इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे चालू असलेल्या ‘राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धे’च्या ९ व्या दिवशी भारताने चांगली कामगिरी करून पदकांचा आलेख उंचावला आहे. भारताने अद्यापपर्यंत या स्पर्धेत १३ सुवर्ण, ११ रौप्य आणि १६ कांस्य अशा एकूण ४० पदकांची कमाई करून पदतालिकेत ५ वे स्थान गाठले आहे. ऑस्ट्रेलिया १५५ आणि इंग्लंड १४८ पदके मिळवून पहिल्या २ स्थानी आहेत. भारताची या वेळेची कामगिरी मागील कामगिरींच्या तुलनेत चांगली आहे, तरी ती अजून उंचावण्यास पुष्कळ वाव आहे. राष्ट्रकुल परिषदेमधील सभासद राष्ट्रांमध्ये होणारी ही एक क्रीडा स्पर्धा आहे. ही स्पर्धा वर्ष १९३० पासून प्रत्येक ४ वर्षांनी भरवली जाते. ब्रिटीश साम्राज्याचा भाग असलेले अनेक देश प्रारंभी या स्पर्धेत सहभाग घ्यायचे. नंतर अन्य देशही यामध्ये सहभाग घेऊ लागले. राष्ट्रकुल स्पर्धेत ऑलिंपिक खेळांच्या समवेत इतर काही विशेष खेळ खेळले जातात. एकूण ५४ देश राष्ट्रकुल परिषदेचे सदस्य असले, तरीही या स्पर्धेत ७१ देश भाग घेतात.
पदकांचा दुष्काळ का ?
या स्पर्धांमध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया हे देश ५० ते १०० पदके मिळवत असतांना भारताची पदकसंख्या मात्र १० ते १५ च्या संख्येतच असायची. त्यातही ‘कुस्ती’ हे भारताचे प्रमुख क्षेत्र होते; पण गेल्या अनेक स्पर्धांत पाठवलेल्या स्पर्धकांची संख्या वाढूनसुद्धा पदकांच्या संख्येत मात्र घट व्हायची. यंदाच्या वर्षी भारताला ही पदके वजन उचलणे, कराटे, लॉन बॉल, टेबल टेनिस या खेळांमध्ये मिळाली आहेत. पूर्वीच्या कामगिरीच्या तुलनेत या वेळची कामगिरी चांगली असल्यामुळे भारतीय खेळाडूंकडून अजून अन्य प्रकारच्या खेळांमध्ये पदके मिळण्याची अपेक्षा आहे. गतवर्षी झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेतही भारताला ‘ॲथलेटिक्स’ या क्रीडा प्रकारात केवळ एका सुवर्णपदकावर समाधान मानावे लागले होते. तेही १०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ! आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळवल्या जाणार्या ऑलिंपिक आणि राष्ट्रकुल या स्पर्धांमध्ये भारताची कामगिरी निराशाजनक रहाते. भारताची लोकसंख्या १४० कोटींहून अधिक आहे. त्या तुलनेत भारतीय खेळाडूंकडून मिळवलेल्या पदकांची संख्या २ आकड्यांमध्येही नसते. आपल्या देशाच्या लोकसंख्येपेक्षा अधिक लोकसंख्या असणारा चीन, तसेच अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, जर्मनी, फ्रान्स, इटली, ऑस्ट्रेलिया, जपान इत्यादी देशांच्या पदकांची संख्या सर्वाधिक आहे. या देशांच्या सूचीत भारताचा क्रमांक ५१ वा लागतो. इराण, तुर्की, अझरबैजान यांसारखे देशही आपल्या पुढे आहेत. या देशांची लोकसंख्याही आपल्यापेक्षा पुष्कळ अल्प आहे. त्यामुळे नेमके कुठे चुकते आहे ? ते पहाणे महत्त्वाचे आहे.
क्रिकेटला अधिक महत्त्व नको !
