पू. (कै.) सौ. सूरजकांता मेनराय यांनी देहत्याग केल्यानंतर त्यांचा शिवात्मा वैकुंठात जाणे आणि त्यांच्यातील शिकण्याच्या वृत्तीमुळे त्यांना विविध लोकांमध्ये सूक्ष्मातून प्रवास करण्याची सिद्धी लाभणे !

आषाढ कृष्ण चतुर्दशी (२७.७.२०२२) या दिवशी सनातनच्या ४५ व्या संत पू. (कै.) सौ. सूरजकांता मेनराय यांची जयंती आहे. त्यानिमित्त ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. मधुरा भोसले यांना त्यांची जाणवलेली सूत्रे येथे पाहू.

पू. (कै.) सौ. सूरजकांता मेनराय

१. सनातनच्या संत पू. (कै.) सौ. सूरजकांता मेनराय यांचा अहं अत्यल्प असल्यामुळे त्या पृथ्वीवर असतांना भगवंताच्या विविध भक्तांकडून सतत शिकत असणे 

पू. (कै.) सौ. सूरजकांता मेनराय यांनी माघ शुक्ल सप्तमी (रथसप्तमीला) म्हणजे वर्ष १.२.२०२० या दिवशी देहत्याग केला. त्यानंतर त्यांचा शिवात्मा वैकुंठात गेला. त्या मूळ भक्तीमार्गी असल्यामुळे त्यांच्या हृदयात शिव, विष्णु आणि देवी यांच्याप्रती निस्सीम भक्ती आहे. त्याचप्रमाणे त्यांचा अहं अत्यल्प असल्यामुळे त्या पृथ्वीवर असतांना भगवंताच्या विविध भक्तांकडून सतत शिकत होत्या. त्यांची इतरांकडून शिकण्याची वृत्ती सतत कार्यरत असल्यामुळे त्या वैकुंठात गेल्यावरही सतत विष्णुभक्तांकडून शिकत असतात.

२. पू. मेनरायकाकूंमध्ये असलेल्या इतरांकडून सतत शिकत रहाण्याच्या वृत्तीमुळे भगवान विष्णु त्यांच्यावर प्रसन्न होणे आणि त्याने पू. काकूंच्या शिवात्म्याला अन्य लोकांत जाऊन तेथे शिकण्याची अनुमती देणे

कु. मधुरा भोसले

त्यांच्या इतरांकडून सतत शिकत रहाण्याच्या वृत्तीमुळे भगवान विष्णु त्यांच्यावर प्रसन्न झाला आणि त्याने पू. काकूंच्या आत्म्याला अन्य लोकांत जाऊन तेथील साधक, संत, भक्त, ऋषिमुनी आणि देवता यांच्याकडून शिकण्याची अनुमती दिली. त्यामुळे पू. मेनरायकाकूंचा जीवात्मा निळसर आभा असलेल्या सोनेरी ज्योतीच्या रूपात विविध देवतांचे लोक म्हणजे सगुणलोक आणि विविध ऋषींचे लोक म्हणजे महा, जन, तप आणि सत्य हे लोक येथे जाऊन प्रकाशभाषेतून इतरांकडून शिकत असतात.

३. अन्य संत आणि पू. मेनरायकाकू यांच्यामध्ये आध्यात्मिक स्तरावर असलेला भेद आणि पू. मेनरायकाकूंच्या मनातील अपार कृतज्ञताभाव

सर्वसामान्यपणे एखाद्या संतांनी देहत्याग केल्यावर त्यांचा शिवात्मा एकाच लोकात वास करून तेथे राहूनच ईश्वरप्राप्तीच्या दिशेने पुढील साधना करत असतो; परंतु पू. मेनरायकाकू या बाबतीत अपवाद आहेत. विविध लोकांमध्ये सूक्ष्मातून प्रवास करण्याची क्षमता केवळ सप्तर्षी आणि काही निवडक दैवी शक्तींकडे असते. परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे पू. मेनरायकाकूंमध्ये इतरांकडून शिकण्याची वृत्ती प्रबळ असल्यामुळे त्यांना विविध लोकांमध्ये सूक्ष्मातून प्रवास करण्याची दैवी सिद्धी प्राप्त झालेली आहे. त्यासाठी त्या सतत विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले आणि त्यांचे मूळ रूप म्हणजे साक्षात् श्रीविष्णु यांच्या चरणी शतश: नमन करून कृतज्ञता व्यक्त करतात. यावरून त्यांच्या अंत:करणातील अपार कृतज्ञताभाव दिसून येतो.

प्रार्थना आणि कृतज्ञता

श्री गुरूंच्या कृपेमुळे पू. मेनरायकाकूंचे आध्यात्मिक वैशिष्ट्य शिकायला मिळाले यासाठी मी श्री गुरूंच्या चरणी कृतज्ञ आहे. ‘त्यांच्यासारखीच सतत इतरांकडून शिकण्याची वृत्ती आमच्यामध्ये निर्माण होऊ दे’, ही श्री गुरूंच्या कोमल चरणी आर्त प्रार्थना आहे.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.६.२०२२)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.