये करण्यात आले. अमेरिकेच्या या कारवाईला मोठी संधी समजण्यात येत आहे आणि या घटनेचे दूरगामी परिणाम होणार असल्याचे म्हटले जात आहे. ओसामा बिन लादेन ठार झाल्यानंतर वर्ष २०११ मध्ये जवाहिरी अल् कायदाचा प्रमुख बनला. यापूर्वीही तो मारला गेल्याच्या बातम्या ३ वेळा येऊन गेल्या होत्या आणि तिन्ही वेळा त्या अफवा असल्याचे स्पष्ट झाले होते. या वेळी मात्र जवाहिरीच्या हत्येची बातमी खरी असल्याचे समोर आले आहे; कारण स्वत: अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनी त्याच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. अमेरिकेच्या या ऐतिहासिक कारवाईचे विश्लेषण (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्या शब्दांत पाहूया.

(निवृत्त) ब्रिगेडिअर हेमंत महाजन

१. केवळ जवाहिरीला ठार केल्याने आतंकवाद संपणार नाही, तर त्या विरोधात विशेष रणनीतीची आवश्यकता असणे

‘अल् जवाहिरी मारला जाणे, ही मोठी घटना आहे. तो जगातील ‘मोस्ट वाँटेड’ (अन्वेषण यंत्रणांना पाहिजे असलेला) आतंकवादी नेता होता. त्याला ड्रोनच्या आक्रमणात मारण्यात आले कि क्षेपणास्त्राचे लक्ष्य करण्यात आले ? हे सांगणे कठीण आहे. तो मारला गेला, हे निश्चितच चांगले आहे; परंतु त्यामुळे आतंकवादाचा समूळ नाश झाला आहे, असे म्हणता येत नाही. या कारवाईचा आतंकवादावर फारसा परिणाम होणार नाही; सध्या प्रतिदिन नवनवीन आतंकवादी संघटना निर्माण होत आहेत. केवळ अल् जवाहिरीच्या नावाने आणि त्याची चित्रफीत ऐकून प्रभावित होऊन काश्मीरमध्ये अल् कायदाची शाखा उघडली जाते. यावरून आतंकवाद संपवणे किती कठीण आहे, हे लक्षात येते. जोपर्यंत आतंकवादाला युवक, पैसा, प्रशिक्षण आणि सुरक्षित ठिकाणे मिळत रहातील, तोपर्यंत हा आतंकवाद नष्ट होणे अशक्य आहे. अल् कायदा ही एकमेव आतंकवादी संघटना नाही. लष्कर ए तोयबा, जैश ए महंमद, बब्बर खालसा यांसह ४४ हून अधिक आतंकवादी संघटना आहेत, ज्या एकमेकांना साहाय्य करतात. त्यामुळे त्यांचे ‘नेटवर्क’ (जाळे) तोडणे अतिशय कठीण आहे. त्यासाठी वेगळ्या प्रकारच्या रणनीतीवर काम करण्याची आवश्यकता आहे.

२. अल् जवाहिरीच्या मृत्यूचा भारतावरील परिणाम

अल् जवाहिरी

अल् जवाहिरी ठार झाल्याने भारतावर कोणताही परिणाम होणार नाही. त्याच्याशी भारताचे कोणतेही देणे-घेणे नाही. भारताला त्याची लढाई स्वत:च लढावी लागणार आहे. भारतात बसलेल्या आतंकवादी संघटनांचे सदस्य अतिशय धोकादायक आहेत. हे सरकार आणि सुरक्षायंत्रणा यांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. १ ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) या दिशेने मोठी कारवाई केली आहे. देशातील ६ राज्यांमध्ये एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. अशा प्रकारची कारवाई सातत्याने करावी लागणार आहे.

३. अमेरिकेने गेली अनेक वर्षे ११ सप्टेंबर २००१ च्या आक्रमणाच्या सूत्रधाराचा पाठलाग करणे

अमेरिका मोठी शक्ती आहे, यात कोणतीही शंका नाही; परंतु कुणीही समोरासमोरची लढाई लढण्यास इच्छुक नाही. रशिया-युक्रेनमध्ये युद्ध चालू आहे; परंतु अमेरिकेसह कोणताही देश ना युक्रेनच्या बाजूने मैदानात उतरला नाही, ना रशियाच्या बाजूने. ते युक्रेनला शस्त्रास्त्रे आदींचे साहाय्य करत आहेत; परंतु लढाई त्याला एकट्यालाच करावी लागत आहे. जोपर्यंत तळागाळापर्यंत लढाई होणार नाही, तोपर्यंत आतंकवादाला संपवणे कठीण आहे. एखाद्या आतंकवाद्याला ठार केल्याने किंवा ड्रोनचे आक्रमण केल्याने आतंकवादावर कोणताही परिणाम होणार नाही. यातून अमेरिका अद्यापही ११ सप्टेंबर २००१ च्या आक्रमणाच्या सूत्रधाराला विसरला नाही, ही चांगली गोष्ट आहे.

४. जिहादी आतंकवादाहून भारतातील देशविरोधी आंदोलने अधिक धोकादायक !

वर्ष २०१४ नंतर भारतातील आतंकवादावर पुष्कळ नियंत्रण आले आहे. काश्मीर सोडले, तर कुठेही मोठे आतंकवादी आक्रमण झाले नाही. हे खरे असले, तरी सध्या भारतात आतंकवादाचे स्वरूप पालटत चालले आहे. आता लोक आंदोलन करून आणि अन्य मार्गाने भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठी हानी पोचवत आहेत. हे आतंकवादी आक्रमणाहून अधिक धोकादायक आहे. एका आतंकवादी आक्रमणात जेवढी हानी होते, त्याहून आधिक हानी आंदोलन आणि अन्य प्रकारचा हिंसाचार पसरवण्ो यांमुळे होते. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (‘सीएए’च्या) विरोधात देहलीतील हिंसाचार, तसेच शाहीनबागमधील आंदोलन यांमुळे आपल्या अर्थव्यवस्थेची किती हानी झाली, हे विचार करण्यासारखे आहे. तरीही भारतात वर्ष २०१४ नंतर आतंकवाद पुष्कळ प्रमाणात न्यून झाला आहे, हे मान्य करावे लागेल.’

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.