प्राचीन खेळांच्या परंपरेचा वारसा सांगणार्या भारतावर पदकांची संख्या वाढण्यासाठी काही दशके वाट पहाण्याची वेळ येणे आश्चर्यकारक नव्हे का ? भारतात आज क्रिकेटची ‘क्रेझ’ (वेड) अनावश्यक निर्माण करण्यात आली आहे. क्रिकेटच्या खेळाडूंनी एखादा सामना जिंकल्यास त्यांच्यावर पारितोषिकांची लयलूट केली जाते. त्यांना अक्षरश: डोक्यावर घेतले जाते. त्यांचे कौतुक होणे, लोकांची वाहवा मिळणे ठीक आहे; मात्र येथे अती केले जाते. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी खेळाडू मिताली राज यांच्या जीवनावर एक चित्रपट येत आहे. ‘इंडियन प्रिमिअर लीग’ अर्थात् ‘आय.पी.एल्.’चे सामने, ‘टी-२०’ प्रकारांतील सामने, अन्य सामने, ‘टेस्ट मॅच’ असे क्रिकेटचे वेगवेगळ्या प्रकारांतील सामने सतत चालू असतात. चालू सामन्याचा ‘स्कोअर’ (धावफलक) जाणून घेण्यासाठी तरुण जिवाचा आटापिटा करतात, काही जण तर महाविद्यालये आणि शिकवणीवर्ग यांना न जाता सामने पहातात. आय.पी.एल्. सामन्यांमध्ये खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची बोली (खेळाडूंना विकत घेतले जाते) लावली जाते. या व्यतिरिक्त कोट्यवधींची पारितोषिके ठेवली जातात. सट्टेबाज क्रिकेटच्या सामन्यावर कोट्यवधी रुपयांचा सट्टा लावतात. पैशांचा या ना त्या कारणाने पाऊस पाडला जातो. सामन्यांचे अखंड समालोचन चालू असते, अनेक संकेतस्थळांवर धावफलक अद्ययावत करण्यात येतो, अनेक वाहिन्यांवर थेट प्रक्षेपण चालू असते. जनतेला क्रिकेटपायी अक्षरश: ‘वेडे’ केले जात आहे. मध्यंतरी क्रिकेटच्या एका अनुभवी खेळाडूने अन्य खेळाडूंना मोलाचा सल्ला देतांना सांगितले, ‘आय.पी.एल्.सारख्या सामन्यांमध्ये प्रचंड पैसा आणि प्रसिद्धी मिळत असली, तरी देशासाठी चांगला खेळ खेळायला विसरू नका.’ यातून या खेळाडूलाही ‘काहीतरी चुकत आहे’, हे लक्षात आले. क्रिकेट खेळणार्या देशांची संख्या २० च्या आत, तर आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळणारे देश १०० हून अधिक आहेत. भारतात महत्त्व दिले जात आहे, ते केवळ क्रिकेटला !
एखाद्या खेळातून खेळाडूची प्रतिभा दिसण्यासह त्याला प्रोत्साहन मिळाले पाहिजे, देशाचा सन्मान वाढला पाहिजे आणि देशवासियांची मान अभिमानाने उंचावली गेली पाहिजे. भारताला आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अशा संधी क्वचित् मिळतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून भारतीय क्रीडाक्षेत्रावरील मळभ दूर होण्याची आशा निर्माण झाली आहे. भारतीय खेळाडूंना प्रशिक्षक आणि प्रशिक्षण मिळण्यासह त्यांना संधी उपलब्ध होण्याचे प्रमाण वाढले आहे. अजूनही मीराबाई चानूसारखे खेळाडू आहेत की, ज्यांना ते रहात असलेली ठिकाणे राज्याच्या राजधानीपासून पुष्कळ दूर असल्याने ये-जा करण्यासाठी ट्रकचालकांचे साहाय्य घ्यावे लागते. त्यांनी एखादे पदक जिंकल्यावर स्थानिक प्रशासनाची दृष्टी त्यांच्यावर पडून त्यांना साहाय्य केले जाते. अशा होतकरू खेळाडूंचा शोध घेऊन त्यांना साहाय्य करण्याची आवश्यकता आहे. या खेळाडूंच्या अडचणी सोडवून आणि त्यांना सुविधा देऊन अधिकाधिक प्रोत्साहन दिल्यास भारताला पदकांचे वैभव पहाण्यास अधिक काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही, हे निश्चित !