‘टिमवी’ सांगली केंद्राच्या वतीने ३१ जुलैला आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा !

सांगली, २३ जुलै – टिळक महाराष्ट्र विद्यापिठाच्या सांगली केंद्राच्या वतीने लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त ३१ जुलै या दिवशी आंतरशालेय लोकमान्य टिळक वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धा सकाळी १० वाजता टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, वसंतदादा औद्योगिक वसाहत येथे होतील. विद्यार्थ्यांना इतिहासातील लोकमान्य टिळकांच्या कार्याची ओळख व्हावी, त्यापासून प्रेरणा मिळावी, विद्यार्थ्यांमधील वक्तृत्व गुण वाढीस लागावेत या दृष्टीने विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन स्पर्धा संयोजकांनी केले आहे.

या स्पर्धेत इयत्ता ५ वी आणि ६ वीतील गटासाठी लोकमान्य टिळकांची लोकप्रियता, लोकमान्य टिळक आणि व्यायामाचे महत्त्व, तर इयत्ता ७ वी अन् ८ वीतील गटासाठी लोकमान्य टिळकांचे व्यक्तिमत्व, पहिल्या राजद्रोहाचा खटला (प्लेग), तसेच इयत्ता ९ वी आणि १० वीतील गटासाठी स्वदेशीचे महत्त्व अन् लोकमान्य टिळक, लोकमान्य टिळकांच्या दृष्टीकोनातून गणेशोत्सव, तर शिक्षकांसाठी राष्ट्रीय शिक्षणाचे महत्त्व आणि लोकमान्य टिळक-आधुनिक भारताचे शिल्पकार, असे विषय आहेत. या स्पर्धेतील प्रत्येक गटातील पहिल्या ३ विजेत्या स्पर्धकास रोख पारितोषिक आणि प्रशस्तीपत्रक, तर सर्व गटात मिळून प्राविण्यपद मिळवणार्‍या शाळेस लोकमान्य टिळकांची प्रतिमा अन् प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.