मालवण तालुक्यातील ग्रामपंचायतींना चुकीच्या आकाराचे, फाटलेले, अशोक चक्र मध्यभागी नसलेले राष्ट्रध्वज वितरित !

सर्व ग्रामपंचायतींनी निकृष्ट दर्जाचे राष्ट्रध्वज परत केले !

मालवण – ‘हर घर तिरंगा’ उपक्रमासाठी मालवण तालुक्यातील ग्रामपंचायतींना पंचायत समितीच्या वतीने पुरवण्यात आलेल्या राष्ट्रध्वजांपैकी बहुतांश ध्वज हे निकृष्ट दर्जाचे असल्याने संतप्त झालेल्या सरपंचांनी १० ऑगस्टला पंचायत समितीत जाऊन हे सर्व ध्वज परत करत गटविकास अधिकारी आणि ध्वजांचे पुरवठादार यांना खडसावले.

काही ग्रामपंचायतींनी तिरंगा ध्वजासाठी आधीच पैसे भरून ते मागवले होते; मात्र पंचायत समितीने वितरित केलेले ध्वज निकृष्ट दर्जाचे निघाले. ध्वजसंहिता डावलून अनेक राष्ट्रध्वज चुकीच्या आकाराचे, फाटलेले, डाग पडलेले, अशोक चक्र मध्यभागी नसलेले, तसेच तिन्ही रंगांच्या पट्ट्या भिन्न आकाराच्या असलेले, असे आहेत. ग्रामपंचायतींनी जनतेला विनामूल्य तिरंगा ध्वज देण्याचे आश्वासन दिले असून असे निकृष्ट ध्वज असतील, तर ते कसे वितरित करणार ? लोकांनी चुकीचे ध्वज लावायचे का ? याविषयी आक्षेप घेऊन तिरंगा अवमान प्रकरणी ग्रामस्थ किंवा सरपंच यांच्यावर कारवाई झाल्यास त्याला उत्तरदायी कोण ? असे प्रश्न सरपंच संघटनेचे अध्यक्ष महेश मांजरेकर आणि इतर सरपंच यांनी उपस्थित करत नाराजी व्यक्त केली.

या वेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, विजय केनवडेकर, सरपंच संघटनेचे अध्यक्ष आणि हडीचे सरपंच महेश मांजरेकर, आचर्‍याचे माजी सरपंच मंगेश टेमकर, आचर्‍याच्या सरपंच प्रणया टेमकर, देवलीच्या सरपंच गायत्री चव्हाण, देऊळवाडाच्या सरपंच अदिती मेस्त्री, बिळवसच्या सरपंच मानसी पालव, हेदूळचे सरपंच नंदू गावडे, सर्जेकोटच्या सरपंच नीलिमा परुळेकर, तोंडवळीचे सरपंच आबा कांदळकर, चिंदरचे उपसरपंच दीपक सूर्वे आदी उपस्थित होते.

चांगले ध्वज पुरवण्याचे दायित्व हे पंचायत समितीचे असून ग्रामपंचायतींनी परत केलेल्या ध्वजांचे पंचायत समिती प्रशासनानेच वर्गीकरण करून निकृष्ट ध्वज बाजूला करून ते पुरवठादारास परत करावेत आणि त्या बदल्यात पुरवठादाराने नवीन चांगले ध्वज द्यावेत, असे या वेळी झालेल्या चर्चेत ठरवण्यात आले.

 संपादकीय भुमिका

  • निकृष्ट दर्जाचे राष्ट्रध्वज पुरवणार्‍यांवर कारवाई व्हायला हवी !
  • ध्वज वितरित करण्यापूर्वी ते योग्य आहेत का ? हे प्रशासनातील कुणी पडताळत नाही का ?