स्थानांतरासाठी आंदोलन करणार्‍या काश्मिरी हिंदु कर्मचार्‍यांचे वेतन बंद !

जम्मूत ९० दिवसांपासून चालू असलेल्या आंदोलनाला सरकारकडून प्रतिसाद नाही !

जम्मू – ‘पी.एम्. पॅकेज’च्या अंतर्गत नोकरी मिळवणार्‍या काश्मिरी हिंदूंचे धरणे आंदोलन चालू होऊन आता ३ मास उलटले आहेत. एप्रिल आणि मे मासांत जिहाद्यांनी अनेक काश्मिरी हिंदूंना ठार केल्यानंतर ५ सहस्रांहून अधिक हिंदु कर्मचारी त्यांचे काश्मीर खोर्‍याबाहेर स्थानांतर करण्याच्या मागणीसाठी जम्मू येथे येऊन धरणे आंदोलन करत आहेत. काश्मीर खोर्‍यात ५ सहस्र निर्वासित काश्मिरी हिंदूंना ‘पी.एम्. पॅकेज’च्या अंतर्गत नोकरी देण्यात आली होती. यामध्ये बहुतांश कर्मचारी वित्त विभाग, शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास आणि योजना विभागांतील आहेत.

१. काही कर्मचार्‍यांचे काश्मीरमध्येच स्थानांतर करण्यात आले आहे. हे कर्मचारी त्या ठिकाणी रुजू झालेले नाहीत. यामुळे त्यांना आता वेतन मिळू शकत नाही.

२. १३ मे या दिवशी राहुल भट या सरकारी कर्मचार्‍याच्या हत्येनंतर बहुतांश हिंदु कर्मचारी काश्मीर खोरे सोडून जम्मूत आले आहेत.

३. हिंदु कर्मचारी ‘जम्मूत पुनर्वसन आयुक्तालया’च्या बाहेर धरणे आंदोलन करत आहेत. १० ऑगस्ट या दिवशी आंदोलन करणारे कर्मचारी योगेश पंडित म्हणाले, ‘‘हिंदूंच्या हत्येच्या सत्रातून दिसते की, येथे काश्मिरी हिंदू सुरक्षित नाहीत. खोर्‍यात ८० टक्के हिंदु कर्मचारी भाड्याच्या घरात रहातात. घरमालक भाड्यासाठी दूरभाष करत आहेत; मात्र आम्हाला दोन मासांपासून वेतन मिळत नाही, ही वस्तूस्थिती आहे.’’

काश्मिरी हिंदू लोकशाहीतील नवे ‘अस्पृश्य’ झाले आहेत ! – डॉ. अग्निशेखर

आंदोलक कर्मचार्‍यांचे नेते डॉ. अग्निशेखर यांनी सांगितले की, आमच्यासाठी ‘पी.एम्. पॅकेज’ हे शिक्षेचे ‘पॅकेज’ झाले आहे. आम्ही लोकशाहीतील नवे ‘अस्पृश्य’ झालो आहोत. आमचा जीव धोक्यात असला, तरीही ९० दिवसांपासून आम्ही धरणे आंदोलन करत आहोत. कुणीही आमचे ऐकत नाही.

संपादकीय भूमिका

सरकारने काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट करून हिंदूंसाठी भयमुक्त आणि सुरक्षित वातावरण निर्माण केल्यास हिंदूंना असे आंदोलन करावे लागणार नाही ! सरकारने त्यासाठी पावले उचलावीत !