‘आपण हिंदु कि भारतीय आहोत ?’, अशा संभ्रमात हिंदु असतो ! – राज ठाकरे, मनसे पक्षप्रमुख

झी २४ तास’चे संपादक नीलेश खरे (डावीकडे) मनसेप्रमुख राज ठाकरे (उजवीकडे)

मुंबई – हिंदु हा केवळ हिंदु-मुसलमान दंगलीच्या वेळी हिंदु असतो. तो १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी भारतीय होतो. चीनने आक्रमण केल्यावर त्याला कळतच नाही की, आपण कोण आहोत ? आपण काय म्हणून प्रतिक्रिया व्यक्त करायची ?, हिंदु म्हणून कि भारतीय म्हणून ? ‘समजा बहिष्कार वगैरे टाकायचा प्रयत्न केला आणि चिनी बनावटीच्या गाड्यांची विक्री बंद झाली, तर करायचे काय ?’ अशा संभ्रमात तो असतो, असे वक्तव्य मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी केले. राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीविषयी ‘झी २४ तास’चे संपादक नीलेश खरे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. त्या वेळी ते बोलत होते.

संपूर्ण मुलाखत (सौजन्य: Zee 24 Taas)

१. राज ठाकरे पुढे म्हणाले, ‘‘हिंदु हा नंतर गुजराती, मराठी, तमिळी, पंजाबी आणि बंगाली होतो. एकदा तो मराठी झाला की, मग तो मराठा, ब्राह्मण, माळी, कुणबी, आगरी होतो. थोडक्यात काय, तर आपण जातींमध्ये अडकलो आहोत.’’

२. आपण हिंदू आहोत. आपल्याकडे वादांची कमतरता नाही. तुम्हाला आठवत असेल, तर मी माझ्या अधिवेशनात सांगितले होते की, मला जर तुम्ही नख लावल, तर मी हिंदू म्हणून अंगावर येईन. माझ्या भाषेला आणि मराठीला जर तुम्ही नख लावल, तर मी मराठी म्हणून अंगावर येईन. आपण मराठी आहोत, हिंदू आहोत. मला असे वाटते की, ही गोष्ट टिकवणे आवश्यक आहे. आपण सांस्कृतिक वारसा टिकवणे आवश्यक आहे. आपण धर्माने मानी असलो पाहिजे; मात्र धर्मांध असता कामा नये. ते (मुसलमान) तसे वागतात म्हणून आपण तसे वागावे, याची आवश्यकता नाही. असल्या गोष्टींचे अनुकरण करून चालणार नाही.