पनवेल – आमचे सरकार हिंदुत्ववादी आहे. आमचे हिंदुत्व हे संकुचित नाही. आमचे हिंदुत्व कोणत्याही धर्माचे लांगूलचालन करणारे नाही. जो या भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगतो, त्यांना समवेत घेऊन चालणारे आमचे हिंदुत्व आहे. आमचे हिंदुत्व सर्वांना समान न्याय देणारे आहे. आमचे सरकार हे हिंदुत्ववादी आणि मराठी माणसासाठी लढणारे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते.
जे काम कुणीही सहज करू शकतो, ते महाविकास आघाडी सरकारला 2.5 वर्ष का जमले नाही?
कारण त्यांच्यात इच्छाशक्ती नव्हती. केवळ राजकारण करण्यापलीकडे त्यांनी काहीही केले नाही. ओबीसी आरक्षण त्यांना द्यायचेच नव्हते: देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) July 23, 2022
ते पुढे म्हणाले की, आम्ही स्वच्छ, प्रामाणिक आणि लोकाभिमुख सरकार देण्याचा प्रयत्न करू. आम्ही महाराष्ट्राला देशात एक क्रमांकाचे राज्य बनवू. आम्ही ज्या गोष्टी २० दिवसांत केल्या, त्या महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात झाल्या नाहीत; कारण त्यांच्यात इच्छाशक्तीचा अभाव होता. इच्छाशक्ती असलेले आमचे सरकार सत्तेत आल्यावर लगेचच इतर मागासवर्गियांशी (‘ओबीसीं’शी) संबंधित अहवाल मिळवून तो सर्वोच्च न्यायालयात सादर केला, त्यामुळे ‘ओबीसीं’ना आरक्षण मिळाले.