कोकण विभागात ३७ लाखांहून अधिक राष्ट्रध्वजांचे वितरण करणार ! – डॉ. महेंद्र कल्याणकर, कोकण विभागीय आयुक्त

नवी मुंबई, ७ ऑगस्ट (वार्ता.) – भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रशासनाच्या वतीने १३ ते १५ ऑगस्टच्या काळात ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत कोकण विभागातील घरे, सरकारी किंवा खासगी आस्थापने येथे ३७ लाखांहून अधिक राष्ट्रध्वजांचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती कोकण विभागीय आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले की,

१. ‘घरोघरी तिरंगा’ हा उत्सव जनतेमध्ये देशाभिमान जागृत करणारा आणि स्वातंत्र्यसंग्रामात हौतात्म्य पत्करलेल्या वीरांपासून प्रेरणा घेणारा आहे. हा उपक्रम साजरा करतांना लोकसहभाग महत्त्वाचा आहे. यामध्ये ध्वजाची प्रतिष्ठा राखण्यासाठी आणि ध्वजसंहितेचे पालन करण्याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.

२. या उपक्रमाच्या अंतर्गत राष्ट्रध्वजाची एकूण मागणी ३७ लाख ३९ सहस्र ११८ असून त्यांपैकी ३० लाख ५९ सहस्र ५०२ ध्वज उपलब्ध आहेत. केंद्रशासनाकडून ८ लाख ७९ सहस्र ४४४ ध्वजांची वाढीव मागणी करण्यात आली आहे.

३. यानिमित्त जनजागृतीपर होर्डिंग (लाकडी फलक) आणि फलक लावणे, शाळांमधून मुलांच्या स्पर्धा घेणे, प्रभात फेर्या् घेणे आदी उपक्रम घेण्यात येणार आहेत. तसेच तिरंगा स्वयंसेवकांच्या नेमणुका करून त्यांच्याद्वारे कार्यक्रमाचा प्रचार-प्रसिद्धी आणि कार्यवाही करण्यात आली आहे. सर्व जिल्ह्यांतील शासकीय इमारती आणि ऐतिहासिक वास्तू यांना तिरंगी विद्युत् रोषणाई करण्यात येणार आहे. गावस्तरावरील ‘घरोघरी तिरंगा’ फडकावल्याचे ड्रोनद्वारे छायाचित्रीकरण करण्यात येणार आहे.

४. ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमाची कार्यवाही ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत करण्यात येणार आहे. यामध्ये स्वच्छता मोहीम, महिला मेळावे, अर्थ साक्षरता, शेतकरी मेळावे घेण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्या आहेत.