‘ऑनलाईन’ खेळ आणि जुगार यांच्यावर कारवाई करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

राज्यातील अनेक युवकांना ‘ऑनलाईन’ रमी खेळाचे व्यसन जडल्याचा आमदार संकल्प आमोणकर यांचा दावा

प्रत्येक राज्याने या खेळांवर बंदी घालत बसण्यापेक्षा केंद्रशासनानेच देशभरात या खेळांवर बंदी घालायला हवी !

 

मुख्यमंत्री डॉ. सावंत

पणजी, २२ जुलै (वार्ता.) –  राज्यातील अनेक युवकांना ‘ऑनलाईन’ रमी आदी खेळांचे व्यसन जडल्याचे काँग्रेसचे आमदार संकल्प आमोणकर विधानसभेत सांगितले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणी ‘ऑनलाईन’ खेळ आणि जुगार यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

प्रश्न करतांना आमदार संकल्प आमोणकर म्हणाले, ‘‘राज्यात आता ‘रमी’, ‘पोकर्स’ आदी अनेक ‘ऑनलाईन’ खेळ चालू आहेत. हे सर्व जुगाराचे प्रकार आहेत. आताचे युवक सहजनेते या जुगाराला बळी पडत असल्याने ही एक गंभीर गोष्ट बनलेली आहे. युवकांना या जुगाराचे व्यसन जडलेले आहे. देशात तेलंगाणा, आंध्रप्रदेश, सिक्कीम, ओडिसा, नागालँड आदी अनेक राज्यांमध्ये जुगाराचा एक भाग असलेल्या  ‘ऑनलाईन’ खेळावर बंदी घातलेली आहे. गोवा सरकारचे या जुगारस्वरूपी खेळावर कोणतेच नियंत्रण नाही. हा खेळ खेळणार्‍याला त्याचा प्रतिस्पर्धी कोण आहे, याची सविस्तर माहितीही नसते.’’

इयत्ता १२ वीत शिकणार्‍या विद्यार्थ्याने ‘ऑनलाईन’ खेळात ३ मासांत ५ लाख रुपये उधळले

(प्रतिकात्मक चित्र)

आमदार संकल्प आमोणकर विषयाचे गांभीर्य लक्षात येण्यासाठी उदाहरण देतांना म्हणाले, ‘‘माझ्या एका जवळच्या मित्राच्या मुलाने अशा खेळांवर ३ मासांत ५ लाख रुपये उधळले आहेत. हा मुलगा इयत्ता १२ वीत शिकतो.’’