राजधानी देहलीत पुन्हा ‘मास्क’ची सक्ती !

मास्क नसल्यास ५०० रुपयांचा दंड !

प्रतीकात्मक छायाचित्र

नवी देहली – राजधानीत कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत आहे. त्यावर आळा घालण्यासाठी केजरीवाल सरकारने पुन्हा मुखपट्टी वापरणे (मास्क वापरणे) सक्तीचे केले आहे. मास्क न वापरणार्‍यांकडून ५०० रुपये दंड आकारला जाणार आहे.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार देहलीत सध्या कोरोनाचे ८ सहस्र २०५ रुग्ण सक्रीय आहेत, तर आतापर्यंत २६ सहस्र ३५१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देहलीतील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमागे ‘ओमायक्रॉन’चा नवीन ‘बीए २.७५’ हा विषाणूचा प्रकार आहे. देहलीकरांना हा झपाट्याने संक्रमित करत आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाची सद्य:स्थिती !

सध्यातरी महाराष्ट्रात मास्क बंधनकारक नाही. राज्यात ११ सहस्र ८८९ रुग्ण उपचार घेत आहेत, तर आतापर्यंत एकूण १ लाख ४८ सहस्र १५७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.