‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सनातनचे साधक आपापल्या भावाप्रमाणे ‘प.पू. डॉक्टर’ किंवा ‘परात्पर गुरु डॉक्टर’, असे संबोधतात. आता नाडीपट्टीवाचनाच्या माध्यमातून सप्तर्षींनी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले’ असे संबोधावे’, अशी आज्ञा केली आहे. काळानुसार पालटत गेलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संबोधनांविषयीचे स्पष्टीकरण पुढे केले आहे.
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या तत्कालीन आध्यात्मिक पातळीनुसार त्यांच्या नावाच्या आधी ‘प.पू. डॉक्टर’ किंवा ‘परात्पर गुरु डॉक्टर’ या उपाध्या लावलेल्या असणे : ‘गुरुकृपायोगा’नुसार साधना करून साधकाने ७० टक्के आध्यात्मिक पातळी गाठली की, त्याला ‘संत’ अथवा ‘गुरु’ म्हटले जाते आणि त्याच्या नावाच्या आधी ‘पू. (पूज्य)’ ही उपाधी लावण्यात येते. व्यष्टी किंवा समष्टी संतांनी ८० टक्के आध्यात्मिक पातळी गाठली की, त्यांना ‘सद्गुरु’ म्हटले जाते आणि त्यांच्या नावाच्या आधी ती उपाधी लावण्यात येते. त्यांनी ९० टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्यानंतर त्यांना ‘परात्पर गुरु’ ही उपाधी लावण्यात येते. वर्ष १९९१ मध्ये डॉ. जयंत आठवले यांची आध्यात्मिक पातळी ७० टक्के होती. त्या वेळी प.पू. भक्तराज महाराज यांनी डॉ. आठवले यांचे संतत्व अप्रत्यक्षरित्या घोषितही केले होते. असे असले, तरी डॉ. आठवले स्वतःला ‘प.पू. भक्तराज महाराज यांचा शिष्य’ समजत असल्याने त्यांनी सनातनच्या साधकांना ‘‘मला ‘डॉक्टर’, असेच म्हणा’’, असे सांगितले होते. त्यामुळे सर्व साधक त्यांना ‘डॉक्टर’, असे संबोधत असत. वर्ष १९९५ मध्ये डॉ. आठवले यांची आध्यात्मिक पातळी ८० टक्क्यांहून अधिक झाली. या काळापर्यंत परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार साधना केलेल्या अनेक साधकांना परात्पर गुरु डॉक्टरांच्या संदर्भात विविध अनुभूती आल्या होत्या. साधकांची त्यांच्यावरील श्रद्धा वाढू लागली होती आणि साधक त्यांना गुरुस्थानी मानायला लागले होते. वर्ष १९९५ पासून काही साधक त्यांना ‘प.पू. डॉक्टर’, असे संबोधायला लागले. वर्ष २००३ पासून जवळजवळ सर्वच साधक त्यांना ‘प.पू. डॉक्टर’, असे संबोधू लागले. तेव्हा एका संतांच्या सांगण्यानुसार परात्पर गुरु डॉक्टरांच्या नावाच्या आधी ‘प.पू. (परम पूज्य)’ ही उपाधी लावण्यास प्रारंभ झाला. वर्ष २००८ मध्ये त्यांची आध्यात्मिक पातळी ९१ टक्के झाली असली, तरी वर्ष २०१३ पासून एका संतांनी सुचवल्यानुसार परात्पर गुरु डॉक्टरांच्या नावाच्या आधी ‘परात्पर गुरु’ ही उपाधी लावण्यास आरंभ झाला.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील ईश्वरी तत्त्वाचा लाभ होण्यासाठी सप्तर्षींच्या आज्ञेने आता त्यांना ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले’, असे संबोधायचे असणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सवाच्या दिवशी (वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी (१३.५.२०२०)) ‘सप्तर्षी जीवनाडीपट्टी’च्या वाचनाच्या माध्यमातून महर्षींनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘सच्चिदानंद परब्रह्म’ ही उपाधी प्रदान केली. त्यानंतर १३.७.२०२२ (गुरुपौर्णिमा) या दिवशी सप्तर्षींनी ही उपाधी जनमानसांत सर्वत्र रूढ होण्याच्या दृष्टीने नाडीपट्टीद्वारे ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘सच्चिदानंद परब्रह्म’ ही उपाधी लावावी’, अशी आज्ञा केली. या आज्ञेनुसार १३.७.२०२२ पासून परात्पर गुरु डॉक्टरांना ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले’, असे संबोधण्यास आरंभ झाला आहे.
‘सच्चिदानंद म्हणजेच ‘सत्-चित्-आनंद’ ही परमात्मा परब्रह्माची स्वरूप लक्षणे आहेत. जो सत्घन, चित्घन आणि आनंदघन आहे, अशा त्या गुरुदेवांच्या ठायी असलेल्या परब्रह्म परमात्मा शक्तीला आमचा नमस्कार असो’, असे सप्तर्षींनी अत्यंत श्रद्धेने सांगितले आहे. ‘सच्चिदानंद परब्रह्म’ या संबोधनाद्वारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील ईश्वरी तत्त्वाचा सर्वांना लाभ व्हावा, हा सप्तर्षींचा या संबोधनामागील उद्देश आहे. ‘येणार्या २ सहस्र वर्षांपर्यंत ते या नावानेच ओळखले जाणार आहेत’, असे सप्तर्षींनी सांगितले आहे.’
– सनातन संस्था