शिक्षणाची वानवा !

एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जोरात साजरा होत आहे, तर दुसरीकडे काही समस्या संवेदनशीलतेने विचार करायला लावत आहेत. त्यातीलच एक म्हणजे ‘शिक्षण’ ! स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही भारतातील प्रत्येक विद्यार्थ्याला सहजतेने आणि दर्जेदार शिक्षण मिळत नाही, हे अत्यंत क्लेशदायक अन् लोकशाहीला अशोभनीय आहे.

त्यातीलच एक उदाहरण म्हणजे नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील देवपाडा येथे जिल्हा परिषदेची शाळा ! या शाळेमध्ये जाण्यासाठी काही मुलांना दमणगंगा नदीचे पात्र ओलांडून जावे लागते. लहान वयाच्या विद्यार्थ्यांना नदीपात्र ओलांडणे शक्य नसल्याने त्यांना दुसर्‍याच्या खांद्यांवर बसवून नदीपात्रातून पलीकडे न्यावे लागते. यामुळे शिक्षण घेण्यासाठी पालक आणि विद्यार्थी यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो, हे अतिशय संतापजनक आहे. दमगणगंगा नदीवर पूल बांधल्यास विद्यार्थ्यांना शाळेत जाणे सोपे होईल. याच प्रकारे फलटण (जिल्हा सातारा) जवळील सासकल या गावाला येण्या-जाण्यासाठी रस्ता नाही. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत आवश्यक तेवढ्या वर्ग खोल्या नाहीत. त्यामुळे एकाच खोलीत दोन इयत्तांचे वर्ग बसतात. त्याही पुढे जाऊन शाळेच्या तिन्ही खोल्या धोकादायक असल्याचा दाखला फलटण सार्वजनिक बांधकाम विभागाने दिला आहे. अनेक वेळा शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा दुरुस्तीची मागणी करूनही प्रशासनाने ती दुरुस्त करून दिलेली नाही.

एकीकडे आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो, तर दुसरीकडे दुर्गम भागात विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रस्ते आणि पूल यांसारख्या मूलभूत सुविधाही प्राप्त होत नाहीत, यापेक्षा दुर्दैव ते काय ? आजचे विद्यार्थी देशाचे भवितव्य आहेत. अशा विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात झगडावे लागत असेल, तर अशांकडून आपण परिवर्तनाची काय अपेक्षा करणार ? शहरी भागात विद्यार्थ्यांना ‘डिजिटल वर्ग’ आणि घरपोच जाण्यासाठी बसगाड्या, तर दुसरीकडे ग्रामीण भागात शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची होणारी वानवा ! स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा मिळण्यासाठी सरकार आणि प्रशासन यांनी संकल्प करणे आवश्यक आहे. यासाठी नागरिकांनीही लोकप्रतिनिधींना वैध मार्गाने जाब विचारायला हवा. सद्यःस्थितीचे सुराज्यात रूपांतर होण्यासाठी प्रत्येकाने आपले कर्तव्य चोख पार पाडायला हवे, हे नक्की !

– श्री. अजय केळकर, सांगली