२१.७.२०२२ या दिवशी फोंडा, गोवा येथील आध्यात्मिक संशोधन केंद्रात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेला आरंभ झाला. त्या वेळी पुणे येथील श्री. रणजित आणि सौ. सोनाली काशीद यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
श्री. रणजित काशीद, पुणे
१. ध्यानमंदिरात श्री दुर्गादेवीची आरती चालू असतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे श्री दुर्गादेवीच्या रूपात दर्शन होणे
‘२०.७.२०२२ या दिवशी मी आध्यात्मिक संशोधन केंद्रातील ध्यानमंदिरात आरतीसाठी गेलो होतो. श्री दुर्गादेवीची आरती चालू असतांना मी डोळे मिटले. तेव्हा मला सूक्ष्मातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ श्री दुर्गादेवीच्या रूपात दिसल्या. त्यांच्याकडे पाहिल्यावर मला माझ्यात क्षात्रतेज निर्माण झाल्याचे जाणवले. काही वेळाने मला सूक्ष्मातून श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ श्री दुर्गादेवीच्या रूपात दिसल्या. त्यांना पाहून मला शांत वाटले. सलग दोन दिवस मला ही अनुभूती आली.
२. ध्यानमंदिरात बसल्यावर कुणीही भ्रमणभाषवर नामजप लावलेला नसतांना ‘निर्गुण’ हा नामजप स्पष्टपणे ऐकू येणे
२१.७.२०२२ या दिवशी मी ध्यानमंदिरात असतांना मला ‘निर्गुण’ असा नामजप अगदी स्पष्टपणे ऐकू येत होता. वास्तविक मी माझ्या भ्रमणभाषवर अगदी हळू आवाजात ‘शून्य’ हा नामजप लावला होता. माझ्याजवळ माझी पत्नी (सौ. सोनाली काशीद) बसली होती. मी तिला ‘‘तुझ्या भ्रमणभाषवर ‘निर्गुण’ हा नामजप लावला आहे का ?’’, असे विचारल्यावर तिने मला ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप लावल्याचे सांगितले.
वरील अनुभूतींसाठी मी ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
सौ. सोनाली काशीद, पुणे
१. शारीरिक वेदनेमुळे कार्यशाळेला उपस्थित रहाण्याविषयी साशंक होणे
‘२१.७.२०२२ या दिवशी सकाळी मला पुष्कळ शारीरिक वेदना होत होत्या. मला जेव्हा वेदना होतात, तेव्हा मी अधिक काळ बसू शकत नाही. त्यामुळे ‘मी कार्यशाळेला उपस्थित राहू शकेन कि नाही ?’, याविषयी मी साशंक होते.
२. साधकांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार कृती केल्याने पूर्ण दिवस कार्यशाळेला उपस्थित रहाता येणे
मी दायित्व असलेल्या साधकांशी बोलून त्यांना सर्व परिस्थिती सांगितली. त्यांनी मला संशोधन केंद्रातील प्रत्येक गोष्टीतील आनंद अनुभवण्यास सांगितला, तसेच सहसाधकांशी बोलण्यास आणि त्यांच्याकडून शिकण्यास सांगितले. ‘येथील चैतन्यामुळे माझे प्रारब्ध न्यून होण्यास साहाय्य होईल’, असेही त्यांनी सांगितले. मी प.पू. भक्तराज महाराज यांना प्रार्थना करून दायित्व असलेल्या साधकांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार कृती करण्याचा प्रयत्न केला आणि पूर्ण दिवस कार्यशाळेला उपस्थित राहिले. पूर्ण दिवस बसूनही मला वेदना जाणवल्या नाहीत. रात्री ९.३० वाजताही मी अगदी उत्साही होते आणि ‘मी आणखी काही काळ बसू शकेन’, असे मला वाटत होते.
३. ध्यानमंदिरात सद्गुरूंची आरती चालू असतांना सूक्ष्मातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले दिसणे, त्यांच्याकडून साधकांना पुष्कळ चैतन्य मिळत असल्याचे पाहून माझी भावजागृती होणे
ध्यानमंदिरात सद्गुरूंची आरती चालू असतांना मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे सूक्ष्मातून अस्तित्व जाणवले. त्या वेळी त्यांनी गळ्यात हार परिधान केला होता. त्यांच्या डोक्याकडून पांढर्या रंगाच्या अनेक लहरी प्रक्षेपित होत होत्या. सर्व साधक त्यांच्या चरणांजवळ उभे होते. त्यांच्याकडून साधकांना पुष्कळ चैतन्य मिळत होते. हे दृश्य पाहून माझी भावजागृती होत होती.
(सर्व सूत्रांचा दिनांक २१.७.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |