(कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे यांची सेवा करतांना सौ. प्रार्थना प्रसाद देव यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये !

१. साधिकेला आपल्यामुळे त्रास होऊ नये, याची काळजी घेणे

(कै.) सौ. शालिनी मराठे

‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी १०.३० ते दुपारी १ या वेळेत मी सौ. शालिनी मराठेकाकूंसमवेत त्यांच्या खोलीत गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पहात होते. कार्यक्रम पहात असतांना काकूंना ३ – ४ वेळा उलट्या झाल्या. उलटी होण्यापूर्वी त्या पलंगावरून उठत असतांना मी त्यांना साहाय्य करण्यासाठी उठले. तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘तू कार्यक्रम बघ. माझ्यामुळे तुझा कार्यक्रम बघायचा राहिला, असे व्हायला नको.’’ दुसर्‍या वेळेला उलटी करण्यासाठी उठण्यापूर्वीच त्यांनी मला सांगितले, ‘‘मला कितीही वेळा उलटी झाली, तरी तू उठायचे नाही. तू कार्यक्रम बघ.’’ त्यांच्यात काहीच शक्ती नसतांनाही ‘साधकांचा सत्संग चुकायला नको. साधकांना माझ्यामुळे त्रास नको’, असा त्यांचा विचार प्रत्येक क्षणी असायचा.

सौ. प्रार्थना प्रसाद देव

२. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आजारी असतांनाही साडी नेसणे

गुरुपौर्णिमेच्या दिवशी आजारी असूनही काकूंनी साडी परिधान केली होती आणि अलंकार घातले होते. त्या वेळी त्यांचा भाव होता, ‘आजचा दिवस माझ्या जीवनातील सर्वांत महत्त्वाचा दिवस आहे. त्यामुळे मला शक्य होईल, तितका वेळ मी साडी नेसून राहीन.’ त्यानंतर मी काकूंचे भ्रमणभाषवर छायाचित्र काढले. ते छायाचित्र मी काकूंना दाखवल्यावर त्या मला म्हणाल्या, ‘‘छान आले आहे ना छायाचित्र ! ‘हे माझे  छायाचित्र आहे’, असे मला वाटतच नाही.’’

३. साधक त्यांच्या सेवेतून वेळ काढून भेटायला आल्याबद्दल कृतज्ञता वाटणे

एक दिवस बांधकामाशी संबंधित सेवा करणारे साधक (सौ. शौर्या मेहता, श्री. सुधीश पुथलत, श्री. गौतम गडेकर आणि सौ. रंजना गडेकर) काकूंना भेटायला आले होते. तेव्हा काकूंना पुष्कळ आनंद झाला. ‘तुम्हाला एवढी महत्त्वाची सेवा असतांना त्यातून वेळ काढून तुम्ही मला भेटायला आलात !’, असे काकू त्यांना म्हणाल्या. शेवटी म्हणाल्या, ‘‘मी तुमचा पुष्कळ वेळ घेतला.’’ त्यांनी भेटायला आलेल्या सर्व साधकांच्या कुटुंबियांची नावानिशी चौकशी केली आणि त्या सर्वांना ‘मी त्यांची आठवण काढली आहे’, असा निरोप देण्यास सांगितले.

४. स्वभावदोष निर्मूलनासाठी प्रयत्न होत नसल्याची खंत वाटणे

माझ्या सासूबाई श्रीमती शैला देव या पूर्वी मराठेकाकूंच्या खोलीत काही दिवस निवासाला होत्या. त्या वेळी त्या दोघी स्वभावदोष निर्मूलन सारणीचे लिखाण एकत्र बसून करायच्या. स्वयंसूचना बनवण्यास अडचण येत असेल, तर दोघीजणी एकमेकींना साहाय्य करायच्या. ११.७.२०२२ या दिवशी मी काकूंच्या सेवेत असतांना त्यांनी माझ्या सासूबाईंची आठवण काढली आणि मला वरील आठवणी सांगितल्या. त्या मला म्हणाल्या, ‘‘आता माझ्याकडून स्वभावदोष सारणी इत्यादी काहीच लिखाण होत नाही गं !’’ इतक्या आजारपणातही त्यांना ‘स्वभावदोष निर्मूलन सारणीचे लिखाण होत नाही’, याची खंत वाटत होती.

५. साधिकांची काळजी घेणे

मी काकूंवर आलेले त्रासदायक आवरण काढत असे. तेव्हा थोड्या वेळाने त्या मला म्हणायच्या, ‘‘बस आता. तुझे हात दुखतील. तू तुझा नामजप इत्यादी कर.’’ अशा प्रकारे त्या त्यांच्या सेवेत असणार्‍या साधिकांची त्या काळजी घेत असत.’

– सौ. प्रार्थना प्रसाद देव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.७.२०२२)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.