उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मालेगाव जिल्हा करण्याविषयी निर्णय घेऊ ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

नाशिक – मालेगाव हा वेगळा जिल्हा स्थापन व्हावा, अशी मागणी स्थानिक आमदार दादा भुसे आणि अन्य आमदार यांनी केली आहे; मात्र देवळा येथील आमदारांचा या मागणीला विरोध आहे. अन्य काही आमदार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून याविषयी धोरणात्मक निर्णय लवकरच घेतला जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलतांना केले. ३० जुलै या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मालेगाव येथील क्रीडा संकुलात नाशिक विभागीय आढावा बैठक पार पडली. त्या वेळी ते बोलत होते.

नाशिक येथील विभागासाठी जलद योजना राबवणार !

‘नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांसाठी छोट्या कामांच्या रखडलेल्या प्रकल्पांना त्वरित मार्गी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आदिवासी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही युद्धपातळीवर प्रयत्न करत आहोत. रस्ते, वीज आणि पाणी या पायाभूत सुविधांवर आमचा भर असून या भागांतील सुविधा लवकर पूर्ण केल्या जातील, तसेच काही महत्त्वाच्या रखडलेल्या प्रकल्पांच्या कामांसाठी मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता घेऊन ती कामे पूर्ण केली जातील’, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

पोलिसांसाठी मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती करणार ! – एकनाथ शिंदे

मालेगाव (जिल्हा नाशिक) – पोलिसांसाठी मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३० जुलै या दिवशी येथे एका कार्यक्रमात केली. ते म्हणाले, ‘‘पोलिसांच्या घरांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. जुन्या वसाहती असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. पोलिसांसाठी घरांची निर्मिती करावी लागणार आहे. यासाठी आम्ही वरिष्ठ स्तरावर बैठकही घेतली आहे. रस्त्यावर कर्तव्य बजावणार्‍या पोलिसाला घराची चिंता असता कामा नये. घराची चिंता नसल्यास त्यांची कार्यक्षमता वाढते.’’ (आजपर्यंत अनेक मंत्र्यांनी पोलिसांची घरे बांधून देण्याविषयी दिलेली आश्वासने का पूर्ण झाली नाहीत ? याचा अभ्यास करावा, तसेच पोलिसांची घरे पूर्ण होईपर्यंत मुख्यमंत्र्यांनी पाठपुरावा करावा, अशी जनता आणि पोलीस यांची अपेक्षा आहे. – संपादक)