आयुर्वेदातील चूर्णे, गोळ्या, दंतमंजन, केश तेल इत्यादी औषधांवर ठराविक समाप्ती तिथी (एक्सपायरी डेट) लिहिलेली असते. या दिनांकानंतर औषध घेतले गेले, तर त्याचे काही दुष्परिणाम होतात का ? समजा अमुक वर्षाचा ३१ जुलै हा दिनांक एखाद्या औषधाची समाप्ती तिथी असेल, तर त्या वर्षी १ ऑगस्टला ते औषध घेतले, तर ते विष बनेल का ?
१. समाप्ती तिथीसंदर्भात आयुर्वेद शास्त्रातील मत
‘आयुर्वेदातील औषधनिर्मिती संदर्भात ‘शार्ङ्गधर संहिता’ हा तेराव्या शतकातील एक प्रमाणभूत संस्कृत ग्रंथ आहे. यामध्ये औषधी चूर्णे, तूप, तेल इत्यादी किती कालावधीनंतर ‘हीनवीर्य’ होतात, याची माहिती दिली आहे. ‘हीनवीर्य’ म्हणजे ‘औषधातील औषधी गुण तुलनेने न्यून होणे’. येथे लक्षात घेण्यासारखे म्हणजे ग्रंथामध्ये ‘हीनवीर्य’ असा शब्द वापरला आहे. ‘नष्टवीर्य (औषधी गुण नष्ट होणे)’ किंवा ‘निर्वीर्य (औषधी गुण निघून जाणे)’ असा शब्द वापरलेला नाही. औषध बनल्यापासून त्याच्यावर वातावरण आणि काळ यांचा प्रभाव पडणे चालू होते. त्यामुळे त्याचे औषधी गुणधर्म अंशांशाने न्यून होण्यास आरंभ होतो; परंतु समाप्ती तिथीनंतर औषध लगेच विष बनत नाही. उतारवयामध्ये माणूस जसा वृद्ध होऊन त्याची क्षमता न्यून होत जाते, त्याप्रमाणे औषधाची परिणामकारकता थोडी थोडी न्यून होत जाते; परंतु ते औषध जर त्याचा गंध, रस (चव) इत्यादी गुणांनी परिपूर्ण असेल, तर कालांतरानेही तेवढेच परिणामकारक ठरते. आयुर्वेदातील ‘आसव’ किंवा ‘अरिष्ट’ या प्रकारातील औषधे (उदा. द्राक्षासव, सारस्वतारिष्ट), तसेच धातूंची भस्मे असलेली औषधे (उदा. चंद्रामृत रस, वसंत मालती रस (स्वर्ण)) ही कितीही जुनी झाली, तरी त्यांमधील औषधी तत्त्व न्यून होत नाही. त्यामुळे या प्रकारच्या औषधांवर समाप्ती तिथी नसते.
२. व्यवहारात समाप्ती तिथीपेक्षा औषधाचे गंध, रस (चव) इत्यादी गुणधर्म पहाणे अधिक योग्य !
सध्या पाश्चात्त्य वैद्यकशास्त्राच्या प्रभावामुळे, तसेच अन्न आणि औषध प्रशासन यांच्या नियमांमुळे आयुर्वेदाच्या औषधांवर समाप्ती तिथी लिहावी लागते. ही समाप्ती तिथी आणि शार्ङ्गधर संहितेत दिलेला हीनवीर्यतेचा काळ यांमध्ये पुष्कळ अंतर (फरक) आहे. औषधाला हवा लागणार नाही, अशा पद्धतीने डबीचे झाकण घट्ट लावलेले असेल आणि औषधाचा गंध, रस (चव) इत्यादी गुणांमध्ये अंतर (फरक) पडले नसेल, तर असे औषध टाकून न देता वापरले, तर ते ‘विष’ बनत नाही.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.७.२०२२)